महाराष्ट्राच्या जडणघडणीत संतांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. त्यामध्ये बहुतेक संत बहुजन समाजातून आलेले आहेत. महाराष्ट्राच्या अनेक शहरात खेड्यापाड्यात सूफी संतांचे दर्गे आहेत. दरवर्षी या दर्ग्यांच्या परिसरात मोठे उर्स किंवा उरूस भरवले जातात. तेथे सर्वच जाती-धर्माचे लोक श्रद्धेने डोकं टेकवतात. या उरुसला सर्वत्र यात्रेचे स्वरूप आल्याचे दिसते.
महाराष्ट्रातील अनेक संत आणि सुफी यांच्यात जिव्हाळ्याची, सांस्कृतिक आदानप्रदानाची मोठी परंपरा राहिली आहे. यात अनेक ठिकाणी गुरुशिष्याचे नातेही पाहायला मिळते. वारीमध्ये तर या संस्कृतिच्या खुणा पावलोपावली जाणवतात.
महाराष्ट्रात असेच एक वारकरी मुस्लीम संत होऊन गेले ज्यांच्या विचारांचा वारसा अमरावतीच्या एका हिंदूबहुल गावाने पुढे नेला आहे. धर्मानं मुस्लीम असलेले महंमद खान हे वारकरी संत म्हणून नावारूपास आले. ते मूळचे अमरावतीहून १८ किलोमीटरवर असलेल्या भातुकली तालुक्यातील गणोरी या गावचे.
गावात प्रवेश करताच भव्य प्रवेशद्वाराच्या समोरच महंमद खान महाराजांचे भव्य मंदिर दिसते. मंदिराच्या गाभाऱ्यात महाराजांची प्रसन्न मूर्ती आहे. मंदिराला खेटूनच दर्गाही आहे. मंदिरात प्रवेश करताच हिंदू-मुस्लिम असा भेद आपोआपच गळून पडतो. भाविक कोणत्याही धर्माचा असला तरीही मूर्तीसमोर नतमस्तक होतो.
डोमा नदीच्या तीरी वसलेल्या या गावात महंमद खान महाराज यांनी भारतीय संस्कृती आणि इस्लामचे सुफी तत्त्वज्ञान यांचा सुरेख मेळ साधून धार्मिक सामंजस्य आणि सामाजिक सलोखा कायम राखण्याचे कार्य केले. गावामध्ये महाराजांचा भक्तसंप्रदाय मोठ्या प्रमाणात असून हिंदू-मुस्लिम एकात्मतेचं प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
महंमद खान महाराज हे वारकरी संप्रदायाचे दैवत विठ्ठल रुक्मिणीचे निस्सीम भक्त. गावातील विठ्ठल मंदिरात आराधना करीत ते तासंतास एकटेच बसायचे. विठ्ठलभक्तीची ओढ असल्याने ते घोड्यावर बसून दरवर्षी पंढरपूरच्या वारीला जात असत. त्यामुळे त्यांच्या पश्चातही ही प्रथा अशीच कायम राहावी यासाठी संत महम्मद खान मठ संस्थान गणुरीची पालखी दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला जात असते.
महमंद खान महाराजांबद्दलची आख्यायिका
महमंद खान यांच्या खाजगी जीवनाबद्दल जास्त काही माहिती नसली तरी त्यांच्याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. असे म्हटले जाते की ते संत तुकाराम महाराज व शिवाजी महाराज यांच्या कालखंडात गणोरी येथे फकीर वेशात प्रकट झाले होते. ते दिवसभर दर्ग्यात राहून ध्यान करायचे आणि रात्री विठ्ठल मंदिरात राहायचे.
रात्री मंदिराचे पुजारी आरती केल्यानंतर घरी जायचे. त्यानंतर कुलूप न उघडता महंमद खान हे मंदिरात प्रवेश करायचे. विठ्ठल रूख्मिणीची पहाटेच पुजा करून दार न उघडता पुन्हा बाहेर यायचे. सकाळी ज्यावेळेस पुजारी मंदिरात जायचे त्यावेळेस त्यांना देवाची पुजा संपन्न झालेली असायची. तेथील पुजाऱ्याने सलग तीन दिवस घडलेला हा प्रकार पाहून मंदिराच्या अध्यक्षांना याबाबत माहिती दिली.
त्यानंतर अध्यक्षांनी रात्रीसाठी पहारेकरी ठेवले. तेव्हाही मंदिराच्या आत असलेल्या विहीरीवर पहाटे कोणी आंघोळ करत असल्याचा आवाज आला व त्यानंतर मंदिरात पुजा होत असल्याचे दिसत होते. परंतु पूजा कोण करतंय हे लक्षात येत नसल्याची गोष्ट पुन्हा अध्यक्षांच्या कानावर घालण्यात आली. त्यावेळी मध्यरात्री महाराजांनी मंदिराच्या अध्यक्षांना दृष्टांत दिला. तसेच ते विठ्ठलभक्त व वारकरी असल्याचे सांगितले. त्यानंतर, महाराजांच्या पुजेत अडथळा आणू नका ही बातमी अध्यक्षांनी गावकऱ्यांना दिली.
महाराज मंदिरात पूजा करताना त्यांचे नाव विचारले असता 'मुझे महंमद खान कहते है' असे त्यांनी म्हटले. त्यानंतर गावात हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद झाला. मात्र महाराजांनी काही दिवसातच तो वाद मिटवला. त्यामुळे त्यांना धर्मसमन्वय महर्षी ही पदवी देण्यात आली.
१८ वर्षांपासून पुन्हा सुरु झाली परंपरा
एस.टी. महामंडळातील सेवानिवृत्त चालक अनिल देशमुख यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून खंडित झालेली ही वारी २००६ पासून पुन्हा सुरू केली. संत महम्मद खान सेवा संस्था ट्रस्टची ही पायदळ पालखी व दिंडी दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला जात असते. सुरुवातीला ३-४ वारकऱ्यांच्या सहभागातून निघालेल्या या वारीत आता ३०० हून अधिक वारकरी सहभाग घेतात. गणुरी गावातून ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पंधरवड्यात निघालेली ही वारी तब्बल ३० दिवसानंतर पंढरपूरला पोहोचते.
महंमद खान महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह
भाद्रपद महिन्यात अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासून महंमद खान महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव सुरु होतो. या अखंड हरिनाम सप्ताहात दररोज महाप्रसाद असतो. या उत्सवात अनेक कामांची जबाबदारी परंपरेनुसार गावातील विविध कुटुंबांकडे पार पाडत असतात. धार्मिक सलोखा जपणाऱ्या महंमद खान महाराजांना गावकरी आजही ‘माऊली’च मानतात.
गेल्या अनेक शतकांपासून अनेक पिढ्यानपिढ्या मुस्लिम समाज महाराष्ट्राच्या भाषिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि वाङ्मयीन पर्यावरणात आपला सहभाग नोंदवत आहेत. तसेच संत परंपरेत देखील मुस्लीम संतांची मांदियाळी पाहायला मिळते. मुस्लीम संतांच्या रचना धार्मिक प्रबोधन आणि धार्मिक सलोखा निर्माण करणाऱ्या असतात. त्यामुळे याकडे धार्मिक एकात्मतेची शिकवण देणारे उदाहरण म्हणून पहिले जाते.
- भक्ती चाळक