मुस्लिमांमध्ये शुक्रवार अर्थात जुम्माच्या नमाजला विशेष महत्त्व आहे. जुम्माची नमाज म्हणजे शुक्रवार दुपारची नमाज. रमजानमध्येतर जुम्माचे महत्त्व आणखी वाढते. रमजान पर्वाचा पहिला जुम्मा काल जगभरातील मुस्लीम बांधवांनी पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात साजरा केला. जगभरातील मुस्लिमांचे धार्मिक आणि आध्यात्मिक केंद्र मानल्या जाणाऱ्या मक्का येथील मस्जिद अल हरम आणि मदिना येथील मस्जिद अल नबवी या दोन मस्जिदिंमध्ये जुम्माच्या नमाजला विक्रमीगर्दी पाहायला मिळाली. भारतासह महाराष्ट्रामध्ये देखील रमजानचा पहिला जुम्मा शांती आणि उत्साहात पार पडला.
यानिमित्ताने राज्यातील सर्वच मस्जिदींमध्ये विशेष नमाजासाठी गर्दी उसळली होती. चिमुकल्यांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी रोजा ठेवत नमाज अदा केली. नमाजनंतर मुस्लिम बांधवांनी कुटुंब आणि देशाची सुख-शांती आणि उज्ज्वल भवितव्यासाठी विशेष प्रार्थना केल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले.
यावेळी मस्जिदमध्ये नमाजपूर्वी रमजान पर्वाचे महत्त्व सांगणारे मौलवींचे धार्मिक प्रवचन म्हणजेच खुदबा झाला. त्यानंतर सामुहिकपणे नमाज अदा करण्यात आली. रमजान पर्वातील शुक्रवार असल्याने नमाजासाठी होणारी गर्दी लक्षात घेता सर्व मस्जिदिंमध्ये अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली होती. काही मस्जिदी तर तुडुंब भरून गेल्याने प्रवेशद्वारासमोर मंडप उभारून नमाज अदा करण्यात आली.
त्यानंतर काही भाविकांनी कुराणचे पठण करत संपूर्ण दिवस मशिदीमध्ये इबादत करण्यात घालवला. काहींनी घरी जाऊन तर काहींनी मस्जिदींमध्येच रोजा सोडला. या काळात जकात म्हणजे धार्मिक कर जमा केला जातो.सोबतच सदका आणि चंदा म्हणजेच दान करण्यास अतिशय महत्त्व आहे. आर्थिक परिस्थितीनुसार मुस्लिम बांधवांकडून सदका आणि जकात स्वरूपात रोख रक्कम दान म्हणून दिली जाते. काहीजण स्वतःच्या नावाने तर काहीजण आपल्या पूर्वजांच्या स्मृतीप्रित्यर्थ दान करतात. शहरातील विविध मदरसा, यतीम खाना म्हणजे अनाथालय तसेच गरजूंना चंदा दान केले जाते. त्यामुळे विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच गरजूंनी मस्जिद, दर्गा बाहेर जकात, सदका घेण्यासाठी गर्दी केल्याचेही दिसून आले.