कव्वाली : मानवी जीवनाचा वेध घेणारे सुफी काव्य

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 10 Months ago
अमीर खुसरो आणि निजामुद्दीन औलीया
अमीर खुसरो आणि निजामुद्दीन औलीया

 

सुफींनी संगीताला मानवी जीवनाच्या स्वातंत्र्याचे प्रतिक मानले. मानवी जीवनाची अभिव्यक्ती बंधनमुक्त असावी. अभिव्यक्तीची मोकळीक स्वातंत्र्याचे प्रतिक मानली जाते. त्यामुळेच सुफींनी संगीताच्या माध्यमातून मानवी अभिव्यक्तीचे प्रतिनिधित्व केले. सुफींच्या संगीताने मानवी जीवनातील आनंद, दुःख, चिंतन, नामस्मरण अशा निरनिराळ्या भावनांसाठी संगीताच्या क्षेत्रात वेगवेगळे पर्याय उपलब्ध करुन दिले. सुफींच्या शायरीने जीवनातल्या आनंदाला आपल्यात सामावून घेतले. समाजातील एकोप्याच्या, समन्वयाच्या विचारांना प्रतिनिधित्व दिले. इतिहासाचा वेध घेतला. संस्कृतीचा वारसा जपला. तर सुफींच्या दोह्यांनी अध्यात्म, रुढी, परंपरांविरोधातल्या विद्रोहाची भूमिका घेतली. 

सुफींच्या खानकाहमधील महफील-ए-समा मध्ये एका बाजूला जीवनाचे गहन चिंतन होते, तर दुसऱ्या बाजूला इश्वराचे नामस्मरण आणि त्याची कृपा प्राप्त करण्यासाठीचा चिंतनशील प्रयत्नदेखील या महफीलीत व्हायचा. सुफी पंथात महफिल ए समानंतर सर्वाधिक चर्चा कव्वालीची होते. कव्वालीला अमीर खुसरोंच्या प्रयत्नातून महफिल ए समामध्येही काहीवेळा स्थान मिळाले होते. कव्वाली ही सुफींचा विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम बनली. 

सुफी पंथाने राजसत्तेविरोधात जेव्हा-जेव्हा बंड केले तेव्हा कव्वाली सुफींची बंडाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्यात अग्रक्रमावर होती. त्यामुळे सुफी संप्रदायात कव्वालीचे महत्व अद्वितीय आहे. काही ऐतिहासिक नोंदीच्या आधारे आपण कव्वाली म्हणजे काय, कव्वालीचा जन्म कधी झाला, त्याच्या आजवरच्या प्रवासाचे टप्पे कोणते, याची माहिती घेऊयात.

कव्वाली म्हणजे काय? 
कव्वाली हा शब्द अरबी कौल या शब्दापासून बनला आहे. कौल या शब्दाचा अर्थ एखादी गोष्ट वारंवार जोर देऊन सांगणे असा होतो. कौल हा संवादासाठी, कथनासाठी देखील वापरला जातो. अमीर खुसरोंच्या आधी हिंदवी किंवा जुन्या उर्दू ग्रंथात कव्वाली हा शब्द जेथे आढळतो, तेथे तो समा या शब्दाचा समानार्थी म्हणून वापरला गेला आहे. महफील-ए-समा म्हणजे कव्वाली असादेखील उल्लेख काही ग्रंथामध्ये आढळतो. कव्वाली हा शब्द खुसरोंच्यानंतर सुफी गीतांच्या एका विशिष्ट प्रकारासाठी वापरला जात होता. या गाण्यामध्ये अल्लाह अथवा प्रेषितांची स्तुती गायली जायची. काहीवेळेस या गीतांमध्ये सुफी संत अथवा अल्लाहच्या महान भक्तांचे मोठेपण शायरीच्या माध्यमातून मांडले जाई. त्यासाठी मनकबत हा शब्द देखील आला आहे. 

सुफींच्या इतिहासाच्या जुन्या साधनांमध्ये कव्वालीविषयी विस्तृत माहिती आढळते. अमीर खुसरोंनी सुफीपंथामध्ये कव्वालीची प्रथा सुरु केली याविषयी सुफी पंथाच्या अभ्यासकांमध्ये मतैक्य आढळते. असे असले तरी इशस्तुतीपर गाणी लिहिण्याची परंपरा सुफींमध्ये मोईनुद्दीन चिश्तींच्याही आधी आढळते. अमीर खसरोंच्या कव्वालीत फक्त गायकी नव्हती. तर त्याकाळातील विशिष्ट वाद्यांच्या कव्वालीसाठी कसा वापर करायचा? याचेदेखील शास्त्र अमीर खुसरोंनी विकसित केले होते. खुसरोंच्या खजायनुल फतेह वगैरे ग्रंथांमध्ये याची माहिती मिळते. कव्वालीसाठी कोणते राग वापरायचे याचीदेखील चर्चा खुसरोंनी केली आहे. त्यामुळे कव्वाली लिहिणे, गाणे, त्याला संगीत देणे ही देखील एक कला मानली जाऊ लागली. 

अमीर खुसरो आणि कव्वाली
अमीर खुसरोंचा उदय खिलजीकाळात झाला. पुढे तुघलकांच्या सत्ताकाळातही ते आपला दरबारी प्रभाव टिकवून होते. निजामुद्दीन औलीयांचा दिल्लीच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक वर्तुळात हस्तक्षेप वाढत होता. वेदांत आणि भक्ती चळवळ उत्कर्षाला पोहोचली होती. त्याकाळात अमीर खुसरोंनी आपले सुफी पंथाविषयीचे चिंतन समोर ठेवायला सुरुवात केली. त्याकाळात हिंदू मुस्लिम एकमेकांच्या अनेक प्रथा परंपरा स्विकारायला लागले होते. त्यातून एक निराळ्या भारतीय संस्कृतीचा जन्म व्हायला लागला होता. अशा काळात अमीर खुसरोंनी कव्वालीचा पाया घातला. खुसरोंनी लिहिलेल्या काही कव्वाल्या आपण नमुन्यादाखल घेऊ शकतो. ज्यावरुन खुसरोंचे कव्वालीतील चिंतनविश्व आपल्या कळू शकेल. 

“काफिर ए इश्कम मुसलमानी मरा दरकार ए निस्त
हर रग मन तार गश्ता हाजत ए जुन्नार ए निस्त”

(मी इश्कात काफीर बनलो आहे. मला मुसलमानीची गरज नाही.
माझे रोम रोम धाग्याप्रमाणे आहे. मला आता वस्त्रांची गरज नाही.)

नगमात-ए-समा मध्ये लिहिलेली ही कव्वाली आहे. या कव्वालीत त्यांनी सुफींच्या प्रेमाविषयच्या धारणेचा उल्लेख केला आहे. अमीर खुसरोंनी कव्वाली लिहिताना प्रेमासोबत, आपल्या देशाचा देखील उल्लेख केला आहे. सुफी संतांच्या मैफीलीत प्रेम कव्वाल्यांच्या हा वारसा अमीर खुसरोंना भारतीय सुफी पंथाचे प्रणेते ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्याकडून मिळाला होता. मोईनुद्दीन चिश्ती हे एक चांगले कवी होते. त्यांनी अनेक कविता लिहिल्या आहेत. त्यापैकी त्यांची गाजलेली कविता आशिक ए हमादम ही होती. त्यामध्ये ते म्हणतात, 

“आशिक ए हमादम फिक्र ए रुख दोस्त कुंद
माशुक करिश्मा ए ते निकुस्त कुंद
मा जुर्म व खता कनीमवा व लुत्फ व अता”

भावार्थ - माझा प्रियकर माझा सुख दुःखाचा सोबती आहे. तो माझा मित्र आहे. माझ्या मित्राचा करिश्मा असा आहे की, प्रत्येक दुःखाचा तेथे अंत झाला आहे. त्याचा गुन्हा, त्याच्याविषयीचा खेद या सर्व गोष्टी आनंद देणाऱ्या आहेत. मोईनुद्दीन चिश्तींच्या खानकाहमध्ये महफील-ए-समाचे आयोजन केले जात होते. या महफील-ए-समात अनेकवेळेस प्रेमगीते सादर केली जात होती. त्या गीतांच्या संकल्पनेवरुनच अमीर खुसरोंनी कव्वाली ही संकल्पना आणल्याचे म्हटले जाते. मोईनुद्दीन चिश्ती यांचे प्रिय शिष्य ख्वाजा बख्तियार काकी यांनी महफील-ए-समाची आवड होती. त्यामुळे त्यांच्या खानकाहमध्ये (आश्रमात) समाचे आयोजन केले जाई. तेथे वेगवेगळ्या गीतांचे सादरीकरणदेखील होईल. त्यातून समातील गीताची परंपरा अमीर खुसरोंच्या दिल्लीत पोहोचली होती. पुढे निजामुद्दीन औलीया यांनी हाच सिलसिला सुरु ठेवला. 

निजामुद्दीन औलीया हे खुसरोंचे गुरु होते. त्यामुळे खुसरोंवर निजामुद्दीन औलीयांचा प्रभाव पडणे साहजिक होते. खुसरो ज्याकाळात कव्वालीत वेगवेगळे प्रयोग करत होते, त्याकाळात निजामुद्दीन औलीया यांनी देखील कव्वाली रचल्या आहेत. त्यामुळे खुसरोंच्या कव्वाल्यांचे पहिले आश्रयदाते आणि मार्गदर्शक म्हणून देखील निजामुद्दीन औलीया यांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या दरबारात सर्वधर्मीयांना खुला होता. त्यामुळे तेथे सर्वधर्मीयांच्या प्रथा, परंपरांचा मुक्त अविष्कार व्हायचा. त्यातून कव्वालीतही या भारतीय परंपरांचा उल्लेख व्हायला लागला. निजामुद्दीन औलीया यांनी अनेक कव्वाली लिहिल्या त्यातील ही एक महत्वाची कव्वाली –

“सबा ब-सु-ए-मदिनः रु कुन अज ईं दुआ-गो सलाम बर ख्वाँ
ब-गिर्द-ए-शाह-ए-मदिनः गर्द-ओ-ब-सद तजरोअ पयाम बर ख्वाँ”

(हे वाऱ्याची सुखावह झुळूक तू मदिनेला जाऊन माझा सलाम कळव,
मदिनेच्या राजाची परिक्रमा करुन शेकडो याचना करीत माझा संदेश त्यांना कळवावा)

कव्वालीचे विषय 
कव्वालीच्या रचनेचा विचार मुख्यतः तीन पातळ्यांवर केला  जातो. १) विषय २) भाषा ३) संगीत. यातील कव्वालीच्या रचनेत मुख्य मुद्दा हा विषयांचा असायचा. त्यानंतर आपल्याला हा विषय कोणत्या समुहापर्यंत पोहोचवायचा आहे, त्यावरुन भाषेची निवड केली जात होती. मध्ययुगीन काळात फारसी, हिंदवी, ब्रजभाषा, दखनी आणि कदिम उर्दू म्हटल्या जाणाऱ्या जुन्या उर्दूत कव्वाली लिहिल्या गेल्या आहेत.  सुफींच्या कव्वाली मुख्यतः प्रेषितांवरील निष्ठा, अल्लाहची भक्ती यावर आधारीत होत्या. त्यातही इस्लामी प्रेषितांच्या जीवनकार्याचा परिचय करुन देण्यावर कव्वालींचा भर असे. 

प्रेषितांनी लढलेली युध्दे, त्यांचे सहकारी, मदिनेची व्यवस्था लावताना त्यांना आलेल्या अडचणी, गुलामी निर्मुलनाच्या कार्याची माहिती, वर्गीय, वंशीय उतरंडीच्या रचनेविरोधात केलेला बंड, एकेश्वरवादाचा प्रचार असे अनेक विषय मध्ययुगीन कव्वालीचे लेखक हाताळत असत.  भाषा आणि विषय ठरल्यानंतर कव्वालीची सुरुवात प्रेषितांच्या विधानाने केली जायची. त्याकाळात सर्वाधीक लोकप्रिय ठरलेले कव्वालीचे कौल हे “मन कुंतू मौला–फ अल्ली मौला” होते. अमीर खुसरोंनी पुढे कौलच्या नंतर तत्कालीन लोकप्रिय गाण्यांचे चालीतील बोल जोडण्याचा प्रघात पाडला. उदाहरणार्थ-

“मन कुंतू मौला–फ अल्ली मौला
दर ए दिल दर ए दिल दर ए दानी
दर तुम, तानानानाना तानानानारे
ताना, तानानारे ”

प्रेषितांच्या कौलने कव्वालीची सुरुवात केली जाण्याची प्रथा त्याकाळी प्रचलीत झाली असली तरी खुसरोंनी त्यात बदल केला. खुसरोंनी कव्वालीला गंगा जमनी संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर लिहिण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यामुळे प्रेषितांच्या कौलवरुन सुरु होणाऱ्या कव्वालीत बदल होत गेले. या कौलमध्ये नवनवे पायंडे पडत गेले. ज्याकाळात संगीताच्या क्षेत्रात खुसरो कव्वाली आणि अल्लाहच्या आरधनेसाठी गीत आणि स्वरांची रचना करत होते त्याकाळात मुसलमान त्याला हराम मानायचे. खुसरोंनी प्रयत्नपूर्वक मुसलमानांना कव्वाली आणि सुफी संगीताशी जोडण्याचा प्रयत्न केला. त्यातून कव्वालीचे नवनवे रुप आणि प्रकार समोर येत गेले. हा कव्वालीच्या सुरुवातीच्या टप्प्याचा इतिहास आहे. 

खुसरोंच्या नंतर नसिरोद्दीन चराग दहेलवी, बहालोद्दीन बहलोल, अब्दुल कादीर जामिआबादी, कुतुबुद्दीन अब्दुल गंगोही यांनी कव्वालीच्या स्वरुपात, त्याच्या रचनाबंधात आणि संगीतात भर घालण्याचा प्रयत्न केला. कव्वाली मोहम्मद तुघलकाच्या देवगिरीत राजधानी स्थापन करण्याच्या घटनेनंतर दखनेत पोहोचली. येथे आल्यानंतर बंदानवाज, त्यांचे पिता राजू खत्ताल, लाडले मशायख, शाह शम्सुल उश्शाक मिराजी, अमीनुद्दीन आला यांनी त्याला दखनेच्या सांस्कृतिक रंगात रंगवण्याचा प्रयत्न केला.  

- सरफराज अहमद 
 

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

 

Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter