काश्मीर म्हटले की पूर्वी आपल्या डोळ्यासमोर दहशदवाद, हिंसाचार आणि दगडफेक याच गोष्टी येत असत. कलम ३७० हटवल्यानंतर या सर्व गोष्टींना बऱ्याच प्रमाणात आळा बसला आणि काश्मीरमध्ये खऱ्या अर्थाने शांती पुनर्प्रस्थापित होऊ लागली. काश्मीरची खरी ओळख म्हणजे ‘काश्मिरीयत’. इथल्या शैव, सुफी परंपरेतून आकाराला आली हिंदू-मुस्लिमांची मिश्र संस्कृती. गेल्या काही काळापासून या संस्कृतीचा पुनःप्रत्यय येऊ लागला आहे. त्याच दिशेने एक आश्वासक पाऊल टाकण्यात आले. आणि त्याला हातभार लागला आहे पुण्यातून.
सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यातून झाली आणि महाराष्ट्रभर तो उत्साहाने साजरा केला जात असला तरी त्याला आता अखिल भारतीय स्वरूप प्राप्त झाले आहे. आणि आता तर हा गणेशोत्सव काश्मिरमध्ये सुद्धा साजरा होणार आहे. पुण्यातील सात गणेश मंडळांच्या सहकार्याने काश्मिरमध्ये गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
पुण्यात नुकत्याच झालेल्या जाहीर कार्यक्रमात पुण्यातील मानाच्या मंडळांच्या गणेश मूर्तींची प्रतिकृती काश्मीरमधील मंडळांना सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळाच्या गणपतीची प्रतिकृती काश्मीरच्या लाल चौकातील गणपतीयार ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात आली. तर गुरूजी तालीम गणेश मंडळाची प्रतिकृती कुपवाडा येथील गणेश मंडळाला देण्यात आली. तुळशीबाग गणेश मंडळाची प्रतिकृती अनंतनाग येथील गणेश मंडळाला सुपूर्द करण्यात आली. काश्मीरमधील गणेश मंडळांचे पदाधिकारी मोहित भान, संदीप रैना, संदीप कौल, नितीन रैना यांनी पुण्याच्या मानाच्या गणपतींच्या या प्रतिकृती स्वीकारल्या.
काश्मिरमधील गणेशोत्सवाबद्दल बोलताना अनंतनाग येथील गणेश मंडळाचे पदाधिकारी संदीप रैना म्हणाले, “मागील वर्षी आम्ही अनंतनागमध्ये दीड दिवसाचा गणपती बसवला होता. परंतु यंदा आम्ही ५ दिवसांचा गणेशोत्सव साजरा करतोय. ११ तारखेला विसर्जनाच्या दिवशी आम्ही महापुजेचे आयोजन केले आहे. त्यानंतर ४ वाजता आम्ही संगम नदीमध्ये गणेश विसर्जन करणार आहोत.”
गणेशोत्सवातील काश्मिरवासियांच्या सहभागाविषयी बोलताना रैना म्हणतात, “काश्मीर म्हटलं की तणाव, लष्कर असं चित्र डोळ्यांसमोर येतं. परंतु या पलीकडे असणाऱ्या काश्मिरच्या सामाजिक संस्कृती आणि धार्मिक एकोप्याबद्दल अनेकांना माहिती नसते. तणावग्रस्त परिस्थितीनंतरही काश्मिरमधील बंधुभाव अजूनही तसाच टिकून आहे. आम्ही हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येत सगळेच सण-उत्सव साजरे करत असतो. काश्मीरमध्ये मुस्लिम समाज अधिक आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय आमचे कोणतेच काम पूर्ण होत नाही. काश्मीरमध्ये पूर्वीपासूनच असलेली हिंदू मुस्लिम सौहार्दाची परंपरा आणि त्यातून जपली जाणारी संस्कृती आजही तशीच टिकून आहे.”
विघ्न दूर करणारा, सुख शांती देणारा देव म्हणजे गणपती. त्यामुळे काश्मीरमध्ये गणपतीचं आगमन आनंद देणारं, चेतना निर्माण करणारं असल्याची भावना शेवटी संदीप रैना यांनी व्यक्त केली.
पुण्यातील मंडळांनी असा घेतला पुढाकार
काश्मिरमध्ये शांतता नांदावी आणि तेथील सौहार्द टिकून राहावा यासाठी पुण्यातील सात गणपती मंडळानी एकत्र येत सलग दुसऱ्या वर्षी तिथे गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले. यावर्षी काश्मीरमध्ये तीन ठिकाणी गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यासाठी पुण्यातील मानाच्या गणेश मंडळांच्या गणेश मुर्ती विधीवत पूजा करून काश्मिरी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे सोपवण्यात आल्या.
या उपक्रमाविषयी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन सांगतात, “काश्मिरमधील मंडळांच्या कार्यकर्त्यांनी यंदा काश्मीरमध्ये तीन ठिकाणी हा उत्सव साजरा करण्याचा प्रस्ताव आमच्यासमोर मांडला. पुण्याची सांस्कृतिक परंपरा जपणारा हा उत्सव आता काश्मीरमध्ये साजरा होत आहे याचा आम्हाला आनंद आहे. या गणेशोत्सवामुळे भारताचा स्वर्ग असलेल्या काश्मीरमध्ये शांतता नांदो, हीच बाप्पा चरणी प्रार्थना.”
अशी आहे काश्मीरमधील गणेशोत्सवाची परंपरा
काश्मिरच्या लाल चौकातील पंचमुखी मारुती मंदिरात ४० वर्षांहून अधिक काळापासून गणेशोत्सव साजरा केला जातो. जम्मू काश्मीरमध्ये राहणाऱ्या महाराष्ट्रीय कुटुंबांनी ही परंपरा सुरु केली. या उत्सवात काश्मिरी मुस्लीम, पंडित, शीख, बंगाली मंडळींचाही मोठा सहभाग असतो. गेल्या वर्षी इथे दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. यंदा काश्मिरमध्ये तीन ठिकाणी हा उत्सव साजरा होणार आहे.