पुण्यातील गणेशोत्सवाची ख्याती महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगभर आहे. समाजाला एकसंध करण्यासाठी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरु झालीहोती. हाच वारसा सांगणाऱ्या पुण्यातील या गणेशोत्सवानेवैचारिक व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम अशी परंपरा आजही कायम ठेवली आहे.
पुण्याची हीच संस्कृती जपत सुरेश कलमाडी यांनी गणेशोत्सव काळात होणारा ‘पुणे फेस्टिव्हल’ राष्ट्रीय पातळीवर पोहोचवला. ३५ वर्षांपूर्वी सुरु झालेल्या या महोत्सवाने पुण्याला ओळख तर दिलीच पण सांस्कृतिक क्षेत्राला गतीदेखील दिली आहे. यंदा ३६व्या पुणे फेस्टिव्हलला धूम धडाक्यात सुरुवात झाली आहे. या फेस्टिव्हलचा एक अनोखा आणि धार्मिक सौहार्द जपणारा भाग म्हणजे ‘ऑल इंडिया मुशायरा’. पुणे फेस्टिव्हलमध्ये १९९२ पासून हा मुशायरा आयोजित केला जात आहे.
कवितेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला उर्दूने नेहमीच भुरळ घातली आहे. मराठी प्रेक्षक आणि उर्दू शेर ओ शायरी यांचा सुरेख संगम साधलेला ‘ऑल इंडिया मुशायरा’ हा आगळा वेगळा कार्यक्रम पुण्यातील स्वारगेट येथील गणेश कलाक्रीडा रंगमंच येथे संपन्न होणार आहे. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता सुरु होणाऱ्या कार्यक्रमाला अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावणार आहेत.
या कार्यक्रमाला परराष्ट्र मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री व प्रख्यात लेखक सलमान खुर्शीद आणि राज्यसभा खासदार व प्रसिद्ध उर्दू कवी इम्रान प्रतापगढ़ी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रसिद्ध कवी अज्म शाकिरी, मारूफ रायबरेलवी, शाइस्ता सना, अहमद कमाल हशमी, रफीक सर्वर, शाहिद आदिल, अनिस शौक, काशिफ सय्यद, विशाल बाघ यांच्या उर्दू शायरीची सांस्कृतिक मेजवानी आज रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
त्याचबरोबर पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक सुरेश कलमाडी, डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. ए. इनामदार, डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष आबेदा इनामदार हे देखील या मुशायऱ्याला उपस्थित राहणार आहेत.