वाळुजलगतच्या छोटे पंढरपूर येथील बैठकीत बोलताना पोलिस निरीक्षक अविनाश आघाव.
बकरी ईद मुस्लिमांच्या दोन प्रमुख सणांपैकी एक सण. तर आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा सण. दोन्ही धर्मियांसाठी महत्त्वाचे असणारे हे सण २९ जून रोजी म्हणजे एकाच दिवशी साजरे होणार आहेत. आषाढी एकादशीला हिंदू बांधव उपवास ठेवतात तर बकरी ईदला मुस्लीम जनावराची कुर्बानी देतात. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील काही ठिकाणी धार्मिक तणावाचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर हे दोन सण एकाच वेळी येत असल्यामुळे या दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये अशी सर्वांचीच इच्छा होती. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुस्लीम समुदायाने बकरी ईदची कुर्बानी आषाढी एकादशीच्या दिवशी न करता ती एक दिवस पुढे ढकलत असल्याचे जाहीर केले. मुस्लीम समुदायाचा हा निर्णय हिंदू मुस्लीम यांच्यातील सौहार्दपूर्ण सहजीवनाची परंपरा पुढे घेऊन जाणारा आहे.
छत्रपती संभाजीनगर : राज्यात धार्मिक सलोख्याला नख लावल्याच्या काही घटना अलीकडे घडल्या. परंतु, महाराष्ट्राची परंपरा ही सामाजिक सौहार्दाची आहे. याचेच आणखी एक उदाहरण वाळूजच्या छोट्या पंढरपुरात समोर आले. आषाढी एकादशी व बकरी ईदचा सण एकाच दिवशी आल्यामुळे वाळूजलगतच्या छोटे पंढरपूर येथील मुस्लिम समाजबांधवांनी यंदाही बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय बैठकीत जाहीर केला. मागील वर्षीपासून मुस्लिम समाजबांधवांनी सुरू केलेली परंपरा यंदाही सुरू ठेवल्याने परिसरातून निर्णयाचे स्वागत होत आहे. आता ईद सण व कुर्बानी कार्यक्रम सणाच्या दुसऱ्या दिवशी साजरा करण्यावर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
यंदाही आषाढी एकादशी तसेच मुस्लिम बांधवांचा बकरी ईद २९ जून रोजी म्हणजेच एकाच दिवशी येत आहे. छोट्या पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्त मोठी यात्रा भरते. विठुरायाच्या चरणी नतमस्तक ठेवण्यासाठी दरवर्षी लाखो वारकऱ्यांचा मेळा जमतो. या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार टाळण्यासाठी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी येथील मुस्लिम समाजबांधवांची बैठक घेतली. श्री. विठ्ठल-रुखुमाई मंदिरात सकाळी साडेअकराच्या सुमारास ही बैठक झाली. पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर उपस्थित मुस्लिम समाजासह हिंदू बांधवांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. तेव्हा दोन्ही सण एकत्र येत असल्याने कुठलाही अनुचित प्रकार किंवा घटना घडू नये, याची काळजी घेत मुस्लिम समाजबांधवांनी स्वखुशीने बकरी ईदच्या कुर्बानीचा कार्यक्रम व सण दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३० जून रोजी साजरा करण्याचा स्तुत्य निर्णय जाहीर केला. दोन्ही समाजातील एकोपा व सौहार्दाचे संबंध कायम राहावेत, यासाठी यंदाही हा निर्णय घेतल्याचे मुस्लिम समाजबांधवांनी यावेळी सांगितले.
श्री.विठ्ठल-रखुमाई विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पवार, माजी सरपंच अख्तर शेख, मेहबूब चौधरी, मुफ्ती अब्दुल अलीम, करीम अब्दुल रशीद, हाफिज मोईन, हाफिज मुश्ताक, मौलाना इकबाल, मौलाना शारूख, अमिरे जमात, सलीम पटेल, जावेद पटेल, मुख्तार शेख, इरफान वजीर मिर्जा, के. व्ही. गायकवाड, एकनाथ सोनवणे, एकनाथ कीर्तिकर, जावेद शेख, आमेर पठाण, रोशन शहा, साबेर शहा, पोलिस जमादार योगेश शेळके यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती. हा निर्णय जाती-धर्माच्या नावाखाली हिंसा भडकावणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. मुस्लिम समाजबांधव एवढ्यावरच थांबणार नसून त्यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी मटणाची दुकानेही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. नागरिकांनी धार्मिक सलोखा तसेच समाज बांधिलकी जपण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक आघाव यांनी केले.
वाळूजमध्येही निर्णय
वाळूज पोलिस ठाण्यात पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुस्लिम समाज बांधवांची बैठक गुरुवारी सायंकाळी घेतली. या बैठकीत आषाढी एकादशी व बकरी ईद सण साजरा करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. तेव्हा इमाम, मौलाना यांनी सामाजिक सलोखा जपण्याच्या दृष्टीने या दिवशी मुस्लिम बांधव कुर्बानी करणार नाहीत. त्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. बैठकीस विविध गावातील ५५ मौलाना व मशिदींचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना पंढरपूरचे माजी उपसरपंच अख्तर शेख आशावाद व्यक्त करत म्हणाले, "समाजात एकता रहाणे आवश्यक आहे. हिंदु मुस्लिम समाजाता भाईचारा एकता रहावी यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी असल्याने आम्ही सर्वसमंतीने बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामाजित सलोख्यासाठी हा निर्णय अतिशय फलदायी ठरेल."
तर इथले ग्रामस्थ दौलतखाण पठाण यांनी व्यक्त केलेल्या भावनाही महत्त्वाच्या होत्या. ते म्हणाले, "जन्माला येणारे मनुष्य सगळे एकच आहे, फक्त धर्म वेगळा आहे. तरीसुद्धा प्रत्येकाने एक दुसऱ्याच्या धर्माचा आदर केला पाहिजे. पांडुरंग हा सगळ्या समाजाचा आहे आणि आषाढी एकादशीच्या आनंद जेवढा हिंदूंना आहे, तेवढाच मुस्लिमांनासुद्धा आहे. म्हणूनच पंढरपूरला भरणाऱ्या आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिंदू मुस्लिम समाजामध्ये सलोख्याचे वातावरण रहावे, एकमेकांच्या सुखदुःखात सहभाग असावा. हाच या मागचा उद्देश आहे."
मुस्लीम समुदायाच्या या कौतुकास्पद निर्णयाचे हिंदू समजाकडूनही स्वागत केले जात आहे. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माई मंदिर समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार म्हणाले, "वाळूज परिसरातील छोटे पंढरपूर मराठवाड्यात नावाजलेले आहे. यावर्षी २९ तारखेला आषाढी एकादशी असल्यामुळे मोठी यात्रा भरणार आहे. एकादशीच्या दिवशीच बकरी ईद आहे. या यात्रेसाठी मुस्लिम बांधवांचे खूप सहकार्य होत आहे. यात्रेनिमित्त येणाऱ्या भावीकांचे मन दुखू नये, म्हणून मुस्लिम बांधवांनी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला आहे."
तर पंढरपूरचे माजी पंचायत समिती सदस्य गणेश नवले मुस्लीम समाजाचे आभार व्यक्त करत म्हणाले, "आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत. दोन्ही सणांना खूप मोठे महत्त्व आहे. एकादशीच्या दिवशी धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये, आपापसात भाईचारा व खेळीमेळीचे वातावरण रहावे. म्हणून मुस्लिम समाजाने कुर्बानी न देण्याचा घेतलेला निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे."
- शेखलाल शेख, संभाजीनगर