गडावरील सामाजिक सलोख्याचा संदेश जपण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी काल किल्ले विशाळगडला भेट दिली. गडावरील उरुसाच्या पहिल्या दिवशी आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांसह हजरत पीर मलिक रेहान बाबांच्या दर्ग्यामध्ये भेट देऊन दर्शन घेतले. गजापूर बौद्धवाडी व गडावर त्यांचे स्वागत करण्यात आले.
ग्रामस्थ व प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगितला जात आहे. दोन जातींमध्ये तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पर्यटक, भाविक, इतिहासप्रेमी यांच्या स्वातंत्र्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध न येता हा ऐतिहासिक गड उघडा राहायला पाहिजे. हिंदू - मुस्लिमांचे ध्रुवीकरण करण्यासाठी छत्रपतींची चुकीची प्रतिमा उभारली जात आहे. गडाची देखभाल करणाऱ्यांना जे लोक त्रास देत आहेत, ते चुकीचे आहे. तो छत्रपतींचा अवमान आहे."
पुढे ते म्हणाले, "शिवरांच्या सैन्यात अठरा पगड जातीचे मावळे होते. मुस्लीम सैनिकही स्वराज्याच्या कार्यात होते. स्वराज्य सर्वधर्म सहिष्णूतेवर आधारलेले होते, त्याचे प्रतिक विशाळगड आहे. दोन्ही धर्मियांचे लोक येथे सलोख्याने पिढ्यान् पिढ्या राहतात. समाजातील सलोखा कायम राखला पाहिजे."
शाहूवाडीचे पोलिस निरीक्षक विजयकुमार घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली गजापूर परिसरात ७० पोलिस व ६ अधिकारी तैनात होते. गजापूर येथील मशिदीजवळ पोलिस कुमक होती. उरूसाच्या पहिल्या दिवशी सुमारे १३६५ भाविक व पर्यटकांनी दहा ते पाच या वेळेत भेट दिली. पाच नंतरही भाविक गडाकडे येत होते, पण त्यांना पोलिसांनी माघारी पाठवले. सायंकाळी पाच नंतर पोलिसांनी गड परिसरात गस्त घालून सर्वांना गडाखाली पाठवले.