‘काश्मिरीयत’ने मिळवायला हवा दहशतवादावर विजय!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 10 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात २६ जण मरण पावले. या हल्ल्यात काश्मिरी घोडेस्वार मालक सय्यद आदिल हुसेन शाह याने पर्यटकांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. हा धाडसी काश्मिरी माणूस आपल्या कुटुंबाचा एकमेव आधार होता. पर्यटकांना सेवा देऊन तो उदरनिर्वाह करत होता. दहशतवाद्यांना सर्वात जास्त भीती धर्माची नाही तर दहशतवादाविरुद्धच्या प्रतिकाराची आहे, हे आदिलच्या उदाहरणातून स्पष्ट होते.

या दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना त्यांचे नाव आणि धर्म तपासून का ठार मारले? त्यांना या रक्तरंजित कृत्याने काय सांगायचे होते? काय पटवायचे होते? प्रत्येक पर्यटक काश्मीरचे सौंदर्य अनुभवण्यासाठी तिथे आला होता. व्यवस्था त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेईल हा विश्वास त्यांना आहे. परंतु इथे एखाद्या व्यक्तीची श्रद्धा त्याच्या मृत्यूचे कारण बनली. पहलगाममध्ये झालेल्या या हत्याकांडाने दहशतवादाला धार्मिक रंग चढला आहे.

जगाने अनेक वर्षांपासून इस्लामच्या नावाखाली अत्यंत क्रूर दहशतवाद पाहिला. दहशतवादामुळेच या धर्माच्या वाट्याला बदनामी आली. इस्लाम धर्म शांतता आणि मानवतेचा पुरस्कार करतो, असे सांगितले जाते. परंतु बायसरण, पहलगाम येथे काय घडले? तर दहशतवाद्यांनी कलमा म्हणू न शकणाऱ्या प्रत्येकाला गोळ्या घातल्या. कलमा ही इस्लाममधील अत्यंत पवित्र गोष्ट आहे. अशाप्रकारे कलमा न म्हणता येणाऱ्याला गोळी घालून त्यांनी इस्लामवरच हल्ला केला. त्यांनी दहशतवादाला धर्माशी जोडण्याचा प्रयत्न केला. पण दहशतवादाचा कोणत्याही धर्माशी किंवा श्रद्धेशी संबंध नाही. पहलगाममधील या हल्ल्याने मात्र या साऱ्या समजुतींना धक्का दिला आहे. पाकिस्तानमधील कट्टर धार्मिक विचारसरणी या दहशतवादाला खतपाणी घालते, यात काही शंका नाही.

हल्ल्यानंतर व्हायरल झालेल्या फोटोमधील नवविवाहित जोडप्याची कहाणी मन हेलावणारी आहे. तिच्या पतीचा धर्म कळताच दहशतवाद्यांनी त्याला गोळ्या घातल्या. ती नववधू आपल्या मृत पतीजवळ स्तब्ध बसली होती. ही घटना पुरावा देते तो धार्मिक कट्टरता आता दहशतवादाचा नवा धर्म बनला आहे. हा दहशतवाद शेजारील देशातील दहशतवादी कारखान्यामधून पसरवला जातो.

धर्माचा खोलवर विचार करून त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे. करुणा, प्रेम, एकता आणि मानवता शिकवणारा धर्म दहशतवादाचा चेहरा कसा बनला आहे, यावर चिंतन करणे गरजेचे आहे. याविषयी एकदा मी एका इस्लामी धार्मिक नेत्यासही बोललेही होते. ‘इस्लाम शांततेचा धर्म आहे’ असे इस्लामी विद्वान आणि जबाबदार मुस्लिम नेते म्हणतात. मग दहशतवाद फक्त याच धर्माशी का जोडला जातो? 

आजही हा प्रश्न आपण केवळ इस्लामी तज्ज्ञांनाच नव्हे तर प्रत्येक मुस्लिमाला विचारायला हवा. प्रत्येक मुस्लिमाने यावर विचार करायला हवा. त्यांनी या दहशतवाद्यांना चुकीचे ठरवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. बंदुकीच्या जोरावर धर्माला ढाल बनवून दहशतवादी आपले कृत्य का करतात? इस्लामी कट्टरता दहशतवादाचा चेहरा का बनली? या बाबींवर विचार व्हायला हवा. 

काश्मिरच्या स्थानिक जनतेने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. मस्जिदींमधून दहशतवादाविरुद्ध घोषणा देणे ही स्वागतार्ह बाब आहे. काश्मीरमध्ये प्रथमच मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी पाकिस्तानच्या दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या धोरणावर उघडपणे टीका केली. परंतु असे असले तरीही शेजारील देशातील दहशतवादी कारखान्यांचे करायचे काय हा प्रश्न कायम आहे. या दहशतवादी शाळांना संपवायला हवे. धार्मिक नेत्यांच्या वेशात लपलेल्या गुन्हेगारांना पकडायला हवे. ते धर्माच्या नावाखाली लोकांना भडकवतात आणि दहशतवाद पसरवतात. तसेच इस्लामविरोधी कृत्ये ही करतात. माझ्या एका काश्मिरी विद्यार्थ्याने व्हॉट्सअॅपवर लिहिले की, “ते (दहशतवादी) आम्हाला (काश्मिरींना) कधीच शांततेत जगू देणार नाहीत.” ही खरी जाणीव आहे. हीच जाणीव सगळ्यांना व्हायला हवी.

