आषाढी एकादशीनिमित्त अवघा महाराष्ट्र आज विठुरायाच्या भक्तीत न्हाऊन निघाला आहे. पंढरपूरसह राज्यातील विविध ठिकाणच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविक पहाटेपासून गर्दी करीत आहेत. अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा देण्यासाठी आपल्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट केली आहे. "आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! भगवान विठ्ठलाचे आशीर्वाद नेहमीच आपल्यासोबत असू देत आणि आपल्या सर्वांना आनंद आणि समृद्धीने परिपूर्ण समाजाची उभारणी करण्याची प्रेरणा मिळू दे".
"या उत्सवामुळे आपल्यामध्ये भक्तीभाव, नम्रता आणि करुणा वाढीला लागू दे. अतिशय प्रामाणिकपणे गरिबातील गरिबाची सेवा करण्यासाठी देखील आपल्याला प्रेरणा मिळू दे", अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून केली आहे.
मुख्यमंत्री शिंदे सपत्नीक विठूराया चरणी लीन
आज विठुरायाच्या नामाने अवघे पंढरपूर दुमदुमून गेलं आहे. गेल्या महिन्याभरापासून पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी आतुर झालेले वारकरी लाखोंच्या संख्येने पंढरपुरात दाखल झाले आहेत. आपल्या विठ्ठलाच्या भेटीनं वारकऱ्यांचं मन तृप्त झालं आहे.
दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास सपत्नीक विठ्ठलाची पूजा केली आहे. राज्यातील शेतकरी, वारकरी सुखी होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, पिक चांगलं येऊ दे, बळीराजाला सुखी-समाधानी राहू दे, असं साकडं आपण विठुरायाच्या चरणी घातल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले.