उर्दू भाषेने भारतीय परंपरा आणि इतिहासाची दखल निरनिराळ्या साहित्यकृतीतून घेतली आहे. १८ व्या शतकाच्या सुरुवातीपासून उर्दू साहित्यात दिवाळीविषयी लिखाण आढळते. मसनवी, रुबाया, मुआम्स, गजला, शायरी अशा सर्व प्रकारात दिवाळीच्या प्रथा, परंपरा वेगवेगळ्या प्रादेशिक पट्ट्यातील दिवाळीची वैशिष्ट्ये यावर लिखाण झाले आहे. उर्दूचे महाकवी गालीब स्वतः दिवाळी साजरी करत असे.
दिवाळीविषयी गालीबने लिहीलेले शेऱ उपलब्ध नसले तरी अप्रत्यक्षपणे त्याने हिंदू परंपरा आणि उत्सवांची दखल घेतली आहे. गालीबच्या समकालीन असणाऱ्या मुगल बादशाह बहादुरशाह जफर यांनी लाल किल्ल्यामध्ये दिवाळी साजरी करण्याची परंपरा पुढे सुरु ठेवली होती. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लालकिल्ल्यात दिवे लावले जात होते. चांदणी चौकात बादशाहच्या आदेशाने मोठे कंदील महिनाभर लटकावून ठेवले जाई. दिवाळीच्या काळात विशेष मुशायऱ्याचे देखील आयोजन केले जात.
आधुनिक काळात उर्दूच्या विकासात गालीबसोबत सर सय्यद यांचेही योगदान महत्वपूर्ण आहे. सर सय्यद यांनी भारतीय राष्ट्रवादाची व्याख्या करतांना गंगा जमनी संस्कृतीचा आधार घेतला आहे. त्यामुळे हिंदू परंपरा आणि उत्सवात सहभागी होण्याविषयी त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती. त्यांनी एकदा “हिंदू सणात हिंदूना, नवरोजमध्ये पारसी मित्रांना, ख्रिसमसमध्ये इसाई मित्रांना शुभेच्छा दिल्याने आपण काफीर होणार नाही,” असे मत मांडले होते. त्यांनी मोहमेडन कॉलेज आणि अन्य संस्थांमध्ये दिवाळी साजरी करण्यासाठी वेगवेगळे उपक्रमदेखील आयोजित केले होते. अलीगडमधील अनेक हिंदू मित्रांकडून त्यांनी दिवाळीची भेट म्हणून आपल्या महाविद्यालयासाठी देणग्याही स्विकारल्या होत्या.
उर्दू शायरी आणि दिवाळी
नजीर अकबराबादी हे उर्दूचे जनकवी (अव्वामी शायर) म्हणून ओळखले जातात. सामान्य माणसाच्या जीवनातील समस्या, त्याची अभिव्यक्ती यावर त्यांची शायरी केंद्रीत होती. त्यामुळे त्यांनी वापरलेली भाषादेखील अतिशय सामान्य होती. नजीर अकबराबादी यांनी अनेक कव्वालीही लिहील्या आहेत. दिवाळीवर लिहीलेले त्यांचे काही शेर महत्वाचे आहेत.
“हर एक मकान में जला दिया दिवाली का
हर एक तरफ को उजाला हुआ दिवाली का
सभी के दिल में समा भा गया दिवाली का
किसी के दिलको मजा खुष लगा दिवाली का
जहां मे यारो अजब तरह का है यह त्योहार
किसीने नकद लिया कोई करे है उधार”
उर्दू शायरी शब्दसौंदर्याने नटलेली असते. पण नजीर अकबाराबादी अतिशय सामान्य भाषेत शेर लिहायचे. त्याचा प्रत्यय त्यांच्या दिवाळीवरील या शेरमध्ये येतो.
नजीर अकबराबादी यांच्या अव्वामी शायरीनंतर हामीदुल्ला मेरठी यांनी दिवाळीवर लिहीलेल्या शायरीवर उर्दूत सातत्याने चर्चा होत असते. हमीदुल्ला मेरठी हे उर्दूतील लोकप्रिय लघुकथाकार आहेत. टिकाकार म्हणून देखील त्यांना ओळखले जाते. नव्या पिढीचे कवी म्हणून ते उर्दूत परिचित आहेत. दिवाळीवर लिहीलेल्या शेरमध्ये ते म्हणतात,
“तारें हैं आकाशातले जगमग जगमग दिप जले
आई फिर दिवाली आई घर घर सुख की जुत जुगाई
चेहरों पर खुषहाली आई, निकला बनसे सुख का तारा
हो गया सारा जग उजीयारा
है यह मंजर कितना प्यारा
तारे हैं आकाशतले जगमग दिप जले”
अनेक हिंदी संगीतकारांनी हामीदुल्ला यांची ही शायरी स्वरबध्दही केली आहे. नजीर अकबराबादी यांच्याप्रमाणेच हमीदुल्ला यांची ही शायरी देखील सामान्य भाषेतच आहे. पण दिवाळीवर गजलशैलीतील उर्दूतदेखील शायरी करण्यात आली आहे. गुलाम रब्बानी यांनी असे शेर लिहीले आहेत. ते प्रागतिक उर्दू साहित्य चळवळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरक्कीपसंद तहरीक ए मुसन्निफैनचे सदस्य होते. स्वातंत्र्यासाठी घेतलेल्या भुमिकांमुळे इंग्रजी सत्तेचा रोषही त्यांना पत्करावा लागला होता. १९७९ मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. दिवाळीवर लिहीलेल्या शेरमध्ये ते म्हणतात,
“यह टिमटिमाते दिए लक्ष्मी के चरणों में
सभी ने हुस्न अकीदत के फुल डाले हैं
वो जिनको लक्ष्मी देवी से कुर्ब हासील नहीं
घरों में अपने भी दिप जलाए बैठे हैं।
शिकस्ता झोपडीयों को सजाए बैठे हैं।
के उसतरफ भी इनायत की एक नजर हो जाए
मगर वो भुलते हैं,
शिकस्ता झोपडीयों, टुटे फुटे खंडरों में कभीभी लक्ष्मी देवी ना मुस्कुराएगी ”
गुलाम रब्बानी यांच्यानंतर शेख जहुरुद्दीन हातीम या सुफी परंपरेतल्या शायरने दिवाळीवर कविता लिहील्या आहेत. ते वली दखनी या कदीम उर्दू म्हणजेच दखनी भाषेच्या सुरुवातीच्या काळातील कवीला आपला गुरु मानत होते. शाह मोहम्मद अमीन या दिल्लीतील सुफीचे ते शिष्य होते. पैशाने लष्करात सैनिक म्हणून ते कार्यरत होते. फारसी आणि उर्दू भाषेत ते कविता करत होते.
“कतार ऐसी चिरागों की बनाई
किताबों पर हों जदोलतलाई
दर व दिवार बाम व सीहन व गुलशन
चिरागों हुआ है रोज रौषन”
दिवाळी हा सण वसाहतकाळात नुसत्या हिंदू परंपरांचा भाग नव्हता. मुसलमान देखील तो मोठ्या प्रमाणात साजरा करत होते. अनेक मुस्लिम शहरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजार भरवले जात होते. बनारससारख्या शहरात मुस्लिम विणकर मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे दिवाळी हा सण बनारसच्या विणकरांसाठी पर्वणी ठरत होता. त्या पार्श्वभमीवर अख्तर बनारसी या फारशी माहिती उपलब्ध नसलेल्या शायरने
“दिवाली आई है, खुशीयों की दिद लायी है,
गंगा घाट में नयी रौषनी छायी है।”
अशी दिवाळीची दखल घेतली आहे. अख्तर बनारसी यांच्यानंतर बनारसच्या नजीर बनारसी यांनीही दिवाळीवर शेर लिहीला आहे. उर्दू शायरीत वर्तमान राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे शायर म्हणून नजीर बनारसी ओळखले जातात. बनारसमध्ये राहत असल्याने गंगा जमनी संस्कृती हा त्यांच्या शायरीचा मुख्य विषय राहिला. त्याशिवाय देशप्रेम, भारतीय संस्कृती याविषयीदेखील त्यांनी उर्दू शायरी आणि गजलांमध्ये लिखाण केले आहे. पवित्र गंगाजल, शंकराची वैशिष्ट्ये त्याचे गुणगौरव हे देखील त्यांच्या शायरीचे विषय होते. त्यांचे काव्यसंग्रह ‘गंगवजम’ हे गंगा जमनी संस्कृतीवर आधारीत आहे. फिराक गोरखपुरी यांनी या काव्यसंग्रहाची प्रस्तावना लिहीली आहे. दिपावली या शिर्षकाने त्यांनी एक नजम लिहीली आहे. त्यात ते म्हणतात,
“मेरी सांसो को गीत और आत्मा को साज देती है
यह दिवाली है सबको जीने का अंदाज देती है।
हृदय के द्वार पर रह रह के देता है कोई दस्तक
बराबर जिंदगी आवाज पर आवाज देती है।
समीटता है, अंधेरा पांव फैलाती है दिवाली
हसाए जाती है, रजनी हसे जाती है दिवाली।
कतारे देखता हूं चलते फिरते, माह पारों की
घटाएं आंचलों की और बरखा है सितारों की।
वह काले काले गेसू सुर्ख ओंठ और फुलसे आरीज
नगर में हर तरफ परियां टहलती हैं। बहारों की।”
नजीर बनारसी यांनी ज्यापध्दतीने दिवाळीवर शायरी केली आहे. त्याचपध्दतीने दसरा आणि होळीवरदेखील त्यांच्या वेगवेगळ्या कवितांमध्ये काही उल्लेख येतात. उर्दूत दिवाळीवर लिखाण करणाऱ्या शायरांमध्ये स्वातंत्र्योत्तर काळातील हैदर बियाबानी यांचा समावेश होतो. पण हैदर बियाबानी यांची शायरी ही प्रौढ शायरी नाही तर ती बालकवितांच्या प्रकारात मोडणारी आहे. बच्चों की नजमें या नावाने जो काव्यप्रकार उर्दूत हाताळला जातो. त्यात बियाबानी यांनी दिवाळीवर कविता केल्या आहेत. ते एका कवितेत लिहितात,
“दिवाली के दिप जले हैं
यार से मिलने यार चले हैं।
चारो जानीब धुमधडाका
छोटे रॉकेट और पटाखा”
उर्दू शायरी ही संमिश्र ऱाष्ट्रवादाचा पुरस्कार करणारी भारतीय परंपरेची कविता आहे. उर्दू कवींनी ज्या पध्दतीने इस्लामी प्रतिकांना आपल्या शायरीत प्रतिनिधित्व दिले. त्याचपध्दतीने त्यांनी दिवाळीला शायरीत आणले. वर दिलेल्या प्रातिनिधीक कवींव्यतिरिक्त अनीस मोईन, जमील मजहरी, उबेद आजम आजमी, शकीब जलाली, कैफ भोपाली, मोहम्मद अल्वी, अजम शाकरी, निशोर वाहीदी, मुमताज गोरमानी, शाद आरफी आणि जमनाप्रसाद राही यांनीही दिवाळीवर कविता लिहील्या आहेत.
- सरफराज अहमद, सोलापूर