'शहा मुतबजी ब्रह्मणी, जिनमे नहीं मनामनी,
पंचीकरण का खोज किए, हिंदू-मुसलमान एक कर दिए,'
अशी रचना करून एकात्मतेचे महत्त्व सांगणारे शहा मुंतोजी बामणी (मृत्युंजय) यांनी मध्ययुगीन मराठी संतसाहित्यात मोठे योगदान दिले होते. अध्यात्म, तत्त्वज्ञान, संगीत, ज्योतिषशास्त्र, योग आदी विषयांसोबत पंचीकरण या परिभाषाकोशाची निर्मीती करणारे ते अवलिया संत होते.
शहा मुंतोजी बामणी यांनी मराठी साहित्यविश्वात विपुल रचना केल्या. मूर्तजा कादरी हे त्यांचे मूळ नाव होते. त्यांना कादरी आदी होते. मृत्युंजय स्वामी, शहा मुतबाजी , ज्ञानसारनंद, ज्ञानसागर अय्या या नावानेही ओळखले जाते.
आनंद संप्रदायातील सहजानंद हे त्यांचे गुरू होते. त्यांनी त्यांना मृत्युंजय जाते. हे नाव दिल्याचे म्हटले ते नाथ समकालीन अथवा त्यानंतरच्या कालावधीतील आणि शिवपूर्वकालीन संतकवी होते. त्यांच्या प्रमुख रचनांमध्ये सिद्धसंकेतप्रबंध, अनुभवसार किंवा अमृतसार, अद्वैतप्रकाश, स्वरूपसमाधान, प्रकाशदीप, जीवौद्धरण, पंचीकरण, गुरुलीला, पदे, अभंग इत्यादींचा समावेश आहे. अमृतानुभव नावाचा एक ग्रंथही त्यांच्या नावावर आहे.
पंचीकरण हा ग्रंथ त्यांनी दख्खनी हिंदीत लिहिलेला आहे. त्यांचा सिद्धसंकेत हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ असून तो अपूर्ण असला तरी समाजमनावर त्याचा मोठा प्रभाव होता, असे संशोधकांचे म्हणणे आहे. अविंध पंचीकरण, हिंदू-इस्लाम दर्शन-परिभाषाकोश आणि प्रकाशदीप या ग्रंथाच्या रचनांतून त्यांनी त्यावेळी विविध प्रकारचे तत्त्वज्ञान मांडले. त्यांच्यावर वारकरी पंथासोबतच नागेश, आनंददायी, नाथसंप्रदाय आणि लिंगायत आदी संप्रदायाच्या विचारांचाही प्रभाव होता. त्यातूनच त्यांनी भेदाभेद कमी होऊन मानवतेचे मूल्यविचार रुजावेत यासाठीचे तत्त्वज्ञान मांडले.
संत मुंतोजी सिद्धसंकेत ग्रंथातील योगशास्त्रावर त्यांनी केलेले विवेचन नाथ संप्रदायाशी त्यांचे असलेले नाते प्रकट करतो, तर त्यांच्या असंख्य रचनांमधून वेळोवेळी ज्ञानेश्वरीविषयी आदरभाव कायमच प्रकट झालेला आहे. विवेकसिंधूचाही काही रचनांवर प्रभाव असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांच्या एकूणच रचनांतून हिंदू-मुस्लिम ऐक्याची भूमिका दिसून येते. त्यांनी निर्माण केलेला परिभाषाकोश हे सर्वांत मोठे योगदान असल्याचे संशोधक म्हणतात. त्यांच्या साहित्यावर प्रामुख्याने डॉ. यु. म. पठाण, डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. शं. गो. तुळपुळे आदींनी विपुल लेखन केले आहे.
संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सतीश बडवे यांनी सांगितले की, "संत मुंतोजी म्हणजेच मृत्युंजय स्वामी हे नाव हिंदू आणि मुस्लिम परंपरेत एकता आणि समता निर्माण करणारे आहे. हिंदू-मुस्लिम भेदच नाहीसा व्हावा, या अर्थाने त्यांच्या रचना आहेत. त्यांचा सिद्धसंकेत ग्रंथ अजूनही पूर्ण अवस्थेत उपलब्ध होऊ शकला नाही; परंतु त्यांच्या वैविध्यपूर्ण रचनांनी मराठी साहित्य विश्वात मोठी भर घातली."
मुस्लिम संतसाहित्याचे अभ्यासक प्रा. जावेश पाशा कुरेशी म्हणतात, "भारतीय संस्कृती संघर्षान नव्हे, तर चांगले ते स्वीकारण्याच्या परंपरेने घडलेली, नटलेली आहे. यात विविध परंपरा, प्रवाह आहेत. मध्ययुगातील सूफी आणि संतांचा भक्तिप्रवाह हा एकात्मतेचा 'अमृतकाळ' आहेच. या परंपरेने तळागाळातील लोकांना ईश्वरीय संदेश त्यांच्या घरात, शेतात, रानात आणि त्यांच्या कष्टात पोहोचविला. देव, अल्ला मंदिर, मशिदीच्या बाहेर जनसामान्यात नेण्याचे अमूल्य कार्य संतांनी केले आहे. त्या दृष्टीने संत मुंतोजी यांचे कार्य मोलाचे आहे."
संजीव भागवत
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -