हाजी सलमान चिश्ती
सुलतान-उल-हिंद म्हणून ओळखले जाणारे ख्वाजा गरीब नवाज यांची अजमेरमधील 11व्या शतकातील दर्गाह शांती, प्रेम आणि आध्यात्मिक आश्रयाचे एक शाश्वत प्रतीक आहे. सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असणारी ही दर्गा भारताच्या गौरवपूर्ण इतिहासाचा एक भाग आहे, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे ही वास्तू आपल्या सर्वसमावेशक आणि सौहार्दपूर्ण आध्यात्मिक वारशाचे जिवंत उदाहरण आहे. अनेक शतकांपासून ही दर्गाह सर्वसमावेशकता, वैश्विक बंधुत्व आणि मानवसेवा यांचा संगम असलेल्या चिश्ती सूफी तत्त्वज्ञानाचे प्रतीक म्हणून ओळखली जाते.
मात्र गेल्या काही काळापासून द्वेषमूलक आख्यायिका पसरवून सांप्रदायिक फूट पाडण्यासाठी एक वर्ग प्रयत्नशील आहे. त्यांनी दर्गाह शरीफविषयी अजमेरच्या दिवाणी न्यायालयात दिशाभूल करणारी याचिका दाखल केली आहे. संविधानिक संस्थांचा गैरवापर करून विभाजनात्मक अजेंड्यांना पुढे ढकलणाऱ्या प्रथेचा हा नवीन नीचतम बिंदू ठरला आहे. असे करून या मंडळींनी केवळ पवित्र दर्गाहचाच अपमान केलेला नाही, तर भारताच्या धार्मिक सौहार्दालाही धक्का पोहोचवला आहे.
ख्वाजा गरीब नवाज यांनी आपल्या शिकवणूकीद्वारे आयुष्यभर सर्वसमावेशकता आणि सगळ्या सृष्टीप्रती प्रेम यांचाच आग्रह धरला. त्यामुळे त्यांची दर्गाह सर्व जाती-धर्माच्या भाविकांसाठी नेहमीच आश्रयस्थान राहिली. आज काही व्यक्ती आणि संस्थांमुळे हे सर्वसमावेशी तत्त्वज्ञान धोक्यात आले आहे. या मंडळींनी धार्मिक भावनांचे राजकारण करत अजमेर शरीफच्या आणि आपल्या भारताच्या पावित्र्यावर जणू हल्लाच केला आहे.
धार्मिक शांततेला आणि सद्भावाला नख लावण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही. ऐतिहासिक आणि धार्मिक आख्यायिकांचा वापर करून समाजात अराजकता पसरवणाऱ्या मोठ्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे. या याचिकांच्या मागे असलेले लोक समाजात फूट पाडण्याचे आणि सूफी धर्मस्थळांचा अपमान करण्याचे दुष्कृत्य करत आहेत.
द्वेषभावनेत बरबटलेले वकील अशा याचिकांद्वारे या आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. न्याय, सत्य आणि ऐक्याचे तत्व जपण्याऐवजी ही मंडळी समाजात सांप्रदायिक तणाव निर्माण करत आहेत. अशा प्रकारच्या कृतींचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. केवळ अजमेर शरीफच नव्हे तर देशाच्या धार्मिक सौहार्दावर असलेल्या विश्वासालाही यामुळे तडा जाऊ शकतो.
या कठीण काळात ख्वाजा गरीब नवाज आणि त्यांचे शाश्वत विचार आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतात. अशावेळी प्रेषित मुसा (मोजेस) यांच्या द्विधा मनस्थितीची आणि त्यानंतर त्यांनी ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवत त्याच्या चरणी स्वत:च्या समर्पणाच्या कथेची आपण उजळणी केली पाहिजे. ईश्वरावर श्रद्धा (तवक्कल) ठेवल्यामुळे आपल्याला उपाय तर निश्चितच मिळेल पण या श्रद्धेतून नवी उर्जादेखील मिळेल.
आपण सत्य आणि न्याय यांवर ठाम राहायला हवे. खोटी कथा आणि विभाजनात्मक अजेंड्यांमुळे अजमेर शरीफची पवित्रता आणि त्याचा आध्यात्मिक वारसा धुमसून जाऊ देऊ नका. आमचा अल्लाहच्या मर्जीवर विश्वास असून ख्वाजा गरीब नवाज यांचा आध्यात्मिक वारसा आम्हाला बळ देतो.
कायदेशीर मार्गांचा गैरवापर करून द्वेष आणि खोटी माहिती पसरवणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी अशी विनंती आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालय आणि आमचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना करत आहोत.देशाचे ऐक्य आणि अखंडता अबाधित ठेवण्यासाठी संविधानिक तत्त्वांचा पालन करणे आवश्यक आहे.
न्यायाची शाश्वती देणाऱ्या न्यायव्यवस्थेने अशा संवेदनशील धार्मिक मुद्द्यांबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. सांप्रदायिक तणाव टाळण्यासाठी अशा द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने दाखल करण्यात आलेल्या निराधार याचिका तात्काळ फेटाळल्या पाहिजेत. भारताच्या अध्यात्मिक संस्कृतीचे प्रतिक असणारे धार्मिक सौहार्द जपण्याची जबाबदारी राजकीय नेत्यांवरही आहे.
खोटी माहिती पसरवणाऱ्यांनी ख्वाजा गरीब नवाज यांचा आध्यात्मिक वारसा समजून घ्यायला हवा. त्यांनी प्रेम, करुणा आणि मानवसेवेची शिकवण दिली. त्यामुळे त्यांच्या शिकवणीला विभाजनात्मक कृती आणि द्वेषपूर्ण आख्यायिका पसरवणारे विरोध करतात. आणि अखेरीस ही मंडळी आपल्या समाजाच्या सामाजिक ऋणानुबंधांचे नुकसान करतात.
ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या जगभरातील लाखो भक्त आणि अनुयायांना आम्ही एकत्र राहून अजमेर शरीफच्या पवित्र्याचे रक्षण करण्याची विनंती करतो. चला, द्वेषाला प्रेमाने, असत्याला सत्याने आणि फूटीला एकतेने प्रतिसाद देऊ. शांती आणि बंधुभावाच्या शिकवणुकीचे प्रतिध्वनी पिढ्यानपिढ्या येत राहो याची आपण काळजी घ्यायला हवी.
अजमेर शरीफ फक्त एक ऐतिहासिक स्मारक नाही, ते भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीचे एक जिवंत प्रतीक आहे. या पवित्र वारशाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. या वारशावर हल्ला करणारे लोक समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आपण ख्वाजा गरीब नवाज यांच्या न्याय, करुणा आणि विविधतेत एकता याच्या तत्त्वांवर आधारित शिकवणूकीचा झेंडा बुलंद करूया.
या आव्हानात्मक काळात दिव्य प्रेमाचा प्रकाश सर्वांचे मार्गदर्शन करो आणि ख्वाजा गरीब नवाज यांच्या आशीर्वादाचे आपल्याला बळ मिळो ही सदिच्छा!
प्रेम, सत्य आणि मानवतेच्या सेवेसाठी,
हाजी सय्यद सलमान चिश्ती,
गद्दी नशीन - दर्गा अजमेर शरीफ
चेअरमन - चिश्ती फाउंडेशन