अहमदनगर येथील सावित्री फातिमा सद्भावना मंचातर्फे आयोजित सर्वधर्मीय सदभावना संमेलन
भारताची अडीच-तीन हजार वर्षांची समतेची, एकोप्याची, बंधू-भावाची परंपरा आहे. भारताचा आदर्श जवळपास सर्व देशांनी घेतला आहे. महाराष्ट्राच्या एकोप्याचे वातावरण कधी बिघडू शकणार नाही. या देशातील संतांनी प्रथम बाहेरून आलेल्या सुफी संतांचा आदर्श घेतला. त्यांनीच समता, बंधुभावाचा विचार सर्वधर्मीयांच्या मनात जागवल्याचे प्रतिपादन परभणी येथील धर्मकिर्ती महाराज यांनी केले आहे.
झालं असं की, सावित्री फातिमा सद्भावना मंचातर्फे अहमदनगर येथे सर्वधर्मीय सदभावना संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात विविध धर्मातील लोकांनी सहभाग घेतला होता. या संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून खासदार निलेश लंके, ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प सोपानकाका औटी महाराज, सत्यपाल महाराज शिरसोलीकर, परभणी येथील हभप धर्मकीर्ती महाराज सावंत, पारनेर येथील भंते बाळासाहेब पातारे, जळगाव येथील मौलाना समी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्री फातिमा सद्भावना विचार मंचाचे अध्यक्ष अॅड. संभाजी बोरुडे उपस्थित होते.
या संमेलनात सत्यपाल महाराज यांना राज्यपातळीच्या सद्भावना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, सन्मानचिन्ह आणि ११ हजार रुपये या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी संमेलनातील मान्यवरांनी त्यांचे विचार सर्वांसमोर मांडले. यावेळी धर्मकीर्ती महाराज म्हणाले, “सूफी संतांनी अस्पृश्यांना जवळ करत एकूणच सामाज व्यवस्थेवर प्रकाश टाकला. त्यांनी सर्वांना सामाजिक आणि धार्मिक एकतेचा संदेश दिला. त्यावेळी असणाऱ्या जातीवाद, अस्पृश्यतेविरोधात त्यांनी बंधुत्वाचा विचार सर्वांच्या मनात रुजवला. तुकाराम महाराज एका दिंडीत असताना ती दिंडी एका मस्जिद जवळ थांबली. तेथील मुस्लिमांनी तुकाराम महाराजांना मस्जिदीमध्ये कीर्तन करण्यास सांगितले. त्यावेळी तुकाराम महाराज म्हणाले, अल्ला देवे, अल्ला दिलाये अल्ला खिलाये अशी ओवी सांगितली. त्यांनी या ओवीतून एकेश्वराचे महत्व सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी सध्याच्या राजकारणावर आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक परिस्थितीवर परखड मत मांडले. ते म्हणाले, “अलीकडे काही राजकारणी लोकांनी धर्मयुद्ध सुरू केले. समाजातील जाती-जातीत भांडणे लावण्याचे काम केले.”
या संमेलनाचे प्रास्ताविक डॉ. रफिक सय्यद यांनी सादर केले. यावेळी ते म्हणाले, “भारतीय समाज अठरापगड जाती धर्माचा समाज आहे. अर्थातच या समाजामध्ये परस्पर सदभावना, सलोखा आणि बंधुभाव अत्यंत महत्वाचा आहे. त्याशिवाय भारतात सुख-समृद्धी आणि शांती नांदणार नाही.”
पुढे ते म्हणाले, “आपल्या अहमदनगर जिल्ह्याला सदभावनेचा महान वारसा लाभला आहे. याठिकाणी असणाऱ्या सुफी हजरत शाह शरीफ बाबांविषयी शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांना परम आदर होता. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी आणि शरीफ जी अशी ठेवली होती. आजही शाहशरीफ बाब हे भोसले घराण्याचे श्रद्धास्थान आहे. श्रीगोंदाचे सुफी शेख मोहम्मद (रह.) आणि संत तुकाराम महाराजांची मैत्री सर्वांना माहीत आहे. संत शेख मोहम्मद महाराज श्रीगोंदा आणि पंचकोशीतील लोकांचे श्रद्धास्थान आहे.”
सद्भावना कार्यक्रमांची आवश्यकता - लंके
या संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झालेले खासदार निलेश लंके यांनी देखील त्यांचे मत मांडले. ते म्हणाले, “समाजात द्वेषाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सद्भावनेच्या कार्यक्रमांची अत्यंत आवश्यकता आहे. छत्रपतींच्या हिंदुत्वाची आज खरी गरज आहे. शिवाय सर्वधर्मीय धर्मगुरूंचे संमेलन वेगवेगळ्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे. या सर्वधर्मीय संमेलनाचा उद्देश घराघरापर्यंत पोहचणे आवश्यक आहे. हा उद्देश साध्य करण्यासाठी येणाऱ्या काळात असे आणखी उपक्रम आयोजित करण्याचा मानस आहे.”
या संमेलनासाठी जळगावहून आलेले मौलाना समी म्हणाले, “युवा पिढीला दिशाभूल करण्याचं काम सध्या सुरू आहे. त्या युवा पिढीला आपल्याला सत्यमार्ग दाखवावा लागेल. धर्म व इतिहासाचे विकृतीकरण थांबविण्याची आज अत्यंत आवश्यकता आहे.”
तर सत्यपाल महाराज म्हणाले, “आज प्रत्येकाला जागरूक व्हावे लागेल. समाजातील सद्भावनेसाठी काम करणारे लोकांवर हल्ले होतात. कारण सदभावनेसाठी काम करणाऱ्यांच्या विचारांना त्यांना मारायचे आहे. पण विचार मरत नाही, ते अशा संमेलनातून सर्वांपर्यंत पोहचत असतात. माणसाला माणूस बनवण्याचा कारखाना सावित्री फातिमा सद्भावना विचार मंचाद्वारे तयार होत हे महत्वाचे आहे.”
तसेच कॉम्रेड स्मिता पानसरे यांनी आपल्या भाषणातून सांगितले, “सदभावना मंच हे सर्वांना एकत्र आणण्याचे काम करीत आहे. अलीकडच्या काळात धर्माचा आणि सत्तेचा गैरवापर करून दहशत निर्माण केली जात आहे. यामुळे जाती जातींमध्ये तेढ निर्माण होत आहे.”
भंते बाळासाहेब पातोरे म्हणाले, “राज्यघटना उध्वस्त करण्याचा काम सध्या होत आहे. संविधान वाचवण्यासाठी लोकांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून दिली पाहिजे. जेणेकरून लोक सरकारला जवाब विचारू शकते.”
तर शेवटी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अॅड. संभाजी बोरुडे म्हणाले, “संविधानाला अपेक्षित असणाऱ्या भारताच्या निर्माणसाठी सदभावना मंच प्रयत्नशील आहे. आपला जिल्हा सदभावना असणारा हा जिल्हा आहे. याठिकाणी शाहशरीफ दर्गा आणि सावित्री फातिमाची शाळा आहे. या जिल्ह्यात सद्भावनेसाठी काम करण्याची वेळ का आली, यावर विचार मंथन करणे आवश्यक आहे.”
पुढे ते म्हणतात, “आज मानवता धर्म धोक्यात आहे. धर्माला आणि जातीला महत्त्व दिले जात आहे. इतिहास भुगोल माहिती नसणारी अडाणी माणसं काही लोकांच्या मागे जात आहे. आजच्या या शिक्षित समाजात अशा भेदभाव करणारी प्रवृत्ती फोपावत आहे हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे.”
हा संमेलनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावित्री फातिमा सद्भावना मंचाचे अॅड. संभाजी बोरुडे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रामाणिक कष्ट घेतले आहे. यामध्ये अशोक सब्बन, बाळासाहेब मिसाळ, संजय झिंजे, युनूसभाई तांबटकर, मुबीन खान, मेजर संजय वाघ, प्रतिक बारसे, फिरोज शेख, राजूभाई शेख, प्रा. डॉ. मेहबूब सय्यद, मुस्ताक सर तांबटकर, अब्दुल रहीम साहब, बापू चंदनशिवे, कादीर सर, जहीर सय्यद पत्रकार, मेजर रफीक, अश्फाक शेख, मुनाफ भाई, अॅड. आरिफ, नदीम, मुश्ताक यांचा समावेश आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter