मोहर्रम हा फक्त उत्सव नसून त्या माध्यमातून भारतात एक संस्कृती आकाराला आली आहे. मोहर्रम ही मुलतः शिया पंथियांनी भारतात विकसित केलेली एक संस्कृती आहे. शिया संस्कृतीची केंद्रे असणाऱ्या हैदराबाद, लखनऊ सारख्या शहरांशिवाय या शिया संस्कृतीचा प्रभाव वेगवेगळ्या भागातील मोहर्रमवर आढळतो.
मोहर्रममुळे वेगवेगळ्या भाषांमध्ये काही काव्यप्रकार रुढ झाले आहेत. शिवाय मोहर्रमच्या माध्यमातून बाजारपेठांना नव्या उत्पादनांच्या निर्मितीची संधीही मिळाली आहे. भारतीय जीवनव्यवहारावर मोहर्रमचा प्रभाव सहज जाणवणारा आहे. मोहर्रमच्या इतिहासाला अनेक पैलू आहेत. वेगवेगळ्या भागातील मोहर्रमची माहिती घेतली की हा इतिहास आधिक ठळकपणे समोर येतो.
हिंदू राज्यकर्त्यांच्या काळातील मोहर्रमदेखील महत्त्वाचा आहे. मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदशातील हिंदू संस्थानिकांच्या काळातील मोहर्रमचे दस्तऐवज उपलब्ध आहेत. त्यातून हा इतिहास आपल्याला समजतो.
झाशी ही मध्यप्रदेशातील महत्वाची राजवट होती. झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या काळात मोहर्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता. झाशीचे मोहर्रमचे स्वरुप इतर शहरांपेक्षा थोडेसे वेगळे होते.
झाशीतील मोहर्रमची पार्श्वभूमी
झाशीचे राजे गंगाधर हे एकदा बनारसला गेले होते. त्यावेळी त्यांना एका कलाकाराची कारागिरी आवडली. त्यांनी त्याला आपल्यासोबत झाशीला आणले आणि त्याच्याकडून महालातील मंदिराची सजावट करुन घेतली.
महालातील मंदिराची सजावट अपूर्ण असतानाच त्या कलाकाराने बनारसला परत जाण्याची परवानगी मागितली. तेव्हा राजा गंगाधर यांनी त्या कलाकाराला याचे कारण विचारले. ‘मला मोहर्रमची अजादारी (दुःख व्यक्त करण्याचा कार्यक्रम) मध्ये सहभागी व्हायचे आहे आणि ताजिया काढायचा आहे. त्यामुळे मला बनारसला जावे लागेल.’, असे त्या सांगितले.
राजा गंगाधर यांनी कलाकाराला येथेच अजियादारीचा कार्यक्रम करुन ताजिया काढण्याची विनंती केली. आणि हा ताजिया राजाच्यावतीने काढला जाईल असेही सांगितले. तेव्हापासून हा ताजिया राज्याकडून काढला जाऊ लागला.
राजा गंगाधर यांना मोहर्रमविषयी खूप आस्था होती, असे सांगितले जाते. त्यांनी आपल्या मृत्युपत्रातदेखील याची नोंद केली आणि इच्छा व्यक्त केली की, आपली समाधी जेथून ताजियांची मिरवणूक निघते त्या मार्गावर बांधण्यात यावी जेणेकरुन हे ताजिये आपल्या समाधीसमोर जातील. राजा गंगाधर यांनी मोहर्रमविषयी दाखवलेली ही आस्था एकमेवाद्वितीय अशीच म्हणावी लागेल.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध झालेले मोहरमविषयक हे लेखही जरूर वाचा
राणी लक्ष्मीबाई यांच्या काळातील मोहर्रम
राजा गंगाधर यांची ही परंपरा वर्षानुवर्षे सुरु राहिली. राणी लक्ष्मीबाई यांनीही ही परंपरा सुरु ठेवली. त्यावेळी प्रत्येक जातीला ताजिया ठेवण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जात असे. मोहर्रमच्या दहा तारखेला आणि इमाम हुसैन यांच्या दिडमासाच्या विधीवेळी ताजिये काढले जात होते.
ताजिये हे क्रमाक्रमाने काढले जायचे. सुरुवातील राणी लक्ष्मीबाईंचा ताजिया असायचा आणि त्यानंतर इतर आखाडे आणि जातींचे ताजिये काढले जात. या जुलूसचे निरिक्षण स्वतः राणी लक्ष्मीबाई करत. त्यानंतर जो ताजिया सर्वाधिक चांगला असेल त्याला प्रथम, द्वितीय, तृतीय अशी बक्षिसे दिली जात होती.
राणी लक्ष्मीबाईच्यानंतर या ताजियाला इंग्रजांनी राज्याकडून काढल्या जाणाऱ्या ताजियाचा दर्जा दिला. शाही ताजिया काढणाऱ्या कमिटीकडून आजही हा ताजिया काढला जातो. त्यावेळी हा ताजिया राणी लक्ष्मीबाईंच्या राणी महालात ठेवला जात होता. त्यावेळी मर्सिया (करुणकाव्ये) गायले जात असत. प्रसादही वाटले जात. मोहर्रमच्या सात आणि नऊ तारखेला शिया समुहाकडूनही ताजिया काढला जात होता. काही दिवसांनंतर हा ताजिया राणी महलच्या चबुतऱ्यावर ठेवला जाऊ लागला. अलीकडच्या काळात हा ताजिया राणी महालाच्या समोर रस्त्याच्या बाजूला चबुतऱ्यावर ठेवला जातो.
राणी लक्ष्मीबाईंनी बांधून दिले इमामबाडे
राणी लक्ष्मीबाईंच्या काळात झाशी शहरात ३५ हजार मुसलमान होते. त्यामध्ये २० बिरादरीचे लोक होते. राणीने प्रत्येक बिरादरीसाठी एक मस्जिद, मोहर्रमसाठी इमामबाडा आणि कब्रस्तान बांधून दिले होते. राणीने बांधून दिलेल्या इमामबाड्यांमध्ये मुंबाती जमातीचा इमामबाडा विशेष मानला जातो. किल्ल्याच्या भुयारातून या इमामबाड्याकडे जायचा रस्ता होता. राणी लक्ष्मीबाईसुध्दा याच भुयारातून मुंबाती जातीच्या इमामबाड्यात दर्शनासाठी येत असे.
प्रत्येक जातीचा ताजीया मोहर्रमच्या जुलूसमध्ये सहभागी होताना, त्याची सजावट एका विशिष्ट पध्दतीने केली जात होती. याशिवाय काही हिंदू व्यक्तींकडूनदेखील ताजिया काढला जायचा. यातील बाबूला यांचा ताजिया अद्याप झांशीमध्ये सरु आहे. हा ताजिया मोहल्ला नौमध्ये सजवला जात होता. त्यांच्या वडीलांनी आपली एक खोली ताजियासाठी राखून ठेवली होती. बाबूलाल यांचे पिता ग्वाल्हेरमध्ये ताजिया बनवण्याचे काम करत असत. त्यामुळे त्यांनी मोहर्रममध्ये ताजिया बनवण्याची परंपरा झांशीमध्ये सुरु केली. बाबुलाल यांच्या या ताजियामुळे झांशी शहरात अन्य हिंदू व्यक्तींचेही ताजिये सुरु झाल्याचे दिसते. त्यामुळे आजही ताजियांच्या मिरवणूकीत काही हिंदू ताजिये झांशीत दिसतात.
सुन्नी ताजिया
शिया ताजिया प्रमाणे सुन्नी ताजियांची देखील एक परंपरा होती. सुन्नी ज्यावेळी ताजिया काढत त्यावेळी 'या अली' ही घोषणा मोठ्याने देत असत. मोहर्रमध्ये महिला नोहा हा काव्यप्रकार सादर करायच्या. गरीबांसाठी सुन्नी लोकांकडून लंगर चालवले जात. मोहर्रमच्या नऊ तारखेपर्यंत ताजियांच्या मिरवणूका काढल्या जात. आणि दहा मोहर्रमला ताजिया दफन केले जात.
मोहर्रमच्या काळात झांशीमध्ये मर्सिया सादर करण्याचे कार्यक्रमदेखील केले जात. मर्सिया सादर करणारे कवी, गायक, संगीतकार झांशी शहरामध्ये बोलावले जात. नोहा गाणाऱ्या काही महिला या बाहेरून झांशी शहरात येत होत्या, असेही उल्लेख आढळतात. शियांच्या तुलनेत सुन्नींचा मोहर्रम हा वेगळा होता.
याकाळात सुन्नींमध्ये वेगवेगळ्या जमातींकडून शहरात काही ठिकाणी व्याख्यानाचे आयोजन केले जाई. ज्यापध्दतीने शिया हे प्रेषितांचे नातू इमाम हुसैन यांच्या बलिदानाची आठवण सांगून शोक करायचे, तीच पध्दत थोड्याशा वेगळ्या रुपात व्याख्यानांच्या द्वारे सुन्नी विचारवंतांनी प्रचलीत केली होती. झांशीची राणी लक्ष्मीबाई अशा काही व्याख्यांनाना उपस्थित राहत असे. सोबतच मर्सियाच्या काही कार्यक्रमांनादेखील राणी लक्षमीबाईने हजेरी लावत असे. त्यातील महत्वाच्या कलाकारांना राणीकडून बक्षिसे दिल्याच्या नोंदीही आढळतात.
सन १८५१ पासून राणी लक्ष्मीबाईने ताजिया काढण्याच्या झांशीच्या परंपरेत काही वेगवेगळे प्रयोगदेखील करुन पाहिले. झांशीचा मोहर्रम आधिक आकर्षक आणि देशभरात चर्चेचा विषय होईल, यासाठी झांशीची राणी सातत्याने प्रयत्नशील होती.
झांशीच्या मोहर्रमला जशा मुसलमनांतील शिया आणि सुन्नींच्या वेगवेगळ्या प्रथांचा इतिहास आहे तसा हिंदू परंपरांचाही इतिहास आहे. त्यामुळे झांशीचा मोहर्रम हा भारतातल्या इतर राज्यात आणि शहरात होणाऱ्या मोहर्रमच्या तुलनेत महत्त्वाचा आणि वेगळा आहे.
- सरफराज अहमद
(लेखक मध्ययुगीन इतिहासाचे अभ्यासक आहेत.)