'नामयाचा तुका, ज्ञानाचा एका आणि कबिराचा शेखा' अशी गुरू-शिष्य परंपरा वारकरी विचारधारेत सांगितली जाते. वारकऱ्यांनी विविध धर्म, पंथ, जातींचा समन्वय घातला. त्यात निर्गुण-निराकाराची आराधना करणारे संत कबीर आणि त्यांच्या विचारांनाही सामावून घेतलं गेलं. श्रीगोंद्याच्या शेख महंमदांनी कबिरांचे मानवतेचे विचार पुढं नेले.
हिंदू-मुस्लिम एकात्मतेचं प्रतीक असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातील संत शेख महंमद बाबांनी वारकरी चळवळ नुसती जपलीच नाही, तर ती वाढवलीही. पुणे जिल्ह्यातील दौंडच्या जवळ आणि अहमदनगरपासून ७० किलोमीटरवरील श्रीगोंदेनगरीत गेल्यावर संत शेख महंमद महाराज यांच्याविषयी गावात कोणालाही विचारा. 'आमचे बाबा' म्हणून प्रत्येक जण तुम्हाला आपुलकी आणि आदरानं बाबांविषयी सांगायला सुरवात करेल.
श्रीगोंद्यात मुख्य पेठेतील शनी मंदिर, त्याभोवती पोलिस ठाणे आणि तहसील कार्यालयाच्या इमारती, त्याच चौकातून दक्षिणेला गेलं की, शेख महंमद महाराजांचं मंदिर दिसतं.
पत्नीसह शेख महंमद महाराजांची समाधी
संत शेख महंमदबाबा ऊर्फ महाराज यांच्या पूर्व आणि उत्तरमुखी असणाऱ्या मंदिरात बाबांची समाधी दक्षिणमुखी आहे. आत हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या एकात्मतेचा संदेश देणारं दृश्य आहे. बाबांनी त्यांच्या पत्नीसह संजीवन समाधी घेतली आहे. बाबांचे गुरू चाँदबोधले महाराज यांची प्रतीकात्मक समाधीही तिथंच आहे. समाधी मंदिराबाहेरील बाजूला बाबांच्या नारायण नावाच्या घोड्याची समाधी आहे.
ग्रामदैवत आणि एकात्मतेचं प्रतीक
श्रीगोंदे शहर हे भीमा आणि घोड नद्यांच्या सान्निध्यात, दक्षिणवाहिनी असणाऱ्या सरस्वती नदीच्या काठावर वसलेलं आहे. या शहरात यादवकालीन मंदिरं आहेत. लक्ष्मी-पांडुरंग मंदिर म्हणजे प्रतिपंढरपूर समजलं जातं. लक्ष्मी-नारायण मंदिर, सूर्यमंदिर, अष्टभैरव, अष्टविनायक, बारा ज्योतिर्लिंग (महादेव), नवचंडिका, अकरा मारुती मंदिर, खंडोबा मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, भैरवनाथ मंदिर, कार्तिकस्वामी मंदिर अशा विविध धार्मिक स्थळांनी व्यापलेल्या शहराचं ग्रामदैवत आहे, संत शेख महंमद महाराज अथवा बाबा यांचं मंदिर!
संत शेख महंमद महाराज है हिंदू-मुस्लिम एकात्मतेचं प्रतीक. श्रीगोंदा तालुक्यातीलच नव्हे, तर राज्यासह परदेशांतील भाविकही त्यांच्या दर्शनासाठी येतात. परदेशातील अनेक अभ्यासकांनी संत शेख महंमद महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करून, कार्य समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना कुणी महाराज म्हणतं, तर कुणी बाबा संबोधतं. त्यांच्या स्थानाला कुणी मंदिर म्हणतं, कुणी मठ, कुणी दर्गा; मात्र सगळे जेव्हा एकत्र येतात, त्या वेळी ते केवळ भाविक असतात.
वारकरी संप्रदायातील या मुस्लिम संत कवीनं अनेकांना आपल्या प्रतिभेनं भुरळ पाडली. त्यांच येथील मंदिर आणि दर्गा एकत्र आहे. हिंदू आणि मुस्लिम समाज एकत्र येऊन इथं यात्रोत्सवातह इतर पारंपरिक उत्सव साजरे करीत असतात. संत शेख महंमद महाराज यात्रोत्सव प्रतिष्ठान आणि शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्ट, असे दोन भाग या देवस्थानामध्ये आहेत.
औरंगजेबही झाला होता प्रभावित
संत शेख महंमद महाराजांचा कार्यकाळ सोळाव्या आणि सतराव्या शतकातला मानला जातो. त्यांना भागवत धर्मात अतिशय मानाचं स्थान आहे. तत्कालीन ऐतिहासिक स्थितीचा विचार केला, तर त्यांच्या ऐक्याच्या कार्याची महती पटते.
हिंदू-मुस्लिम समाजात टोकाचे मतभेद होते; मात्र आपल्या समतेच्या विचारांनी बाबांनी दोन्ही समाजांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. भागवत धर्माची आणि सूफी संतपरंपरा त्यांनी आपल्या विचारांतून आणि कार्यातून पुढं नेली.
देहूप्रमाणेच त्या काळी श्रीगोंदेनगरी अध्यात्माचं केंद्र बनली होती. बाबांनी अभंग आणि कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केलं. त्यांनी हिंदीसह मराठीतही अभंगरचना केली आहे. सर्वसामान्य लोकांसह राज्यकर्तेही त्यांचे भक्त होते.
बाबांच्या समतेच्या कार्यानं औरंगजेबही प्रभावित झाला होता, असे म्हणतात . मराठ्यांच्या पाडावासाठी तो दक्षिणेत आला, तेव्हा त्यानं वाहिरा इथे भेट देऊन बाबांच्या कार्याची माहिती घेतल्याचे सांगितले जाते. त्यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन औरंगजेबाने तब्बल ४०० एकर जमीन बाबांसाठी दिल्याचा उल्लेख ऐतिहासिक दस्तऐवजांत सापडतो.
समन्वयाचा संदेश
संतमंडळींचा चमत्कारावर विश्वास नव्हता, परंतु त्यांनी काही चमत्कार केल्याच्याही आख्यायिका भाविकांत आहेत. मात्र, त्यांचा भर अंधश्रद्धा निर्मूलनावर होता. त्यांची अभंगरचनाच याचा दाखला आहे.
ऐसे केले या गोपाळे।
नाही सोवळे ओवळे ।।
काटे केतकीच्या झाडा।
आत जन्मला केवडा ।।
यातून त्यांची प्रतिभा तर दिसतेच, परंतु बहुजन समाजाविषयीची तळमळही दिसते. सद्गुरू आणि पिराचं ऐक्य सांगताना ते म्हणतात,
सद्गुरू साचे पिरू।
दो भाषांचा फेरू।।
नाही बिन्ना तारू।
ज्ञान विवेकी ।।
हिंदू आणि मुस्लिम धर्माचा त्यांनी चिकित्सक अभ्यास केला होता. सर्व धर्म, पंथ एक आहेत. त्यामुळे द्वैतभाव कोणातही नाही, असा समतेचा झेंडा मिरवताना ते अभंगात म्हणतात,
जैसे एका झाडा।
पत्रे फांद्या निवडा ।।
तैसा भाषा पवडा।
गुरू पिरांचा ।।
शेख महंमद महाराजांचा उल्लेख रामभक्त कबिराचा अवतार असा केल्यानं, अध्यात्मातील त्यांचं स्थान किती वरचं होतं, याचा प्रत्यय येतो. शेख महंमद महाराजांचा जन्म आणि समाधी काळाविषयी अभ्यासकांमध्ये एकमत दिसत नाही. तरीही उपलब्ध साधनांच्या आधारे त्यांचा जन्म साधारणतः १५७५ मध्ये धारूरच्या किल्ल्यावर झाल्याचं मानलं जातं. त्यांचे वडील राजमहंमद यांचं मूळ गाव वाहिरा (ता. आष्टी जि. बीड) येथील असल्याचं सांगितलं जातं.
सोळाव्या शतकात संत शेख महंमद महाराजांनी केलेल्या सांप्रदायिक कार्याचा गौरव आजही सुरू आहे. शेख महंमद महाराजांच्या अभंगांमध्ये अफझलखानाच्या स्वारीचा वेढा आणि पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती लपविल्याचा उल्लेख येत असल्यानं महाराज इसवी सन १६५९ पर्यंत हयात होते, असं अभ्यासकांना वाटतं.
मालोजीराजे भोसले यांनी केलेल्या चकनाम्याची घटना इसवी सन १५९५च्या सुमाराची आहे. दौलताबादहून श्रीगोंद्याला येण्यापूर्वी शेख महंमद महाराजांची कीर्ती या परिसरात होती. शेख महंमद यांचे वडील दौलताबादच्या किल्ल्यावर हवालदार म्हणून बादशहाच्या चाकरीत होते. तिथंच शेख महंमद महाराजांना चाँदबोधले ऊर्फ चंद्रभट ऊर्फ कादरी चाँदसाहेब यांच्याकडून गुरुपदेश मिळाला.
नगरच्या निजामशाहीत मालोजीराजे कर्तबगार सरदार होते. आद्यकवी परमानंद यांच्या 'शिवभारत' ग्रंथानुसार पांडे पेडगाव हा मालोजीराजेंकडं मकासा म्हणून होता. चाँदबीबीच्या काळात मालोजीराजे यांनी शेख महंमद यांना श्रीगोंद्यात आणलं. त्यांना इथं मठ बांधून दिला. मठासाठी जमीन इनाम दिली. महाराजांनी श्रीगोंद्यात मकरंदपुरा पेठही वसवली. इसवी सन १५९५ मध्ये मालोजीराजे गुरूंच्या सान्निध्यात एक वर्ष मुक्कामी होते, असं अभ्यासक सांगतात.
बाबा आणि तुकाराम महाराजांची मैत्री
देहू इथं संत तुकाराम महाराज यांचे कीर्तन सुरू होतं. त्या वेळी मंडपास अचानक आग लागली. इकडं श्रीगोंद्यातही शेख महंमदबाबा यांचं प्रवचन सुरू होतं. मात्र, अंतर्ज्ञानी बाबांना देहूतील ती आग दिसली. त्यांनी श्रीगोंद्यातूनच हाताने मंडपाला लागलेली आग विझविली, म्हणजे कृती केली. त्यात त्यांच्या हाताला जखम झाली, अशी आख्यायिका आहे.
संत शेख महंमद महाराज हे पंढरपूरची वारी करीत असल्याचा दाखला आहे. शिवाय, संत तुकाराम महाराज हे शेख महंमद महाराजांना भेटाण्यासाठी शहरातील गणपती मळा (मांडवगण रस्ता) इथं आल्याचेही दाखले मिळतात. तिथं त्यांनी संत शेख महंमदबाबा यांच्यासह राऊळबुवा, गोदडबुवा आणि प्रल्हाद महाराज यांच्याशी आध्यात्मिक चर्चा केली, अस अभ्यासकांचं म्हणणं आहे. योगसंग्राम, पवनविजय आणि निष्कलंक प्रबोध हे ग्रंथ महाराजांनी लिहिलेत. बाबांच्या जन्मोत्सवात योगसंग्राम या ग्रंथाचं पारायण होतं.
भजन, पारायण आणि कुराण पठण
आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांप्रमाणे इथंही शेख महंमद महाराज यांची संजीवन समाधी आहे. याच समाधिस्थळाला श्रीगोंदेवासी ग्रामदैवताचा मान देतात. दरवर्षी होणाऱ्या यात्रोत्सवात हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र येत सण साजरा करतात. याच दरम्यान ज्ञानेश्वरी ग्रंथाचं सात दिवस पारायण होतं. यावेळी राज्यातील प्रख्यात कीर्तनकार तिथं येतात. महाराजांच्या समाधिस्थळी होणाऱ्या चंदनलेप कार्यक्रमात हिंदू-मुस्लिम एकत्र असतात. त्याचा मान मोटे पाटील कुटुंबाला असतो. महाराजांचे वंशज शेख कुटुंब या यात्रोत्सवात सहभागी होतं. शहरातील मुस्लिम महिला कुराण पठण करतात. कव्वालीचा कार्यक्रम महत्त्वाचा असतो. दर गुरुवारी आणि एकादशीला रात्रीचं भजन असतं. एकाच ठिकाणी हिंदूंचं मंदिर आणि मुस्लिमांचं कुराण पठण होणाऱ्या या स्थळाला समन्वयाचा आध्यात्मिक वारसा आहे.
विकासाकडं दुर्लक्षच
श्रीगोंद्यातील कोणत्याही शुभकार्याची सुरवात बाबांच्या समाधीच्या दर्शनानं होते. यात राजकारणी मंडळी आघाडीवर आहेत. नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि विधानसभा या निवडणुकामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बाबांच्या समाधीचं दर्शन घेऊनड सभा सुरू होतात. जो उमेदवार विजयी होईल, त्याचा सत्कार बाबांच्या मंदिरात होतो. मात्र, इतर वेळी ही मंडळी या धार्मिक स्थळाकडं दुर्लक्ष करताना दिसतात.
तालुक्याचं ग्रामदैवत मानले जाणाऱ्या संत शेख महंमदबाबांच्या समाधिस्थळाच्या परिसराला सरकारी मदत मिळवून देण्यासाठी काही निर्णय होणं आवश्यक आहे. तरच समन्वय, सलोख्याचा संदेश देणाऱ्या या स्थळाचं महत्व अधोरेखित होईल. महाराष्ट्रासह भारतातील भाविकांचा, अभ्यासकांचा ओघ श्रीगोंदेनगरीकडे येईल.
- संजय आ. काटे
(पूर्वप्रसिद्धी - सकाळ विठाई विशेषांक २०१९)