राजाराम पानगव्हाणे
आदिशक्ती महामायेचे पूजन, ध्यान हा भारतीय संस्कृतीचा पाया मानला जातो. देवीच्या विविध रुपांचे भारतीय लोक विधीवत पूजन करत आलेले आहेत. शक्ती-भक्तीचे अनोखे रुप म्हणजे आदिशक्ती होय. अगदी पुराणांचा दाखला द्यायचा झाल्यास सती अर्थात पार्वतीची देशभरात ५२ ठिकाणी शक्तीपीठ आहेत. महाराष्ट्रात पैकी साडेतीन शक्तीपीठे आहेत. अगदी पुरातन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत स्त्री रुपी शक्तीची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. या रुपांमधून समाजाला सतत प्रेरणा मिळत आलेली आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर त्याचा घेतलेला हा धांडोळा...
हिंदू संस्कृतीतील देवी देवतांमध्ये प्रामुख्याने स्त्री रुपी देवींचा वावर अधिक आढळतो. सरस्वती, लक्ष्मी, दुर्गा याचबरोबरच पवित्र अथवा देव देवतांच्या स्थानी मानत असलेली पृथ्वी, नद्या ही सगळी स्त्री रुपी आहेत, सदैव प्रेरणादायी आहे.
प्राचीनकाळी मानवाने निसर्गशक्तीला दैवत मानले. शेतीचा शोध हा मानवी जीवनातील सर्वांत क्रांतिकारक शोध. शेतीमुळे माणसाचे भटके जीवन स्थिर झाले. धरणीच्या ठिकाणी असलेल्या सुजलाम, सुफलाम गुणांची ओळख मानवाला झाली. तेव्हापासून मातृदेवतेच्या पूजेचे महत्त्व वाढू लागले. स्त्रीकडे बीजधारणेचा गुण असल्यामुळे तिलाही आदिशक्ती मानून तिच्या मूर्ती बनवून, मखरात बसवून तिची पूजा केली जाऊ लागली. कालांतराने पुरुषसत्ताक व्यवस्था वाढत गेली.
स्त्री मुळेच आपल्याकडील कुटुंबव्यवस्था टिकून आहे. भारतीय संस्कृतीमध्ये लोकपरंपरेला अत्यंत महत्त्व आहे. अनेक लोकपरंपरा व धार्मिक विधीमध्ये स्त्रीला आदर्श मानले गेले आहे. भारतातील विविधतेच्या मुळाशी असलेले सांस्कृतिक एकात्मतेचे तत्त्व, लोकपरंपरांतून चालत आलेल्या सांस्कृतिक, भूमीच्या सुफलीकरणाशी संबंधित विधि उत्सवांतून, तत्संबंधी गीतांतून नेहेमी प्रतीत होत आलेली आहे.
गेल्या हजारो वर्षांपासून भारतात अनेक टोळ्या आल्या. या टोळ्या या भूमीत स्थिरावल्या. संघर्ष, स्वीकार, समन्वय, समरसता या चार सकारात्मक प्रक्रियांतून सातत्याने नवस्वीकृतीची प्रक्रिया आपल्याकडे पूर्वापार सुरू आहे. यातूनच भारतीय संस्कृतीची अभिजातता आणि एकात्मता दृढ झाली आहे.
या संस्कृतीला एकात्म करणाऱ्या साहित्य, शिल्प, संगीत, नृत्य आदी परंपरांबरोबरच लोकपरंपरांनीही फार मोठे योगदान दिले आहे. भारतीय जनतेने अनंतकाळ प्रचलित राहणाऱ्या विधी, उत्सव, सण, कथा, कहाण्या, लोकगीते, लोकनृत्याचे पदन्यास आदींद्वारे भारतीय संस्कृतीच्या विकासाचा इतिहास नोंदवून ठेवला आहे.
व्रतवैकल्ये, विधी, उत्सव यांतच स्त्रियांचा सहभाग विशेष महत्त्वाचा असतो. स्त्रीची भूमिका पतीच्या हाताला हात लावून 'मम' म्हणण्यासाठी देखील महत्त्वाची आहे. सुफलीकरणाशी संबंधित विधिउत्सवांत मात्र स्त्रियांचा सहभाग प्रत्यक्ष आणि महत्त्वाचा असतो.
गुजरात-राजस्थानातील वा पंजाबातील हरियाली, तीज असो वा कर्नाटक महाराष्ट्रातील हरितालिका-भाद्रपद तृतीया असो. या व्रतांत स्त्रियांचाच सहभाग असतो. तृतीया, षष्ठी या दिवसांना स्त्रियांच्या व्रतांत विशेष महत्त्व असल्याचे लक्षात येते.
भूमीशी तिच्या सुफलतेशी निगडित सणांत पुरुषांचा फारसा सहभाग नसतो. असल्यास तो नाममात्र असतो. या उत्सवांमधील 'स्त्रीप्रधानते'चा मागोवा आणि शोध घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.
भारतात शक्तीची उपासना करणे ही काही नवी गोष्ट नाही. त्यामागे ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. संपूर्ण जगात केल्या जाणाऱ्या प्राचीन उपासनेत शक्तीच्या उपासनेला फार महत्त्व आहे. कदाचित आपल्या आयुष्यात असणाऱ्या स्त्रीच्या महत्वामुळे ही उपासना केली जात असावी.
भारतात सुद्धा जे उत्खनन झाले, त्यात ज्या मूर्ती सापडल्या त्यांचा काळ हा इसवी सन पूर्व २५०० इतका मागे नेता येतो. यावरून शक्तीपूजा ही संकल्पना किती जुनी आहे, हे आपल्याला लक्षात येते.
अर्थात यातील बऱ्याच मूर्ती या मातीच्या होत्या आणि निरनिराळ्या स्वरूपातील होत्या. प्राचीन काळात होत असणाऱ्या या शक्तीपूजेचा प्रभाव आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येतो. त्यात विविध प्रकारच्या नाण्यांवर स्त्री रुपी देवी आढळतात.
भारतात आढळलेल्या अनेक प्राचीन नाण्यांवर लक्ष्मीची रूपे दिसून येतात. त्यांना लक्ष्मी, गजलक्ष्मी अशा नावांनी ओळखले जायचे. बऱ्याच नाण्यांवर आपल्याला पार्वती स्वरूपातील देवी आढळून येते. चंद्राची मुलगी, देवांची अधिदेवी, तसेच स्वर्ग पृथ्वीला अलौकीक करणारी, तसेच युद्ध, शस्त्र, राजदंड आणि प्रेम यांची अधिष्ठात्री देवी देखील समजले जाते.
मित्र राजांच्या काही नाण्यांवर कमळावर उभी असलेली महालक्ष्मी दिसून येते. या सर्वांमध्ये ज्या शक्तीची मोठ्या प्रमाणावर आराधना केली जाते, ती म्हणजे लक्ष्मीदेवी. आज सर्वसामान्यपणे हिला आपण लक्ष्मी म्हणतो किंवा गजलक्ष्मी असा शब्दप्रयोग प्रचलित आहे. आज अनेक ठिकाणी जेव्हा आपण धार्मिक, पर्यटनस्थळी जातो, तेव्हा आपल्याला गजलक्ष्मी दिसून येते. दोन्ही बाजूला हत्ती आणि मधे देवीची प्रतिमा असे या देवीचे स्वरूप असते. हत्ती हे देवीला स्नान घालत आहेत.
येथे लक्ष्मीला पृथ्वीचे रूप तर हत्तींना मेघांचे रूप मानले जाते. कदाचित या पुराणातील संदर्भांमुळेच भारतीयांमध्ये लक्ष्मीला अत्यंत मानाचे स्थान आहे. जिथे जिथे लक्ष्मी निवास करते तिथे तिथे ऐश्वर्य आणि संपन्नता टिकून राहते, असे मानले गेले आहे.
लक्ष्मी म्हणजेच स्त्री रूपास आर्य आणि राक्षस दोघांमध्येही मानाचे स्थान दर्शविलेले आढळते. याचे उदाहरण म्हणजे रामायणात रावणाचे जे पुष्पक विमान होते. त्यावर गजलक्ष्मीचे चिन्ह होते. प्राचीन भारतात ज्या प्रकारच्या कला आढळतात, त्यात प्रामुख्याने लक्ष्मी म्हणजेच स्त्री रूपाचे महत्त्व ठिकठिकाणी अधोरेखित केलेले आहे.
याशिवाय भारतात अजून एक देवीचे रूप आढळून, येते ते म्हणजे वसुंधरा. बऱ्याच विद्वानांच्या मते वसुंधरा हे लक्ष्मीचेच रूप आहे. पुरातन काळापासून स्त्रियांचे महत्त्व वेळोवेळी ठळकपणे प्रत्येक कालखंडात जाणवत राहिले आहे.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारताच्या राष्ट्रीय चळवळीबरोबरच सामाजिक चळवळही सुरू झाली. समाजात प्रबोधनाची लाट उसळली. राजा राममोहन रॉय आणि महर्षी दयानंद यांनी समाजातील वाईट प्रथा नष्ट केल्या. महिलांकडे, त्यांना होणाऱ्या त्रासाकडे त्यांनी सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेतले. पुढे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सामाजिक क्रांती झाली. जनतेला स्त्रीचे महत्त्व कळू लागले, तिचे बंधन सैल होऊ लागले.
इतिहासात देखील अनेक कर्तृत्ववान स्त्रियांचा पोटी महापुरुष जन्मले. यात प्रामुख्याने राजमाता जिजाऊ, रमाबाई आंबेडकर ह्या होय. स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांचे योगदान स्त्रियांच्या विकासामध्ये सुवर्णाक्षरांनी नोंदविण्यासारखे आहे. स्त्री पुन्हा शिकू लागली. राष्ट्रीय चळवळीतही अनेक महिलांनी महत्त्वाचे कार्य केले. सरोजिनी नायडू आणि विजयालक्ष्मी पंडित यांच्यासारख्या मान्यवर महिलांनी पुढे जाऊन समाजाला प्रबोधनाची वाट दाखवली. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला, तेव्हापासून भारतात सर्वच क्षेत्रात विकास कामे सुरू झाली.
समाजातील दोष दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू झाले. स्त्रियांचेही प्रबोधन होऊ लागले. सर्वांत महत्त्वाची घटना अशी घडली, की भारतीय राज्यघटनेत महिलांना पुरुषांप्रमाणे समान अधिकार देण्यात आले. भारतातील महिला सक्षमीकरणाला मोठा इतिहास आहे. राजाराम मोहन रॉय, स्वामी विवेकानंद, आचार्य विनोबा भावे आणि ईश्वरचंद्र विद्यासागर इत्यादी थोर समाजसुधारकांनी सती आणि बालविवाह यांसारख्या घृणास्पद प्रथा बंद केल्या. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचीही स्त्री सक्षमीकरणांमध्ये दिलेले योगदान एकमेवाद्वितीय असे आहे.
- राजाराम पानगव्हाणे