देश आणि जगभरातील इतर भागांप्रमाणेच काश्मीरमध्येही रमजान उत्साहात साजरा होत आहे. या पवित्र महिन्यात मस्जिदींमध्ये नमाजासाठी मोठी गर्दी होऊ लागली आहे. इस्लामी कॅलेंडरमधील नववा महिना असलेला रमजान मुस्लिम समुदायासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. हा महिना उपवास, प्रार्थना आणि आत्मशुद्धीचा असतो, जिथे मुस्लिम अल्लाहकडे माफीसाठी प्रार्थना करतात. त्यामुळे प्रत्येकजण इबादतीत म्हणजेच प्रार्थनेत मग्न होऊन या महिन्यात अधिकाधिक बरकत, पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे.
श्रीनगरमध्ये रमजानची तयारी
रमजान काळात श्रीनगरमध्ये सकाळपासूनच विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. हॉटेल, रेस्टॉरंट, चहा स्टॉल आणि ढाबे यांसारखी सर्व प्रमुख खाद्यपदार्थांची ठिकाणे बंद असतात. तर बाजारात नेहमीच्या तुलनेत गर्दी कमी दिसते. लोक सकाळीच मस्जिदींमध्ये नमाज अदा करण्यासाठी जमतात. एरवी रस्त्यांवर आणि बाजारपेठांमध्ये वाहतूक तुलनेने कमी असते.
स्थानिक रहिवासी रमजानसाठी आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यात गुंग असतात. खरे तर रमजान सुरु होण्यापूर्वीच काश्मीरच्या बाजारात रमजानसाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू झाली. कारण एकदा का रमजान सुरु झाला कि मुस्लीम धार्मिक विधींमध्ये व्यस्त होऊन जातात आणि त्यांना दैनंदिन खरेदीसाठी कमी वेळ मिळतो. उपवासासाठी लागणारी फळे, ज्यूस, खाद्यपदार्थ आणि इतर आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मात्र बाजारात गर्दी दिसून येते. या काळात खजुरांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. हे खजूर प्रामुख्याने मध्य पूर्व आणि अन्य देशांतून आयात केले जातात.
काश्मीरमधील मध्यमवर्गीयांची समृद्धी आणि खरेदीवरील सकारात्मक परिणाम
गेल्या काही वर्षांत काश्मीरमध्ये मध्यमवर्गीयांची आर्थिक स्थिती सुधारली असून, याचा परिणाम रमजानच्या खरेदीवरही दिसून येतोय. अनेक काश्मिरी नागरिक सौदी अरेबियातून आयात केलेले खजूर, उच्च दर्जाचे फळांचे ज्यूस, जॅम आणि इतर वस्तू खरेदी करत आहेत. श्रीनगरमधील एका मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरच्या दुकानदाराने सांगितले, "मी माझ्या कुटुंबासाठी सौदी खजूर, ब्लॅकबेरी जॅम, फळांचे ज्यूस आणि दुधाची क्रीम घेतली आहे. हे सर्व रोजा सोडताना म्हणजे इफ्तारच्या वेळी उपयोगी पडते."
रमजानच्या काळात व्यवसाय तेजीत
रमजानदरम्यान काश्मीरमधील बाजारपेठांमध्ये मोठी उलाढाल होते. रमजानमध्ये खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. विशेषतः खजूर, फळे, ज्यूस, दूध, मिठाई आणि आयात केलेल्या वस्तूंच्या विक्रीत मोठी वाढ होते. यंदा रमजान सुरू होताच या उत्पादनांची मागणी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे हा कालावधी व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर असतो. कारण ग्राहक रमजानसाठी आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी अधिक खर्च करतात.
उपवास आणि आहाराचे महत्त्व
रमजानदरम्यान काश्मिरी नागरिक आहाराकडे विशेष लक्ष देतात. इफ्तारच्या वेळी आरोग्यासाठी फायदेशीर आणि पोषणयुक्त पदार्थ खाल्ले जातात. स्थानिक रहिवासी इमरान भट म्हणतात, "रमजानमध्ये फळे, ज्यूस आणि इतर पदार्थांवर अधिक खर्च होतो. उपवास काळात जेवण कमी होते. त्यामुळे या काळात पोषण मुल्ये आणि उर्जा मिळवण्यासाठी या गोष्टींचा आहारात समावेश करणे गरजेचे असते."
रमजानची उपवास वेळ आणि वातावरण
यंदा रमजानच्या उपवासाचा कालावधी साधारणतः १३ तासांच्या आसपास आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार, रमजान दरवर्षी १० दिवस पुढे सरकतो. त्यामुळे हा पवित्र महिना काही वर्षांत हिवाळ्यात येतो, तर काही वर्षांत उन्हाळ्यात. यंदा रमजान उन्हाळ्यात आल्याने दिवस मोठे आहेत आणि तापमान अधिक आहे, त्यामुळे काहींना उपवास अधिक कठीण जाऊ शकतात.
काश्मीरमध्ये रमजानचे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व
काश्मीरमधील रमजान केवळ धार्मिक विधी नसून तो सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. या महिन्यात लोक एकमेकांसोबत अधिक वेळ घालवतात. एकमेकांच्या घरी इफ्तार करतात आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होतात. रमजान हा सामूहिक प्रार्थना आणि ध्यानधारणेचा महिना मानला जातो. याकाळात लोक आत्मशुद्धीच्या दिशेने प्रयत्न करतात. मस्जिदींमध्ये सकाळ-संध्याकाळ विशेष नमाज अदा केली जाते. त्यामुळे मस्जीदी भाविकांनी फुलून जातात. काश्मिरी नागरिक रमजानला जीवनाचा अविभाज्य भाग मानतात. हा महिना त्यांना आत्मप्रेरणा आणि मानसिक शांतता यांची अनुभूती देतो.
काश्मीरमध्ये रमजान
काश्मीरमध्ये रमजान हा केवळ धार्मिक विधी नसून तो सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही मोठा उत्सव आहे. उपवास, प्रार्थना आणि सामाजिक एकता यासोबतच बाजारपेठांमध्येही रमजानशी संबंधित वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी होते.
- बासित जरगर