धार्मिक सुसंवाद आणि शांततापूर्ण सहजीवन यांचे पुरस्कर्ते जावेद अहमद गामदी

Story by  Sameer D. Shaikh | Published by  sameer shaikh • 1 Years ago
जावेद अहमद गामदी
जावेद अहमद गामदी

 

इस्लाम आणि मुस्लिम हे भारतात किंवा जगात कायम चर्चेत राहणारे ‘महत्त्वाचे’ विषय. साहजिकच या दोन्ही विषयांनी मिडियातील प्राईम टाईम व्यापलेले असतात. इस्लामविषयी असलेल्या अज्ञानातून, आकर्षणातून किंवा भीतीतून त्याविषयी जाणून घेण्याची सर्वसामन्यांना (विशेषतः मुस्लीमेतरांना) उत्सुकता असते. 

दुसरीकडे इस्लामिक दहशतवादी, आयसीस वैगरेमुळे मुस्लीमेतरांच्या मनात इस्लाम आणि मुस्लीम यांच्याविषयी एकप्रकारचा फोबिया तयार होतो (किंवा तयार केला जातो.) नुकत्याच एका आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार जाणीवपूर्वक पसरवल्या जाणाऱ्या अफवांमध्ये (ज्याला disinformation असे म्हणतात) बहुतेक अफवा या इस्लाम आणि मुस्लीम विषयक असते. आणि त्यापैकी ८० टक्के माहिती (अफवा) भारत आणि अमेरिका या दोन राष्ट्रांमध्ये तयार होते.  

सर्वसामान्यांपर्यंत अशी माहिती किंवा गैरसमज पसरवण्यामागचा उद्देश आणि त्यांचे परिणाम याविषयी  सर्वजण बऱ्यापैकी अवगत आहोतच. त्यामुळे,  इस्लाम हा कसा एकारलेला, एकसंध (monolithic) धर्म आहे, त्यात चिकित्सेला तर्काला जागा नाही असा सर्वसामान्य समज तयार झाला आहे. मुस्लिमेतरांचाच नव्हे तर खुद्द मुस्लिमांचाही. 

इस्लामच्या आरंभापासूनच इस्लाम विषयक वेगवेगळी मांडणी होत आहे. तिचं व्यवस्थित संकलन आणि संपादनही होत आहे. इतकेच नव्हे तर या पारंपारिक इस्लामी ज्ञानाची चिकित्सा करण्याची आणि खंडनमंडन करण्याची मोठी परंपराही राहिली आहे.  

धर्मशास्त्राच्या आणि कायदेशास्त्राच्या या वैविध्यपूर्ण  अभ्यासामुळेच इस्लाममध्ये विविध ज्ञानशाखा तयार झालेल्या आढळतात. यात अनेक विचारवंतांनी इस्लामची काळानुरूप मांडणी करण्याचा प्रयत्नही केलेला आढळतो. चौदाशे वर्षांपूर्वी म्हणजे इस्लामच्या जन्मकाळी सुरु झालेला प्रवास आजतागायत अखंडपणे सुरु आहे. आधुनिक काळातही अनेक विचारवंत आणि संशोधक आपापल्या पद्धतीने इस्लामची मांडणी करताना आढळतात. प्रत्येक धर्माप्रमाणे इस्लाममध्येही धर्मविषयक टोकाची मते मांडणारे गट अस्तित्वात आहेत. त्याचवेळी उदारमतवादी, सुधारणावादी विचार मांडणारा किंचितसा अल्प का होईना पण एक प्रवाहही सुरुवातीपासूनच आढळतो.  मात्र इस्लामने केलेल्या सामाजिक धार्मिक क्रांतीवर जवळपास सर्वांचेच एकमत आहे. 

इतर धर्म काळानुरूप बदलले तरी इस्लाम आणि मुस्लीम काळानुरूप बदलले नाहीत असा एक आक्षेप सर्वसाधारणपणे घेतला जातो. वरवर पाहता हे खरे भासत असले तरी ही मांडणी तितकीशी वस्तुस्थितीला धरून नाही. आधुनिक काळाचा आणि केवळ भारतीय उपखंडाचा जरी विचार करायचा झाल्यास इथे सर सय्यद अहमद खान यांच्यापासून मौलाना आझाद यांच्यापर्यंत अनेक मुस्लिम विचारवंतांनी इस्लामची आधुनिक दृष्टीकोनातून मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. जावेद अहमद गामदी हे त्यापैकीच एक महत्त्वाचे विचारवंत आहेत. 

१८ एप्रिल १९५२ मध्ये पाकिस्तानातील पंजाब येथे जन्मलेले जावेद अहमद गामदी हे आजच्या काळातील आणि विशेषतः सोशल मिडिया युगात इस्लामची उदारमतवादी, विवेकी आणि सर्वसमावेशक मांडणी करणाऱ्या विचारवंतांपैकी एक महत्त्वाचे विचारवंत आहेत. 

गामदी  यांचे कुटुंब सुफी परंपरेतले होते. त्यांचे वडील स्वतः सुफी विचारांचे साधक होते. आपल्या मुलाने धर्मशास्त्राचा अभ्यास करावा असं त्यांना वाटायचं. तर आईला वाटायचं जावेद यांनी आधुनिक शिक्षण घ्यावं. आई-वडिलांच्या दोघांच्या मताचा आदर करत त्यांनी साहित्य, तत्वज्ञान आणि इतर आधुनिक शिक्षणाबरोबरच अरबी आणि फारसी या भाषांमध्येही प्राविण्य मिळवले. 

महाविद्यालयीन जीवनात इस्लामचा अभ्यास करत असताना सुरुवातीच्या काळात ते जमाती इस्लामीचे प्रमुख आणि इस्लामचे प्रकांड पंडित मौलाना मौदुदी यांच्या संपर्कात आले. मात्र काही दिवसांतच इस्लामच्या मांडणीविषयी दोघांमध्ये मतभेद झाले आणि गामदी नवा मार्ग चोखळायला सुरुवात केली.  एके दिवशी लायब्ररीत पुस्तके चाळत असताना इस्लामी विचारवंत हमिदुद्दिन फराही यांच्या कुराणभाष्याची प्रत त्यांच्या हाती लागली.  फराही यांनी केलेले कुराणचे आणि पर्यायाने धर्माचे निरुपण त्यांना आवडले. फराही यांच्या इस्लामी तत्वज्ञानाचा  अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी त्यांनी लाहोर येथे राहणारे फराही यांचे शिष्य अमीन अहसान फराही यांची भेट घेतली. त्यांच्याशी झालेल्या विस्तृत चर्चेतून गामदी यांचा इस्लाम विषयक नवा दृष्टिकोन आकाराला आला. 

जावेद अहमद गामदी यांनी सुरुवातीला पाकिस्तानात राहूनच इस्लामविषयीची नवी मांडणी करायला सुरुवात केली. इस्लाम हा वैश्विक धर्म असून तो मानवतावादी आहे व विवेक आणि तर्क यांच्या आधारेच इस्लामचे सार अधिक चांगल्या प्रकारे कळू शकेल ही त्यांची प्रमुख मांडणी होती. हा रोजच्या जीवनाशी जगण्याशी निगडित असलेला धर्म असून तुम्हाला एक चांगला माणूस बनवणे हा धर्माचा प्रमुख उद्देश असल्याचे ते म्हणाले. प्रस्थापित मुल्लामौलवी आणि मूलतत्त्ववादी यांना त्यांची उदारमतवादी व सर्वसमावेशक मांडणी पटली नाही. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. शेवटी २०१० मध्ये जावेद अहमद गामदी यांनी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. तिथे त्यांनी इस्लामची आधुनिक मांडणी करणाऱ्या रिसर्च सेंटरची स्थापना केली.  या रिसर्च सेंटरमधूनच आता ते इस्लामच्या विविध पैलूंवर जगभरातल्या मंडळींशी, विशेषतः तरुणांशी चर्चा करतात. त्यांचे हजारो व्हिडिओज इंटरनेटवर उपलब्ध आहेत आणि ते प्रचंड लोकप्रियही ठरत आहेत. 

पाकिस्तानमध्ये सध्या बस्तान बसवलेल्या इस्लामिक मूलतत्त्ववादाचा, तालिबानी आणि दहशदवादी प्रवृत्तीचा ते अनेक दशकांपासून विरोध करत राहिले. मात्र त्यांच्या मांडणीकडे आणि त्यांनी सांगितलेल्या धोक्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आज धर्म मूलतत्ववाद्यांच्या तावडीत सापडल्याचे ते वारंवार सांगतात. 

‘इस्लामिक राज्य’ ही धर्माने बाध्य केलेली संकल्पना नाही असे ते बजावतात. आज इस्लामी देशांमध्ये रुजलेल्या एकाधिकारशाही आणि राजेशाही यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही असे ते म्हणतात. कुराणच्या ४२ व्या अध्यायातील ३८ व्या श्लोकाचा (आपापसातील सहमतीने व्यवहार करा) आधार घेऊन ते हे दाखवून देतात की इस्लामने तत्कालीन परिस्थितीत लोकशाहीच्या दिशेने पाऊल टाकले होते.    

त्यांनी केलेल्या मांडणीनुसार जिहाद हे फक्त आणि फक्त अन्यायाच्या विरोधात उठाव करण्याचे इतर सर्व मार्ग बंद झाल्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून करायचा संघर्ष आहे. आणि हा संघर्ष कदापि वयक्तिक स्वरूपाचा असू शकत नाही. ‘इस्लामिक राज्य’ ही संकल्पना धर्माचा मूलाधार असल्याचेही ते नाकारतात.  स्त्री आणि इस्लाम याविषयी त्यांनी केलेली मांडणी सुधारणावादी आणि आधुनिक म्हणावी अशी आहे. इस्लामने स्त्री आणि पुरुष हा भेद केवळ लग्न आणि संतती यांच्यापुरताच मर्यादित ठेवला आहे, इस्लाम स्त्रीला बुरखा घालण्याची सक्ती करत नाही, किंबहुना तो बुरख्याचे समर्थनही करत नाही या बाबी ते धर्माचा आधार घेऊनच पुराव्यानिशी पटवून देतात.   

त्याकाळी प्रचलित असलेली गुलामगिरीची व्यवस्था संपुष्टात यावी यासाठी इस्लामने सांगितलेल्या कार्यपद्धतीची ते  सुरेख मांडणी करतात.  ईशनिंदेसाठी मृत्यदंड याला कुराणमध्ये अजिबात स्थान नसल्याचे ते ठणकावून सांगतात. प्रत्येक व्यक्तीला एका ठराविक काळापर्यंत आधुनिक शिक्षणच दिलं गेलं पाहिजे. त्यानंतर त्याचा बौद्धिक आणि मानसिक विकास झाल्यावर त्याला धर्मशिक्षण दिले पाहिजे जेणेकरून त्याचा व्यक्तिमत्व विकास होईल, असा आग्रह ते धरतात. तुम्ही जीवन जगताना किती नितीमुल्ये जपता, स्वधर्मियांशी-इतर धर्मियांशी तुमचे सहसंबंध असे आहेत याच्यावरून तुम्ही किती धार्मिक आहात हे ठरतं, असे ते म्हणतात. 

मुस्लिमांनी इतर धर्मियांविषयी आणि इतर संस्कृतीविषयी उदार आणि सहिष्णू राहिले पाहिजे असे ते वारंवार सांगतात. मुस्लिमांनी स्वतःसोबतच  इतरांच्या सामाजिक उत्थानासाठी आणि मानवतेच्या रक्षणासाठी कार्य केले पाहिजे याची ते आपल्या लेक्चर्समधून आठवण करून देतात.  जावेद अहमद गामदी यांनी केलेली इस्लामची मांडणी, आंतरधर्मीय सुसंवाद आणि धार्मिक सौहार्द यांबाबतचे त्यांचे विचार या काळात खूप महत्त्वाचे आणि गरजेचे आहेत. 

इतर धर्मियांशी विशेषतः हिंदू, ख्रिश्चन आणि ज्यू धर्मियांशी सौहार्दपूर्ण  संबंध हे प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य आहे, अशी  मांडणी ते आपल्या पुस्तकांमधून आणि लेक्चर्स मधून करताना दिसतात. त्यांनी केलेली मांडणी ही आजच्या काळात खूप महत्त्वाची आणि मूलगामी स्वरूपाची आहे. तिचा प्रचार व प्रसार होणे ही इस्लामच्या दृष्टीने तर महत्त्वाचे आहेच पण इस्लाम आणि इतर धर्म आणि धर्मीय यांच्यातील संघर्ष कमी करणारी आणि अंतिमतः एक सौहार्दपूर्ण आणि शांततापूर्ण सहजीवनासाठीही गरजेचे आहे. 

- समीर दि. शेख