उत्तर प्रदेशातील अयोध्येच्या भव्य राम मंदिराच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरु आहे. २२ जानेवारीला राम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. राम मंदिराची तयारी जोरात सुरू असून गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी रामाची भजने शेअर करताना दिसत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या एक्स हँडलवर 'श्री रामजी पधारे' हे भजन शेअर केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी शेअर केलेले हे राम भजन उस्मान मीर यांनी गायले आहे. तर, ओम दवे व गौरांग पाला यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. व्हिडीओ शेअर करत पंतप्रधानांनी लिहिले आहे की, “अयोध्या नगरीत श्री रामजी यांच्या आगमनाबाबत चोहीकडे उत्सुकता आणि उल्हासमय वातावरण आहे. उस्मान मीरजी यांचे हे सुमधुर राम भजन ऐकून तुम्हांला देखील याचा दिव्य अनुभव येईल.”
नेमके कोण आहेत उस्मान मीर?
उस्मान मीर यांचा जन्म २२ मे १९७४ रोजी वायोर (जि. कच्छ, गुजरात) येथे वडील हुसेनभाई आणि आई सकिनाबानू यांच्या घरी झाला. उस्मान यांचे वडील हुसेन हे गुजराती लोक भजन आणि संतवाणीतील तबला वादक होते. उस्मान यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. लयजा (जि. कच्छ) येथील भुलाभाई मानसिंग विद्यालयात त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आणि औपचारिक शिक्षणाला निरोप दिला.
पुढे वडलांच्या मार्गदर्शनाखाली उस्मान तबला शिकू लागले. वयाच्या १३ व्या वर्षी ते वडलांसोबत लाइव्ह शोमध्ये परफॉर्म करू लागले. उस्मान यांनी दिवंगत नारायण स्वामी यांच्यासोबत तबलावादक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. मात्र, गायन हीच उस्मान यांची खरी आवड होती. त्यांनी आपल्या वडिलांकडून गायनाचे प्रशिक्षण घेण्यास सुरूवात केली आणि दरम्यान पुढचे शिक्षणही पूर्ण केले.
उस्मान यांचे पहिले गीत
उस्मान यांनी गुरू इस्माईल दातार यांच्याकडून गायनाचे प्रशिक्षण घेतले. एकदा गुरुपौर्णिमेच्या दिवशी उस्मान तबला वादक म्हणून तलगाजर्डा येथील मोरारी बापूंच्या आश्रमात एका मैफिलीसाठी गेले होते. तिथे पार्थिवभाईंनी उस्मानच्या गायन क्षमतेचे कौतुक केले आणि त्यांची बापूंशी ओळख करून दिली. प्रेक्षकांसाठी गायलेले 'दिल कश तेरा नक्षा है' हे उस्मान यांचे पहिले गीत होते. या गीतापासून त्यांचा गायक म्हणून सुवर्ण प्रवास सुरू झाला.
अहमदाबादमध्ये केला पहिला शो
उस्मान यांचा पहिला शो अहमदाबादमध्ये झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप दवे यांनी केले होते. उस्मान हे संगीत, भजन, गझल, अर्ध-शास्त्रीय, सुगम आणि गुजराती-लोकगीत या कोणत्याही प्रकारात सादरीकरण करण्याची क्षमता असलेल्या मोजक्या गायकांपैकी एक आहेत.
चित्रपटक्षेत्रातील कारकीर्द
उस्मान यांनी २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मी तो चुंदडी ओढी तारा नाम नी' या गुजराती सिनेमापासून उस्मान मीर यांनी चित्रपटात गाणी गायला सुरुवात केली. २०१३ पासून ते हिंदी चित्रपटांसाठी गायन करत आहेत. २०१३ मध्ये आलेल्या 'गोलियों की रासलीला राम-लीला' या हिंदी चित्रपटात त्यांनी गायलेले 'मोर बनी थानाघाट करे' हे गाणे लोकप्रिय ठरले. उस्मान यांनी आतापर्यंत जवळपास ५८ गुजराती चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले आहे. तर, जगभरातील २५ देशांमध्ये त्यांनी आपला आवाज पोहोचवला आहे. आज एक प्रसिध्द भारतीय पार्श्वगायक म्हणून ते ओळखले जातात.
- छाया काविरे