सामान्य काश्मिरींनाही लोकांचे गैरसमज दूर करण्यात मोठी भूमिका बजवायची आहे. त्यांना भीतीवर मात करायची आहे. काश्मीर हा दहशतवाद्यांच्या खेळाचे मैदान नाही, असा विश्वास जगाला द्यायचा आहे. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा काश्मिरी लोक या हल्ल्याकडे केवळ पर्यटन आणि अर्थव्यवस्थेवरचा हल्ला म्हणून पाहणार नाहीत. हा प्रश्न अर्थव्यवस्थेपेक्षा मोठा आहे. हा त्यांच्या धर्मावर आणि सांस्कृतिक ओळखीवर, म्हणजेच काश्मिरियतवर हल्ला आहे. आता प्रत्येक काश्मिरीने दहशतवाद आणि कट्टरतेविरुद्ध आवाज उठवायला हवा. भारतीय एकतेच्या संस्कृतीचा सशक्त आवाज दुमदुमायला हवा. काश्मिरींनी संरक्षण दलांसोबत आणि संपूर्ण भारतासोबत दहशतवाद्यांविरुद्ध उभे राहायला हवे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा सामाजिक, तात्विक, धार्मिक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानवतावादी दृष्टिकोनातून अभ्यास व्हायला हवा. इस्लामी तज्ज्ञांनी आत्मपरीक्षण करायला हवे. त्यांचा आवाज वक्फ आणि तिहेरी तलाकच्या राजकारणात तीक्ष्ण असतो. मग इथे त्यांना चिंता का वाटत नाही? इस्लामी विद्वान आणि इस्लामवर विश्वास ठेवणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे. या हल्ल्याचा निषेध करायला हवा. मानवतेच्या बाजूने उभे राहायला हवे. या दहशतवादाच्या कलंकापासून धर्माला मुक्त करायला हवे.

काश्मिरी पाहुणचार अख्ख्या जगात प्रसिद्ध आहे. पहलगाममधील हा हल्ला काश्मिरी आणि काश्मिरियतवर हल्ला आहे. बळी पडलेले पर्यटक निष्पाप आहेत. पण खरा त्रास काश्मिरींना आहे. पर्यटन हा सामान्य काश्मिरींचा आधार आहे. आता काश्मिरींनी विचार करून कृती करायला हवी. काश्मीरची खरी ओळख घेऊन त्यांनी जगापुढे उभे राहायला हवे. त्यांना संरक्षण देणाऱ्या संरक्षण दलांसोबत आणि सरकारसोबत त्यांनी एकत्र यायला हवे. प्रत्येक काश्मिरीने दहशतवादाला विरोध करायला हवा. जगभरातील पर्यटकांना काश्मीरकडे आकर्षित करणारी काश्मिरियत त्यांनी टिकवायला हवी. 

काश्मीरी नागरिकांनी दहशतवादाच्या धोक्याविरुद्ध उठाव करावा आणि धार्मिक कट्टरतेला प्रतिकार करावा. सूफी संस्कृती आणि परंपरेमुळे काश्मीर कधीही कट्टर विचारधारेचे केंद्र नव्हते. परंतु पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाने ती प्रतिमा खंडित केली आहे. काश्मीरच्या सुफी परंपरेचे खरे वारसदार असणाऱ्या काश्मिरींनी पाकिस्तानींना उघडे पाडण्याची वेळ आली आहे. 

काल्हणाची राजतरंगिणी, लाल देद यांची उत्कट आध्यात्मिक कविता, हजरत शेख नूरुद्दीन नूरानी यांची शिकवण, काश्मीरच्या प्राचीन मंदिरांतील घंटांचा नाद आणि काश्मीरच्या मस्जिदींमधून नमाजसाठी अजान. हा वारसा आणि परंपरा त्यांनी पुन्हा पुनरुजीवीत करायला हवा. 

पाकिस्तानच्या दहशतवादी कारखान्यांमधून पसरवला जाणारा कट्टर इस्लाम हा काश्मिरींचा धर्म नव्हे. तर दहशतवादाविरुद्धचा लढा हाच त्यांचा खरा धर्म आहे. आपल्या सुंदर सुफी भूमीत आलेल्या पर्यटकांचा जीव वाचवण्यासाठी बलिदान देणाऱ्या सय्यद आदिल हुसेन शाह याने हे दाखवून दिले आहे. काश्मिरियतने नेहमीच कट्टरतेचा विरोध केला आहे. यापुढेही ते ठामपणे आणि निष्ठेने लढत राहतील. एकत्र येऊन आपण मानवतेविरुद्धच्या या युद्धात नक्कीच विजय मिळवू.

- डॉ. सय्यद मुबिन झेहरा
(लेखिका शिक्षणतज्ज्ञ, स्तंभलेखक आणि इतिहासकार आहेत. स्त्री-पुरुष समानता आणि मानवी हक्कांसोबतच धार्मिक मुलतत्ववादाविरोधात त्या सातत्याने लेखन करत आहेत.)

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter