माहीमच्या दर्ग्यावरील रोषणाई (सोबत चादर अर्पण करण्यासाठी घेऊन जाताना मुंबई पोलीस)
भक्ती चाळक
मुंबईतील 'माहीमचा दर्गा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या मखदूम फकिह अली माहिमी या दर्ग्याच्या ६११व्या उरुसाला नुकतीच सुरुवात झाली आहे. दर्ग्याच्या या १० दिवसीय उरुसाची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. उरुसाच्या काळात माहीमच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठी जत्रा भरते आणि सगळीकडे उत्साह आणि आनंदाचे वातावरण असते. किनाऱ्यालगत लागणारे जायंट व्हील हे या उरुसाचे मुख्य आकर्षण असते. त्यासोबत या उरुसाचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या दर्ग्यावर उरुसाची पहिली चादर चढवण्याचा मान हा मुंबई पोलिसांचा असतो.
हा इतिहास सांगितला जातो…
माहीमचा हा उरूस ब्रिटीश काळापासून अधिकृत राजपत्रात नोंदलेला उत्सव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माहीम दर्ग्यामध्ये मुंबई पोलिसांना चादर चढवण्याचा पहिला मान आहे. या परंपरेबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. आज ज्या ठिकाणी माहीम पोलिस स्टेशन उभे आहे, त्याचठिकाणी पीर मखदुमशाह बाबा यांची बैठक होती असे सांगितले जाते. १९२३ मध्ये त्याठिकाणी माहीम पोलीस ठाणे स्थापन झाले होते. त्यामुळे माहीम पोलीस स्टेशनमधून दरवर्षी वाजत गाजत मुंबई पोलीस बाबांची चादर घेऊन संपूर्ण माहीमला फेरी मारतात. त्यानंतर पोलिसांच्याच हस्ते ही चादर चढवण्यात येत आहे. तसेच यावेळी मुंबई पोलिसांचे बँड पथकही सहभागी होऊन आपली खास सलामी देतात.
काही लोक असेही म्हणतात की, बाबा मकदूम शाह हे पोलिसांच्या खूप जवळचे होते आणि अनेकदा गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना मदत करत होते. तर असेही ऐकायला मिळते की, बाबांच्या शेवटच्या क्षणी एका पोलिसाने त्यांना पिण्यासाठी पाणी दिले होते. अनेकांचे असेही म्हणणे आहे की, मुंबईत दंगल झाली तेव्हा तत्कालीन पोलीस आयुक्तांनी येथे येऊन जातीय सलोख्याची प्रार्थना केली आणि काही तासांतच दंगल संपली होती. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दंतकथा ऐकायला मिळत असल्या तरी याठिकाणी भाविक सलोख्याच्या भावनेने दर्शन घेण्यासाठी येतात. यंदा १० ते २५ डिसेंबर या काळात हा उरूस उत्साहात साजरा होत आहे. या दहा १० दिवसांच्या काळात देशभरातून जवळपास ५०० मानाच्या चादर दर्ग्यात येत असतात. त्यासोबतच लाखो भाविक बाबांचे दर्शन घेण्सासाठी दर्ग्यात हजेरी लावतात.
माहीमच्या दर्ग्याचा इतिहास
पंधराव्या शतकात गुजरातचा सुलतान महमूद शाहच्या कारकिर्दीत माहीम दर्गा बांधला गेला असल्याचे सांगितले जाते. सुलतान महमूद शाहच्या काळात सुफी संत मखदूम फकिह अली माहिमी मुंबईत आले होते, त्यांनी त्याठिकाणी अनेक लक्षवेधी गोष्टी केल्याचे बोलले जाते. त्यापैकी एक म्हणजे माहीम समुद्रकिनाऱ्याच्या ओसाड जमिनीवर त्यांनी हिरवीगार बाग फुलवली होती. मखदूम फकिह अली माहिमी यांच्या या विलक्षण कृतीमुळे त्यांच्या सन्मानार्थ त्याठिकाणी एक वास्तू बांधण्यात आली, जी वास्तू पुढे जाऊन माहीम दर्गा म्हणून ओळखली जाऊ लागली.
कोण आहेत मखदुम फकीह अली माहिमी…
१३७२ ते १४३१ असा हजरत फकीह मखदूम अली माहिमी यांचा कार्यकाळ सांगितला जातो. ते मुळचे अरबस्तानाचे होते. पुढे इराक आणि कुवेतची सीमा ओलांडून ते कल्याणमार्गे माहीमला आले आणि इथेच स्थायिक झाले. मखदूम फकीह अली माहिमी यांचा बालपणापासूनच अध्यात्माकडे ओढा होता. त्यांनी सुफी विचारधारेचे शिक्षणही घेतले होते. इतकेच नव्हे तर ते भारतातील आद्य मुफस्सिर (कुराण भाष्यकार) पैकी एक असल्याचे सांगितले जाते. त्यांनी अरबी भाषेत अनेक धार्मिक पुस्तके लिहिली आहेत. त्यामुळे त्यांना 'कुतुब-ए-कोकन' (कोकणातील सर्वोच्च सुफी) देखील म्हटले जाते.
हिंदी चित्रपटांमध्ये माहीमची दर्गा
हजरत मखदूम फकीह अली माहिमी यांच्या दर्गा परिसरात बॉलीवूड चित्रपटांचे शुटींग झाले आहे. रोहित शेट्टी प्रदर्शित आणि अजय देवगण, करीना कपूर-खान यांनी अभिनय केलेल्या सिंघम २ या चित्रपटात माहिमचा दर्गा दाखवण्यात आला आहे. तसेच बॉलिवूडचे अनेक कलाकार श्रद्धेपोटी या दर्ग्याला वारंवार भेट देत असतात.
दर्ग्यावर राज्यघटनेची प्रस्तावना
माहीमच्या दर्ग्यात दर्शनी भागावर २०२० ला भारतीय राज्यघटनेची प्रस्थावना लावण्यात आली आहे. भारतात एखाद्या प्रार्थनास्थळावर भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना लावणारे माहीमचा दर्गा देशातील पहिलेच धार्मिक स्थळ ठरले आहे. राष्ट्रीय उत्सवांच्या काळात याठिकाणी पारंपरिक झेंड्याबरोबरच राष्ट्रध्वजही फडकावण्यात येतो. राष्ट्रगीताचे गायन करत राष्ट्रध्वजाला सलामीही दिली जाते.