नवरोज साजरा करताना समाजबांधव.
नवरोज अर्थात पारसी नववर्ष जगभर मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे करण्यात येत आहे. या सणाला नवीन सुरुवात, आशा आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. नवरोजचा इतिहास फार जुना आहे.
कुर्दिश संस्कृतीत नवरोजला मोठे महत्त्व आहे. हा सण केवळ नव्या वर्षाची सुरुवात नसून संघर्षातून मिळालेल्या स्वातंत्र्याचे आणि आत्मसन्मानाचे प्रतीक मानला जातो. कुर्दिश लोक मोठ्या प्रमाणात नवरोज साजरा करतात. त्यांच्या संस्कृतीत हा दिवस नव्या उमेदीचा, लढ्याचा आणि आशेचा दिवस मानला जातो. युनेस्कोने नवरोजला जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे. नवरोज हा सण केवळ पारसी लोकांपुरता मर्यादित नसून तो इतरही समाजामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. इराण, अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, अझरबैजान आणि मध्य आशियातील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. याशिवाय, कुर्दिश, तुर्की, उयघुर आणि पारसी समुदाय देखील हा सण साजरा करतात.
नवरोज निमित्त जगभरातील विविध व्यक्तींनी शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त राष्ट्रातील काही नेत्यांचा समावेश आहे.
नरेंद्र मोदी यांनी नवरोजच्या शुभेच्छा देताना लिहले, “नवरोज मुबारक. हा खास दिवस तुम्हाला आनंद, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. येणारे वर्ष यशस्वी आणि प्रगतीशील ठरो, तसेच एकता आणि सद्भावना अधिक मजबूत होवो. आगामी वर्ष आनंदाने आणि समाधानाने भरले जावो, हीच शुभेच्छा.”
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी देखील सर्वांना नवरोजच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी ‘X’ वर लिहले, "नवरोज नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. हा सण निसर्गाच्या नव्या जन्माचा, नव्या आशेचा आणि वसंत ऋतूच्या आगमनाचा उत्सव आहे. आजच्या संघर्षांनी भरलेल्या जगात नवरोजचा संदेश खूप महत्वाचा आहे. या नवरोजनिमित्त सर्वांना शांतता, उत्तम आरोग्य आणि आनंद लाभो."
कझाकस्तानच्या राष्ट्रपतींच्या प्रेस कार्यालयाने देखील नवरोजच्या शुभेच्छा देत एक व्हीडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यांनी लिहले, “नवरोजच्या शुभेच्छा. हा वसंतोत्सव तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि शांतता घेवून येवो. तुमचे नवीन वर्ष नव्या सुरुवातींनी फुलून जावो.”
भारताचे नंदनवन असणाऱ्या जम्मू काश्मिरच्या पर्यटन विभागाने नवरोजच्या शुभेच्छा देणारा एक व्हीडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट केला आहे. हा व्हीडीओ पोस्ट करताना त्यांनी म्हटले, “जम्मू आणि काश्मीर कडून नवरोज मुबारक.”
भारतीय लष्कराचे चिनार कॉर्प्सने नवरोजच्या शुभेच्छा देताना म्हटले, "चिनार कॉर्प्स तर्फे सर्वांना नवरोजच्या शुभेच्छा. हा सण नवीन सुरुवात, आशा आणि समृद्धीचे प्रतीक आहे. नवरोजच्या शुभ दिवशी बंधुत्वाची भावना अधिक बळकट होवो, शांतता नांदो आणि सर्वांना प्रगतीची प्रेरणा मिळो.”
नवरोजपूर्वी घराची संपूर्ण स्वच्छता करतात. त्याला ‘खानेह टेकानी’ असे म्हणतात. याचा अर्थ संपूर्ण घराचे शुद्धीकरण करणे आहे. नवरोजमध्ये ‘हफ्त-सिन’ नावाचा एक खास टेबल तयार केला जातो. या टेबलावर सात वस्तू ठेवल्या जातात. यामध्ये पर्शियन भाषेतील 'स' (س) अक्षराने सुरू होतात. या प्रत्येक गोष्टीला वेगळे प्रतीकात्मक महत्त्व असते. या सणाच्या दिवशी कुटुंब आणि मित्र-परिवार एकत्र येतात, नवीन कपडे परिधान करतात आणि पारंपरिक पदार्थांची मेजवानी करतात. नवरोजचा सण १३ दिवस चालतो. या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ‘सिजदा बेदर’ दिवशी लोक आपले घर सोडून निसर्गाच्या सान्निध्यात जातात. हा दिवस सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी महत्त्वाचा मानला जातो.
पारसी नववर्षाचा उगम झरथुश्ट्र धर्माशी (Zoroastrianism) जोडलेला आहे. हा जगातील सर्वात प्राचीन एकेश्वरवादी धर्मांपैकी एक आहे. या सणाची सुरुवात इराणमध्ये झाली होती. हा सण गेल्या ३,००० वर्षांपासून साजरा केला जात आहे.
झरथुश्ट्र धर्मप्रवर्तक पैगंबर झरथुश्ट्र यांनी या सणाला प्रारंभ केला. झरथुश्ट्र धर्मीय लोक भारतात स्थलांतरित झाले आणि त्यांनी गुजरातमध्ये आपला धर्म आणि परंपरा जोपासली. त्यामुळे आज भारतात विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मोठ्या संख्येने पारसी समुदाय वास्तव्य करतो.