रमजान ईद : मानवी मूल्यांना चालना देणारा उत्सव

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

रमजान ईद म्हणजे शांततेता आणि अध्यात्माचा उत्सव. इस्लामिक चंद्र कॅलेंडरच्या दहाव्या महिन्यातल्या शव्वालच्या पहिल्या दिवशी हा सणसाजरा होतो. या ईदला ईद अल-फित्र म्हणजे उपवास सोडण्याची ईद म्हटले जाते. रमजान म्हणजे उपवास, प्रार्थना आणि आत्मचिंतनाचा महिना.हा रमजानचा महिना संपल्याचे प्रतिक म्हणजे रमजान ईद!  

ईदच्या दिवशी सकाळी मुस्लिम समाज इदगाहवर म्हणजे ईदसाठी आरक्षित मोकळ्या जागांवर किंवा  मस्जिदींमध्ये एकत्र येतो आणि सामूहिक नमाज अदा करतो. त्यातून बंधुभाव, समता आणि एकता  या भावना प्रतिबिंबित होतात. गरीब असो वा श्रीमंत, सगळेजण नव्या कपड्यांमध्ये असतात. मित्र आणि नातेवाइकांना या आनंदाच्या प्रसंगात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले जाते.म्हणूनच ईद हा केवळ एक धार्मिक सोहळा नसतो, तर तो समाज आणि संस्कृती यांचा संगम असतो. वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे, वर्गाचे लोक एकत्र येतात आणि आपल्या परंपरेचा उत्सव साजरा करतात.

शव्वाल महिन्याचा नवीन चंद्र पाहिल्यावर प्रेषित मुहम्मद म्हणाले होते, ‘हे ईश्वरा, हा चंद्र आमच्यासाठी शांतीचा चंद्र बनव.’ या शब्दांतून त्यांनी जणू उपवासाचे खरे सारच सांगितले: लोकांमध्ये आध्यात्मिक मूल्यं रुजवणं आणि समाजात शांततामय वातावरण निर्माण करणं.

रमजान ईद साजरी करण्यासाठी विशेष दोन रकात सामूहिक नमाज अदा करण्याशिवाय दुसरा विशेष असा कोणतीही विधी नाही. या विशेष सामुहिक नमाजमधून भाविक ईश्वराकडे मानव कल्याणाचा आशीर्वाद मागतात.निरोगी समाज घडवण्यासाठी सर्व स्त्री-पुरुषांना यश दे, अशी दुआ ते ईश्वराकडे करतात.

या नमाजानंतर सर्वजण आपल्या नातेवाइकांना, शेजाऱ्यांना, मित्रांना भेटतात. यावेळी आवर्जून गळाभेट घेतात आणि अभिवादन करतात, 'अस्सलाम ओ अलैकुम' म्हणजे ‘तुमच्यावर ईश्वराची कृपा आणि शांती असो.’ यावेळी एकमेकांना भेट म्हणून दिल्या जाणाऱ्या मिठाईतून ईदची भावनाच प्रकट होते. प्रेषित मुहम्मद म्हणायचे, भेटींची देवाणघेवाण समाजात प्रेम वाढवते.

ईद अल-फित्र म्हणजे रमजानच्या संपूर्ण महिन्याच्या सौमचा (रोजाचा) म्हणजे उपवासाचा शेवट. रमजान यशस्वीपणे संपन्न झाल्याचं हे प्रतिक आहे. आणि रमजान ईद म्हणजे त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि जल्लोषाचा दिवस. याच भावनेने जगभर ईद साजरी होते.

रमजान ईद हा दानधर्माचा सणही आहे. त्यातून उदारभाव आणि करुणा प्रतिबिंबित होते. प्रेषित मुहम्मद रमजानला ‘करुणेचा महिना’ म्हणायचे.

या महिन्याच्या शेवटी दिल्या जाणाऱ्या दानाला सदका अल-फित्र असेही म्हटले जाते. सर्वांसोबतच वंचितांना, गरिबांनाही ईद साजरी करता यावी हा त्यामागचा उद्देश. ही कृती वैश्विक बंधुत्वाची शिकवणच देते. म्हणूनच इस्लामच्या प्रेषितांनी या काळात दान दिले, गरजूंना अन्न पुरवले आणि सर्व मुस्लिमांना  धार्मिक कर्तव्य असल्याचे बजावले.

ईद हा एकत्र येण्याचा म्हणजेच सामाजीकरणाचा सणही आहे. कोणताही मेळाव्याचा हेतू तोच असतो, मात्र धार्मिक मेळाव्याला पावित्र्याचा रंग चढतो. ईदचा हा पैलू माणसा-माणसांमधील संवादाचे आणि बंधुभावाचे महत्त्व अधोरेखित करतो.

ईद केवळ एक धार्मिक सण नाही. तर तो त्याहून अधिक आहे. ईदनिमित्त वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील आणि वर्गातील मंडळी एकत्र येतात आणि प्रेम व मैत्रीचे ऋणानुबंध आणखी मजबूत करतात. यानिमित्ताने करुणा, एकता आणि परस्परांविषयी आदर ही मुल्ये बळकट होतात. इतर सणांप्रमाणेच ईद केवळ संस्कृतीचा भागच नाही तर मानवी मूल्यांना चालना देणारा स्रोत आहे.

 - मौलाना वाहिदुद्दिन खान 
(लेखक इस्लामचे मोठे विद्वान होते. इस्लाम आणि शांती यांसाठी केलेल्या कार्यासाठी त्यांना 2021मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते)
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter