रमजाननिमित्त मौलवींचे मुस्लिमांना 'हे' विशेष आवाहन

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 10 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

आवाज द व्हॉइस / नवी दिल्ली / लखनऊ  

भारतात काहीवेळापूर्वी चंद्रदर्शन झाल्याने रमजानचा महिना सुरू झालाय. या महिन्यात मुस्लिम समुदाय उपवास म्हणजे रोजा करतो आणि प्रार्थनेत म्हणजेच इबादतीमध्ये मग्न राहतो. रमजाननिमित्त लखनऊच्या फिरंगी महल या ऐतिहासिक परंपरा असलेल्या मुस्लीम धार्मिक संस्थेने मुस्लिमांसाठी १५ कलमी आचारसंहिता जारी केली आहे. त्यामध्ये रमजानदरम्यान करण्यात येणाऱ्या इबादती, सामाजिक सौहार्द राखण्याचे आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रमजाननिमित्त मौलवींनी मुस्लिमांना केलेल्या या आवाहनाचे विशेष कौतुक होत आहे.  

रमजान २०२५ची सुरुवात आणि मौलवींचे कौतुकास्पद आवाहन 
देशभरात दोन मार्च रोजी पहिला रोजा पाळला जाईल. यानिमित्ताने मौलाना खालिद रशीद फिरंगी महली यांनी मुस्लिम समाजाला इबादत म्हणजे प्रार्थना करण्याचे आणि या पवित्र महिन्यात पुण्य आणि बरकत कमवण्याचे आवाहन केले आहे. रमजानचा महिना ईबादत म्हणजे प्रार्थनेचा असल्यामुळे अधिकाधिक वेळ प्रार्थनेत आणि परोपकारात व्यतीत करण्याचे आवाहन करत त्यांनी पुढील महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला आहे -   

१. रोजे आणि नमाजचे पालन करा – रमजान हा सर्वात पवित्र महिना असून, यात रोजा ठेवणे प्रत्येक मुसलमानासाठी फर्ज (अनिवार्य) आहे. त्यामुळे या काळात उपवास आणि नमाज चुकवू नका.  
२. सहरी आणि इफ्तारचे भान ठेवा – उपवास ठेवणे म्हणजेच सहरी आणि उपवास सोडणे म्हणजे इफ्तार या महत्त्वाच्या इबादती आहेत, त्यामुळे त्यांचे योग्य पालन करा.  
३. माईकचा वारंवार वापर टाळा – पहाटे उपवास सुरू करण्याआधी म्हणजेच सहरीच्या आधी वारंवार माईकवरून घोषणा देणे टाळावे, जेणेकरून इतरांना त्रास होणार नाही.  
४. शेजाऱ्यांची आणि परिसरातील लोकांची काळजी घ्या – रमजानच्या काळात शेजारी आणि इतर समुदाय यांच्या भावनांचा आदर करा. आपल्यामुळे त्यांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या.   
५. तरावीहच्या नमाजाचे पालन करा – तरावीह म्हणजे रमजान काळात अदा केली जाणारी रात्रीची विशेष नमाज. त्यामुळे न चुकता इतर पाच नमाजसोबतच तरावीहच्या नमाजचेही नियमित पालन करा.  
६. वाहने योग्य ठिकाणी पार्क करा – नमाजसाठी आल्यावर मशिदींसमोर वाहने शिस्तबद्धपणे पार्क करा. वाहतूक कोंडी होणार नाही, याची काळजी घ्या.   
७. गरिबांना इफ्तारमध्ये सहभागी करून घ्या – उपवास सोडताना म्हणजेच इफ्तारच्यावेळी गरिबांना सामावून घ्या. त्यांच्यासोबत सहानुभूतीने वागा.  
८. मशिदींच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या – रमजान दरम्यान मशिदी आणि आपापला परिसर स्वच्छ ठेवा.  
९. गरजूंना मदत करा – रमजानमध्ये जकात आणि सदका यांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या काळात गरजूंना अधिकाधिक मदत करा.  
१०. देशाच्या उन्नतीसाठी आणि बंधुभावासाठी प्रार्थना करा – रमजानमध्ये उपवास ठेवणाऱ्यांची दुआ कबूल होते. त्यामुळे  आपल्या देशाच्या उन्नतीसाठी आणि समाजाच्या भल्यासाठी, देशात सौहार्द वाढावा यासाठी विशेष दुआ करा.  
११. सहरीच्या वेळी गोंधळ करू नका – पहाटेच्यावेळी अनावश्यक गोंधळ टाळा, जेणेकरून इतर लोकांना त्रास होणार नाही.  
१२. धर्मशिक्षण आणि कुराण पठणासाठी वेळ द्या – या महिन्याचा उपयोग कुराण समजून घेण्यासाठी करा. 
१३. मशिदींमध्ये शिस्त राखा – मशिदींमध्ये प्रार्थनेसाठी आलेल्या लोकांसाठी योग्य व्यवस्था असावी.  
१४. अफवांना बळी पडू नका – रमजानच्या काळात कोणत्याही प्रकारच्या अफवांपासून दूर राहा आणि शांतता राखा.  
१५. धार्मिक कार्यक्रमांमध्ये शिस्त पाळा – रमजानच्या काळातील सर्व धार्मिक कार्यक्रम शांततेत आणि संयमाने पार पाडा.  

रमजान केवळ इबादतीचा महिना नाही, तर तो सामाजिक सौहार्द, बंधुभाव, सहकार्य आणि संयमाचा प्रतीकही आहे. इस्लामिक सेंटर ऑफ इंडियाने जारी केलेल्या पंधरा कलमी निर्देशांचे पालन केल्यास मुस्लिम समाज आपला रमजान अधिक फलदायी बनवू शकतो आणि समाजात सौहार्दाचा आणि शांतीचा संदेश देऊ शकतो.