राष्ट्रपती, पंतप्रधानांसह मान्यवरांनी दिल्या महावीर जयंतीच्या शुभेच्छा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 4 d ago
 भगवान महावीर
भगवान महावीर

 

दरवर्षी चैत्र शुक्ल त्रयोदशीच्या दिवशी जैन धर्माचे अनुयायी महावीर जयंती साजरी करतात. महावीर जयंती हा जैन धर्माचा एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. भगवान महावीर हे जैन धर्माचे २४ वे आणि शेवटचे तीर्थंकर होते.  आज देशभर हा उत्सव साजरा होत असून राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

मान्यवरांच्या शुभेच्छा 

महावीर जयंतीच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहले, “भगवान महावीरांना आपण सर्वजण नमन करतो. त्यांनी नेहमीच अहिंसा, सत्य आणि करुणेवर भर दिला. त्यांचे आदर्श जगभरातील असंख्य लोकांना बळ देतात. जैन समुदायाने त्यांच्या शिकवणी सुंदरपणे जतन केल्या आहेत आणि लोकप्रिय केल्या आहेत. भगवान महावीर यांच्या प्रेरणेने, त्यांनी जीवनाच्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि सामाजिक कल्याणात योगदान दिले आहे.”  
 

तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महावीर जयंतीच्या शुभेच्छा देताना म्हटले, “महावीर जयंतीनिमित्त सर्व देशवासीयांना, विशेषतः जैन समुदायातील सर्व लोकांना हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. अहिंसा आणि शांतीचे मूर्त स्वरूप असलेल्या भगवान महावीरांनी मानवतेला त्याग, सत्य आणि त्यागाचा मार्ग दाखवला.  आपण सर्वजण त्यांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करूया आणि संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी काम करण्याची प्रतिज्ञा करूया.” 
 
तसेच अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले, “सर्वांना भगवान महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य हे त्यांचे मंत्र आजही मानवतेला समृद्ध करत आहेत. त्यांचे संदेश मानवी जीवनासाठी नेहमीच अपरिहार्य राहतील.”
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लिहले, “सर्व देशवासीयांना भगवान महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. भगवान महावीरजींनी दिलेले सत्य, अहिंसा, करुणा आणि सामाजिक सौहार्दाचे संदेश मानवी समाजाला अनंतकाळ मार्गदर्शन करत राहतील. मी भगवान महावीरांना सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो.”
 
याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, “जय जिनेन्द्र! जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांना वंदन.  महावीरांची अहिंसा, सत्य आणि करुणेची शिकवण आपल्याला सतत मार्गदर्शन करत आहे. सर्वांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा!” 
 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील सर्वांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, “राज्यातील नागरिकांना भगवान महावीर जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! ‘अहिंसा हाच सर्वात मोठा धर्म आहे. तुम्ही जगा, दुसऱ्यांना जगू द्या. लोभ, क्रोध, अभिमान, आसक्ती हेच मोठे शत्रू आहेत, त्यांना स्वत:पासून दूर ठेवा. स्वत:वर मिळवलेला विजय सर्वश्रेष्ठ विजय असतो. प्रत्येक आत्म्यात आनंद असतोच, स्वत: आनंदी रहा आणि दुसऱ्यांना आनंदी ठेवा...,” भगवान महावीरांच्या या विचारांमध्ये सर्वांना सुखी करण्याची ताकद असून मानवकल्याणाचे हे विचार आचरणात आणण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करुया.”

भगवान महावीर यांच्याविषयी 
भगवान महावीर हे जैन धर्माचे २४ वे आणि शेवटचे तीर्थंकर होते. त्यांचे मूळ नाव वर्धमान होतं. वर्धमान यांचा जन्म एका राजघराण्यात झाला. पण त्यांनी लहानपणापासूनच ऐहिक सुखांचा त्याग करून आध्यात्मिक मार्ग स्वीकारला. वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी राजवैभव सोडलं आणि कठोर तपश्चर्या सुरू केली. 12 वर्षांच्या कठीण तपानंतर त्यांना कैवल्यज्ञान प्राप्त झालं, म्हणजेच त्यांना सर्व सत्यांचा बोध झाला. तेव्हापासून त्यांना ‘महावीर’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. 

महावीरांनी आपल्या आयुष्यात अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य या पाच मूलभूत तत्त्वांचा प्रचार केला. त्यांनी जैन धर्माला नवीन दिशा दिली आणि सर्व प्राणीमात्रांबद्दल करुणा आणि प्रेमाचा संदेश दिला. महावीरांचा अहिंसेचा संदेश आजच्या काळातही खूप महत्त्वाचा आहे. आज जगभरात गैरसमज वाढत आहेत. अशा वेळी महावीरांचे अहिंसा, सत्य आणि करुणेचे तत्त्व आपल्याला शांती आणि सौहार्दाची शिकवण देतात.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter