गणेश भक्तांना शेकडो गणेशमूर्ती मोफत वाटणारे मुलाणी बंधू

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 6 d ago
 पोलीस अधिकाऱ्यांसोबत गणेश मूर्तींचे वाटप करताना शाहीद मुलाणी
पोलीस अधिकाऱ्यांसोबत गणेश मूर्तींचे वाटप करताना शाहीद मुलाणी

 

भक्ती चाळक 

समाजातील लोकांनी एकत्र यावे, त्यांच्यामध्ये विचारांचे आदान प्रदान व्हावे आणि त्यातून काहीतरी ठोस घडावे या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. परंतु या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप द्यायचे असेल समाजातील सर्व जातिधर्माचे लोक एकत्र यायला पाहिजे हे टिळकांनी हेरले होते. लोकांच्या मनात असलेल्या उत्सवप्रियतेचा उपयोग समाजाला एकवटण्यासाठी केला पाहिजे, हा त्यामागचा उद्देश होता. अगदी तेव्हापासून ते आजतागायत महाराष्ट्रातील गणेश उत्सवाने सामाजिक सौहार्दाचा हा वारसा जपला आहे. 

हा एकतेचा आणि धार्मिक सौहार्दाचा वारसा कृतिशीलतेने जपत आहेत सोलापुरातील नातेपुते येथील मुलाणी कुटुंबीय. आजच्या या विशेष लेखातून जाणून घेऊया सोलापुरातील या मुस्लीम कुटुंबाने गणेश उत्सवानिमित्त केलेल्या या स्तुत्य उपक्रमाविषयी…
 

सोलापुर जिल्ह्यातील नातेपुते शहरात वास्तव्यात असलेले शाहीद मुलाणी आणि त्यांचे बंधू सिकंदर मुलाणी, नौशाद मुलाणी तसेच सर्व कुटुंब समाजातील धार्मिक सौहार्द जपण्याचा प्रयत्न करत आहेत. शाहीद आणि त्यांचे कुटुंबीय हिंदू सणांमध्येही मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. सामाजिक कार्यासाठी त्यांनी रजा फाउंडेशनची स्थापना केली असून त्याद्वारे हे कुटुंबीय सामाजिक कार्य करतात.  संस्थेच्याच माध्यमातून हिंदू-मुस्लीम सौहार्द वृद्धिंगत. व्हावा यासाठी ते विविध उपक्रम राबवतात. 

शाहीद मुलाणी हॉटेल व्यवसायासाठी परिसरातील नावजलेले. नाव आहे. त्यांच्या ‘सागर’ या नावाने शहरात दोन हॉटेल्स आहेत आणि उत्तम जेवणासाठी ते परिसरात प्रसिद्ध आहेत. . या व्यवसायातून त्यांनी पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलाय. व्यवसायाच्या व्यस्ततेतूनही ते  समाजकार्यासाठी आवर्जून वेळ काढत असतात.  

ईदसोबतच दसरा-दिवाळी सारख्या सणांना करत असतात. दानधर्मावर त्यांचा विशेष भर असतो.  यंदा गणेशोत्सवानिमित्त  मुलाणी कुटुंबाने एक अनोखा उपक्रम राबवला ज्याचे सर्वत्र मोठे कौतुक होत आहे.  गणेशोत्सवानिमित्त मुलाणी कुटुंबांने हिंदू बांधवांना १०१ गणेश मूर्तींचे मोफत वाटप केले आहे. धार्मिक सद्भाव जपणाऱ्या त्यांच्या या उपक्रमाची त्यामुळेच महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. 

या उपक्रमाविषयी माहिती देताना शाहीद सांगतात, “सर्वधर्मसमभाव जपण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवतोय. धार्मिक सलोखा जपण्यासाठी आणि हिंदू बांधवांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी या गणेशोत्सवात आम्ही मोफत गणेश मूर्ती देण्याचे ठरवले. गणपती हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असल्याने आमच्या या छोट्याश्या उपक्रमामुळे समाजात. एकोपा वाढण्यास मदत होईल असं आम्हांला मनापासून वाटतं.”

पुढे ते सांगतात, “या उपक्रमाचे आमचे पहिलेच वर्ष आहे. याआधी २००९ पासून आम्ही मुस्लीम समाजाच्या वतीने विसर्जनाच्या दिवशी गणेश मंडळांच्या अध्यक्षांना प्रमाणपत्र आणि श्रीफळ  देऊन सन्मानित करतो.  कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवून  दोन्ही समाजात बंधुभाव सुद्धा टिकून ठेवण्याचा प्रयत्न आम्ही त्यातून केला. यावर्षी आम्ही राबवलेला  उपक्रम समाजातील प्रत्येक स्तरात राबवला गेला  पाहिजे एवढीच माझी भावना आहे.” 
 
या गणेश मूर्तींचे वाटप नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांच्या हस्ते झाले. यादरम्यान बोलताना ते म्हणतात, "हा उपक्रम सर्वधर्मसमभावाचे हे उत्तम उदाहरण आहे. शाहिद, सिकंदर आणि नौशाद या मुलाणी बंधूंनी मोफत गणेश मुर्ती देऊन हिंदू मुस्लिम एकात्मतेचे दर्शन घडवले आहे. अशाप्रकारे संपुर्ण भारतात हिंदु मुस्लिम एकतेचे दर्शन घडावे."
 

सध्या धर्माच्या नावाने जनमानस ढवळून निघत आहे. मात्र  खऱ्या अर्थाने धर्म म्हणजे काय. याची माहिती फार कमी जणांना असते. इस्लामने दिलेल्या सामाजिक सलोख्याच्या शिकवणी विषयी शाहीद सांगतात, “मुहम्मद पैगंबरांनी सामाजिक एकतेची आणि परस्परांचा आदर करण्याची शिकवण दिली. आम्ही त्याचेच अनुकरण करत आहोत. आमच्या आईवडिलांनी सुद्धा आमच्यावर हेच संस्कार केलेत. सर्वच धर्मांची शिकवण अशीच आहे.  त्यामुळेच आजही आमच्या कार्यक्रमांना गावातील सर्वधर्मीय लोकं येतात आणि आम्ही सुद्धा त्यांच्या कार्यक्रमांना जात असतो.”

शाहीद यांच्याकडून गणेश मूर्ती घेऊन स्थापना करणारे नितिन धायगुडे म्हणतात, “आम्ही मूर्ती खरेदीसाठी जात असताना रस्त्यावर आम्हाला एक स्टॉल दिसला, जिथे एक कुटुंब गणेश मूर्तींचे वाटप करत होते. तिथे जाणून पाहिल्यावर मी जरा चकित झालो कारण चक्क मुस्लीम कुटुंब हिंदूंसाठी गणेश मूर्तींचे वाटप करत होते. माझ्या माहितीनुसार मुस्लीम समाजात मूर्तीपूजा करत नाहीत, तरी सुद्धा हे कुटुंब केवळ हिंदूंच्या भावना जपण्यासाठी हे काम करतंय. हे पाहून मला खूप आनंद झाला आणि मी त्यांच्याकडूनच मूर्ती घ्यायचे ठरवले. धर्माधर्मात वाद निर्माण करणाऱ्या समाजकंटकांसाठी हा उपक्रम म्हणजे मोठी चपकार आहे.”

शाहीद यांचा कौतुकास्पद उपक्रमातून खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीचे दर्शन घडते. आपला इतिहास म्हणजे केवळ लढाया, जाती-धर्म, त्यांच्या प्रार्थनास्थळांचा इतिहास नव्हे. तर या देशातील  हजारो वर्षांच्या सहजीवनाचा,  सलोख्याच्या आणि माणसाचे माणूसपण अधिक उंचावणाऱ्या घटनांचा इतिहास आहे. त्यामुळे शाहीद मुलाणी यांच्यासारख्या मंडळींचा उपक्रम देशातील धार्मिक सौहार्दाची वीण घट्ट करणारी आणि आपल्या उज्ज्वल इतिहासाशी नाळ जोडणारी कृती आहे.   
 
भक्ती चाळक
([email protected])

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter