ताजीयांच्या दर्शनाला सर्वधर्मीयांची गर्दी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 1 Months ago
पुण्यातील ताजीयांचे प्रातिनिधिक छायाचित्र
पुण्यातील ताजीयांचे प्रातिनिधिक छायाचित्र

 

मोहरम निमित्त मलंग फाउंडेशन मलंग ताजिया कमिटीच्यावतीने केदारी रोड, भोपळा चौक येथे ताबूत बसविण्यात आले असून, मुस्लिम बांधवांसह इतर धर्मातील लोकांनी ताबूतचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली. सुमारे १७ फूट उंच असलेले हे ताबूत फुलांनी व विद्युत रोषणाईने सजविण्यात आले आहे. 

फाउंडेशनचे अध्यक्ष फैज शेख, बिलाल शेख, टिपू बागवान, आमीर शेख, केविन पिल्ले, मुसा शेख, तौसिफ कुरेशी आदींनी संयोजन केले. मोहरमनिमित्त शंभर वर्षांहून अधिक काळापासून सर्वधर्म समभाव, एकोपा व बंधुतेचे बीज समाजामध्ये रुजविण्याचे काम मुस्लिम बांधव कॅम्प भागात करत आहेत. ताबूत बसवणे म्हणजे इमाम हुसैन यांच्या प्रतीकात्मक कबरीचे निर्माण करणे आणि त्याची मिरवणूक काढणे होय. या मिरवणुकीत सहभागी होणारे लोक इमाम हुसैन यांच्या बलिदानाचे स्मरण

करतात आणि शोक व्यक्त करतात. एकूण दहा दिवस हे ताबूत मंडपात बसविले जाते. या दिवसात पाणी, सरबत व अन्नदान करणे हे पुण्याचे काम मानले जाते. सातव्या दिवशी बारा इमाम यांची मिरवणूक तर नवव्या दिवशी ताबूत आणि पंज्यांची मिरवणूक काढली जाते. 

दहाव्या दिवशी या ताबूतचे शिवाजीनगर येथील संगमघाटात विसर्जन केले जाते. दरम्यान, २००५ मध्ये गणेशोत्सव व ताबूत एकाच दिवशी व एकाच महिन्यात आल्याने गणेश मूर्ती व ताबूतची स्थापना एकाच मंडपात केल्याने सर्वधर्म समभावचा संदेश यानिमित्त देण्यात आला होता.