संत शेख महंमद : भक्ती - सुफी परंपरेतील अग्रणी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 8 Months ago
भक्ती-सुफी परंपरेतील संत शिरोमणी शेख महंमद महाराज
भक्ती-सुफी परंपरेतील संत शिरोमणी शेख महंमद महाराज

 

महाराष्ट्रातील भक्ती-सुफी परंपरेतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे संत शिरोमणी शेख महंमद महाराज. वाहिरा हे संत शिरोमणी शेख महंमद महाराज यांचे जन्मगाव. त्यांची समाधीही येथे आहे. साधारण १५७४ ते १६७५ हा महंमद महाराजांचा कार्यकाळ. नगर, मराठवाड्यासह राज्यात महंमद महाराज यांनी कीर्तन, प्रवचन, भजने, दोहे, व हिंदी कवितांच्या माध्यमातून जनजागृती, प्रबोधन केले. तेलंगणा, हैदराबाद भागातही त्यांच्या कार्याचा उल्लेख आहे. त्यांनी ‘योगसंग्राम’, निष्कलंक प्रबोध’, ‘पवनविजय’, ‘साठी संवत्सर’ हे ग्रंथ लिहिलेले आहेत. साधारण ३०० पेक्षा अधिक अभंग लिहिलेले. नुकताच शेख महंमद यांचा उरूसाला (पुण्यतिथी समारोह) म्हणजेच यात्रा उत्सवाला सुरुवात झाली. दोन वर्षांपूर्वी सलोखा गटाचे प्रमोद मुजुमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा उत्सव अनुभवला आणि तो शब्दबद्ध केला. 'आवाज'च्या वाचकांसाठी तो इथे प्रसिद्ध करत आहोत. 

सदगुरू साचे पिरु | दो भाषांचा फेरु | नाही भिन्नाकारु | ज्ञान-विवेकी||१||
जैसा एका झाडा | पत्रें-खांद्या निवाडा | तैसा भाषा पवाडा |गुरुपिरांचा ||२||

संत शेख महंमद यांचा हा अभंग. सुफी तत्त्वज्ञान आणि भागवत धर्म यांचा समन्वय साधणारी ही मांडणी. संत शेख महंमद महाराज स्वतःचा उल्लेख अविंध असा करतात. वारकरी संप्रदायात ज्ञानाचा एका (संत एकनाथ), नामाचा तुका आणि कबीराचा शेका अशी उक्ती प्रसिद्ध आहे. यात शेका म्हणजे मुस्लिम मराठी संतांमधील महत्त्वाचे संत शेख महंमद महाराज. सूफी संत कबीराच्या विचारधारेचे, सूफी कादरी परंपरेतील चांद बोधले हे संत शेख महंमद महाराज यांचे गुरू होते. (संदर्भ : प्रा. डॉ. बाळासाहेब बळे, श्रीगोंदा.) 

शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी संत शेख महंमद महाराज यांना आपले गुरू केले होते. त्यांनी संत शेख महंमद महाराजांना श्रीगोंदा येथे १२ बिघे जमीन दिली होती. त्यामुळे संत शेख महंमद तेथे स्थिरावले. संत शेख महंमद महाराज यांचा भक्ती संप्रदायातील प्रभाव फार व्यापक होता. रामदास स्वामीनी संत शेख महंमद महाराजांविषयी असे म्हटले आहे की, "शेख महंमद, आम्हाला तुमचा अभिमान वाटतो... तुमच्या चरणांची धूळ मी माझ्या मस्तकी धारण करतो. "

संत शेख महंमद महाराज यांच्या शिकवणुकीचा प्रभाव आजही श्रीगोंदा परिसरावर आहे. या परिसरात कधीही धार्मिक तणाव निर्माण झाले नाहीत किंवा दंगल झाली नाही. श्रीगोंदा शहरात हिंदू - मुस्लिमांची संमिश्र, एकत्र वस्ती आहे. श्रीगोंद्यातील जेष्ठ पत्रकार अरिफ शेख यांनी याचा विशेष उल्लेख केला. श्रीगोंदा केवळ संयुक्त धार्मिक संस्कृतीचे ठिकाण नाही तर जातीय सलोख्याची ही भक्कम परंपरा या परिसराला आहे. 

श्रीगोंदा शहराचे जुने नाव चांभारगोंदा असे होते. एका अख्ख्यायिकेनुसार गोविंद चांभार या भक्ताची पांडुरंग नामभक्ती फळाला आली, त्यामुळे मूळ श्रीपूर नावाचे हे गाव चांभारगोंदा या नावाने ओळखले जाऊ लागले. या गावात चर्मकार समाजाची मोठी वस्ती होती. गावातील नदी काठी चामडे कमावण्याचा व्यवसाय होता. गावात चर्मकार समाजाची वस्ती आजही मध्यभागी आहे. तसेच अनेक जाती, भटके समाज या शहरात सलोख्याने राहतात. कालांतराने श्रीपूर आणि चांभारगोंदा यातून श्रीगोंदा नाव प्रचलित झाले. 
 
 
सूफी आणि भागवत परंपरा एकत्र, एकमेकांशी संवाद साधत, परस्परपुरक पद्धतीने महाराष्ट्रात पंधराव्या शतकापासून वाढल्या, रुजल्या. या परंपरांचे अग्रेसर प्रतिनिधी म्हणजे संत शेख महंमद. त्यांनी इस्लामी सूफी दर्शनाची भारतीय दर्शनाशी सांगड घातली आहे. आपल्या योग संग्राम ग्रंथात १७/१८ अध्यायात ते म्हणतात, 

"श्री गणेशाय नम: | 
जल्ले जलालहु अल्ला गनि प्यारा | 
जयजय जी जयवंत नरा | 
विश्वव्यापक निज परमेश्वरा | 
रहिमान साचा ||

सच्चा पीर कहे मुसलमान | 
मऱ्हाठे म्हणविती सद्गुरू पूर्ण | 
परि नाही दोन्हीत भिन्नत्वपण | 
आंखो खोल देख भाई ||"

सूफी इस्लामी परंपरा आणि भागवत परंपरा या संयुक्तपणे रुजल्या याचा विचार केला पाहिजे. या दोन्ही परंपराना समाजातील आम अठरा पगड जातीत स्थान होते आणि आहे. याचाच दुसरा अर्थ वैदिक, उच्चवर्णीय धार्मिक तत्त्वज्ञानाला छेद देणाऱ्या या स्वतंत्र बंडखोरीच्या परंपरा आहेत. 

शेख महंमद यांचा'सार्थ योग संग्राम' नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. इसवी सन १६९६मध्ये हा योगसंग्राम संत शेख महंमद यांनी लिहून पूर्ण केला होता. म्हणजे ३२८वर्षांपूर्वी लिहिलेला हा ग्रंथ आहे. सर्वसामान्यांच्या भाषेतील वारकरी साहित्याचा  तो एक महत्त्वाचा ठेवा आहे. या यात्रेत संत शेख मोहम्मद यांचे सार्थ योग संग्राम मिळाले. त्यातील सरळ सोप्या भाषेतील सहिष्णुतेचा अर्थ सांगणारा हा अभंग पहा-

परि सदगुरु पाहिजे लाधला | वेषधार्याने मुलुख बुडविला | त्यांनी दांभिक बडिवार केला | कपट शिकोनिया ||
मुसलमानात होऊनिया पीरु| मराठियात  म्हणवी सद्गुरु  |तोचि तारेल हा भवसागरु | येर बुडोन बुडविति ||
(प्रसंग (अध्याय) सोळावा.ओवी क्रमांक ५६-५७).

[भावार्थ : भोंदू साधूने अवघा मुलुख भोंदविला आहे. दांभिकतेचे स्तोम माजवले, कपटाने शोषण केले. म्हणून सद्गुरु लाभला पाहिजे, मुसलमानात पीर होऊन, मराठ्यांना सद्गुरु ठरला. असाच अवघा भवसागर तारुन नेईल, तोच सदगुरू वैर बुडवून प्रेम जागवील. (या ठिकाणी गुरु सद्गुरु म्हणजे चॉंद बोधले आहेत असा उल्लेख केला आहे)]
 

 
या उत्सवात सहभागी होण्याचा अनुभव अनेक पातळीवर नम्र करणारा ठरला. श्रीगोंदा येथे दरवर्षी साजरा होणारा संत शेख महंमद यांचा उत्सव म्हणजे श्रीगोंदा येथील हिंदू मुस्लिम आणि विविध भटक्या विमुक्त जाती आणि जमातींचा एकत्रित उत्सव आहे.सलोखा संपर्क गटातर्फे आम्ही संदेश भंडारे, डॉ. संजीवनी कुलकर्णी, निशा साळगावकर, प्रमोद मुजुमदार असे चौघे संत शेख महंमद महाराज वार्षिक यात्रेत सहभागी झालो होतो. संत शेख महंमद महाराज वार्षिक उत्सवाचे बारकाईने निरीक्षण केले तर हे स्वच्छ दिसते. दोन दिवसांत उत्सवातील प्रमुख कार्यक्रमात  एकही उच्चवर्णीय वैदिक/ ब्राह्मणी विधी नव्हता. (एकच गोष्ट खटकली. ती म्हणजे संत शेख महंमद महाराज आणि त्यांच्या पत्नीची कबर एकत्र असताना त्या गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेश नाही. असं का?) उलट सामान्य सर्व जाती धर्माच्या माणसांना वाव देणारा सर्व असा हा उत्सव  होता. रात्रभर चालणारा छबिना, नाचत गात प्रसाद घेऊन जाणारे लोकांचे गट. ढोल ताशांची पथके,  संत शेख महंमद महाराज समाधी स्थळा बाहेर भरलेला कुस्त्यांचा जंगी हंगामा  यातून उत्साह ओसंडत होता. 

 ही काही निव्वळ परंपरा म्हणून टिकून राहिली नाही. किंवा निव्वळ धार्मिक/ अध्यात्मिक प्रथा नाही. हा एक सामाजिक आशय व्यक्त करणारा प्रवाह आहे. सामुहिक जीवनातील सहिष्णुता अधोरेखित करणारा प्रवाह आहे. नेमका हाच विचार सांगणाऱ्या प्रा. डॉ. बाळासाहेब बळे यांची श्रीगोंद्यात भेट झाली. संदेश भंडारे यांनी या पूर्वीच बळे सरांची भेट घेतली होती. त्यांची सुंदर मुलाखत रेकॉर्ड केली आहे. बळे सर पत्रकार होते. तसेच नामांतराच्या लढ्यात सहभागी होते. बळे सरांनी पारधी समाजाचा अभ्यास केला आहे. या विषयावर त्यांनी पीएच डी केली आहे. त्यांनी श्रीगोंदा आणि परिसरातील अनेक सहिष्णुता वाढवणाऱ्या प्रथा परंपरा आणि त्यांचा जातीय, धार्मिक इतिहास सांगितला. 

अशीच एक दुसरी महत्त्वाची भेट झाली ती जेष्ठ पत्रकार अरिफ शेख यांची. खरतर संत शेख महंमद महाराज वार्षिक उत्सवासाठी त्यांची मुलगी, जावई आणि पाहुणे आले होते. तरी ही अरिफ भाई भेटायला आले. श्रीगोंदामधील सहिष्णू, सलोख्याचे वातावरण, जातीय सलोखा याबाबत त्यांनी खूप उत्साहाने माहिती दिली. सलोखा संपर्क गटाच्या कामाबद्दल त्यांनी उत्सुकता दाखवली. सलोखा विषयावर काही लिखाण करण्याची विनंती आम्ही त्यांना केली आहे. 

दोन दिवस यात्रेच्या गर्दीत फिरताना, संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले विक्रेते भेटले. उस्मानाबाद, कोल्हापूर येथून आलेले यात्रेकरु भेटले. छबिना बघायला, सजवलेला दुडकत चालणारा घोडा बघायला आलेली मुलं आणि घोळक्याने जमलेल्या मुस्लिम बाया दिसल्या. या सर्वांमध्ये शनी शिंगणापूर मधून आलेले चॉंद जुम्मा शेख आणि नवाज दगडू शेख आणि त्यांच्या हजरत निजामुद्दीन सिलसिला परंपरेचे फकीर साथी भेटले. संदेश भंडारे यांनी त्यांच्या मुलाखती रेकॉर्ड केल्या. 

हिंदू धर्मातील अठरा पगड जाती, मुस्लिम आणि अन्य धार्मिय समाजात ऐक्याचे प्रतिक बनलेल्या संत शेख महंमदांशी आज सातशे वर्षांनी आम माणसांचे घट्ट भावनिक नाते आहे, हीच माणसांच्या शहाणपणाची खूण. म्हणूनच तीस चाळीस हजार लोकसंख्येच्या श्रीगोंद्यात या यात्रेसाठी १५-२० हजार लोक जमले होते. त्या सर्वांना आणि संत शेख महंमद महाराजांना मानाचा मुजरा करत आम्ही परतलो.
 
- प्रमोद मुजुमदार 
 

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -


Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter