भारतीय स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक सुभाष चंद्र बोस.त्यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी कटक येथे झाला. ओडिशा येथे पेशाने वकील असलेल्या जानकीनाथ बोस आणि प्रभावती देवी यांचे ते अपत्य. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान अतुलनीय राहीले आहे. त्यामुळेच दरवर्षी, त्यांची जयंती अत्यंत अभिमानाने आणि आदराने साजरी केली जाते. विशेषत: त्यांच्या जन्मस्थानी, कटकमध्ये मोठ्या उत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा त्यांची १२८ वी जयंती जवळ येत असताना, कटक शहर आपल्या या नामवंत मुलाला सन्मानित करण्यासाठी भव्य सोहळ्याची तयारी करत आहे. त्यांचा हा जन्मदिवस पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो.
या १२८व्या जयंतीचे भव्य आयोजन २३ जानेवारीपासून २५ जानेवारी २०२५ पर्यंत ओडिशाच्या कटक शहरातील ऐतिहासिक बाराबती किल्ल्यात होणार आहे. या तीन दिवसीय सोहळ्याचे उद्घाटन ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी २३ जानेवारी रोजी करतील.
भारत सरकारने नेताजींच्या जयंतीला ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतल्यापासून विविध ठिकाणी भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. २०२१ मध्ये हा दिवस कोलकात्याच्या व्हिक्टोरिया मेमोरियल येथे साजरा करण्यात आला. २०२२ मध्ये इंडिया गेट येथे नेताजींचा होलोग्राम पुतळा उभारण्यात आला, तर २०२३ मध्ये अंदमान-निकोबारमधील २१ नामनिर्देशित बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे देण्यात आली. २०२४ मध्ये पंतप्रधानांनी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यात INA च्या खटल्याच्या स्थळी हा दिवस साजरा केला होता.
यंदा पराक्रम दिवसाचे कटक येथे विशेष आयोजन
पराक्रम दिवस २०२५ च्या निमित्ताने संस्कृती मंत्रालयाच्या वतीने कटकमध्ये भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नेताजींच्या जन्मगृहात आता संग्रहालयात रूपांतरित झाले आहे. त्याठिकाणी मुख्यमंत्री व अन्य मान्यवर नेताजींना अभिवादन करून राष्ट्रीय ध्वज फडकवतील. त्यानंतर बाराबती किल्ल्यातील मुख्य कार्यक्रमाची सुरुवात होईल.
या सोहळ्यात पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश, तसेच नेताजींच्या जीवनावर आधारित दुर्मीळ छायाचित्रे, पत्रे व दस्तऐवजांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. तसेच, ए.आर./व्ही.आर. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नेताजींच्या ऐतिहासिक प्रवासाचा आभासी अनुभव उपस्थितांना घेता येणार आहे.
संस्कृती आणि कला कार्यक्रमांची असणार रेलचेल
या कार्यक्रमावेळी शिल्प कार्यशाळा व चित्रकला स्पर्धा,नेताजींवरील माहितीपटांचे प्रदर्शन आणि ओडिशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशावर आधारीत विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पराक्रम दिवस २०२५ हा भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अद्वितीय योगदानाला सलाम करणारा सोहळा ठरणार आहे.