अशी आहे कोल्हापूरमधील मोहरमच्या पंजांची परंपरा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 Months ago
कोल्हापूरमध्ये बसवण्यात आलेले पंजे
कोल्हापूरमध्ये बसवण्यात आलेले पंजे

 

हिजरी या इस्लामी कालगणनेनुसार नुकतेच मुस्लीमांचे नवे वर्ष (हिजरी सन  १४४६) सण सुरु झाले आहे. मोहरम हा त्यातील पहिला महिना. जगभरातील मुस्लिमांच्या दृष्टीने या महिन्याला विशेष महत्त्व आहे. विशेषतः त्यातले पहिले दहा दिवस करबलाच्या ऐतिहासिक घटनेमुळे विशेष महत्त्वाचे मानले जातात. मुहम्मद पैगंबरांचे लहान नातू हजरत इमाम हुसैन यांना त्यांच्या कुटुंबियांसह याच दिवशी इराकमधील करबला या शहरात झालेल्या लढाईत शहीद करण्यात आले. त्यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ मोहरमच्या दहाव्या दिवसापर्यंत म्हणजे 'आशुरा'पर्यंत मुस्लीम दुखवटा पाळतात. त्याला 'मातम'असे म्हटले जाते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोहरमचा सण पाळला जातो. ताजीये, पंजे बसतात, मिरवणुका निघतात. यात हिंदूंचा लक्षणीय सहभाग असतो. प्रत्येक शहराची मोहरमची स्वतःची अशी वेगळी ओळख आहे. यातून मराठी संस्कृती आणि मोहरम यांचे विशेष नाते तयार झाले. हिंदू-मुस्लीम सौहार्दाची मोठी परंपरा असणाऱ्या कोल्हापूरची मोहरमची विशेष परंपरा आहे. त्याविषयीचा हा ग्राउंड रिपोर्ट 

कोल्हापूरमध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे गल्लीतच काय; पण आसपासच्या चार गल्लीत कोणी मुसलमान रहात नाही. तरीही गल्लीतल्या तालमीत पंजा बसलेला. त्याचे धार्मिक विधी अगदी कडक; पण ते विधी पूर्ण खबरदारी घेऊन सांभाळले जाणारे. हे सारे श्रद्धेने करणारे सर्वजण बहुजन समाजातले. कोणताही भेदभाव नाही, धर्माची भिंत तर कधीच पुसून गेलेली. अशा एका वेगळ्या बांधिलकीतून कोल्हापुरात मोहरम साजरा करण्याची परंपरा आहे आणि बदलत्या काळातही थोडेफार बदल स्वीकारत ती जपली गेली आहे.

कोल्हापुरातील बहुतेक तालमीत जसा गणेशोत्सव तसा मोहरम ठरूनच गेलेला आहे. कोल्हापुरात आजही संमिश्र वस्ती आहे. काही विशिष्ट भागात विशिष्ट धर्माचे रहिवाशी जादा संख्येने असले तरी आसपासचा संमिश्र वावर एवढा निकटचा आहे की एकोप्याचे वातावरण आहे. किंबहुना हा एकोपाच कोल्हापूरची खरी ओळख आहे. 
 

या एकोप्याचे एक प्रतीक म्हणजे मोहरम. कोल्हापुरात बाबूजमाल, घुडणपीर, बाराईमाम, काळाईमाम, वाळव्याची स्वारी, आप्पा शेवाळे, सरदार तालीम, अवचीत पीर, जुना बुधवार, नंगीवली तालीम, भुई गल्ली, नारायण मोढे तालीम, असे मोठे पंजे आहेत. तत्कालीन परिस्थितीत तालीम संस्था म्हणजे आदर आणि जरब असणारे ठिकाण होते. अनेक सामाजिक, राजकीय चळवळीचे केंद्र तालीमच होते. त्यामुळेच सर्वधर्मसमभाव राखण्याचा संदेश तालमीतून दिला गेला. वर वर मुस्लिम भाविक मोठ्या संख्येने असलेला मोहरम हिंदू बांधवांनीच श्रद्धेने उचलून धरला व तो कोल्हापूरच्या धार्मिक एकोप्याचे प्रतीक ठरला.

कोल्हापुरातल्या बहुतेक सर्व तालमीत पंजाची विधीपूर्वक प्रतिष्ठापना केली जाते. पंजे भेटीच्या कार्यक्रमाला तर गणेश उत्सव सोहळ्यासारखे लखलखाटाचे स्वरूप येते. येथे प्रतिष्ठापना केले जाणारे काही पंजे पन्हाळा, औरवाड, गौरवाड, वाळवा, शिरोळ या भागात त्यांच्या मूळ स्थानी भेटीला नेले जातात. बाबूजमाल, घुडणपीर व बाराईमाम दर्ग्यातील पंजांना या मोहरमच्या काळात विशेष महत्त्व आहे. खत्तल रात्र म्हणून पाळल्या जाणाऱ्या रात्री शहरातले बहुसंख्य पंजे या तीन ठिकाणी भेटीस येतात. तेथे भेटीचा सोहळा होतो. 

बिंदू चौकातील हजरत पीर मलिकरेहान मिरासाहेब पंजा शुक्रवारी (१२ जुलै) सायंकाळी सहा वाजता बागवान गल्ली येथून भेटीसाठी बाहेर पडले. शिवाजी पेठेतील खंडोबा तालमीचे हुसेन व जमालसाहेब पंजे तब्बल २३ वर्षांनंतर रविवारी (१४ जुलै) भेटीसाठी बाहेर पडले. याचवेळी नंगीवली तालीम मंडळाचा हजरत पीर नंगीवलीसाहेब पंजा तब्बल पंधरा वर्षांनी भेटीसाठी बाहेर पडला. बाबूजमाल दर्ग्यातील नाल्याहैदर पंजाही त्याच दिवशी पारंपरिक मशालीच्या उजेडात बाहेर पडला.  

पंजाभेटीला झाली सुरुवात
हिंदू- मुस्‍लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरम पर्वातील पंजेभेटीच्या सोहळ्याला आता प्रारंभ झाला आहे. सलग पाच दिवस हे सोहळे सजणार असून पारंपरिक वाद्यांवरच भर दिला जात आहे. दरम्यान, बिंदू चौक, बागवान गल्ली येथील हजरत पीर मलिकरेहान मिरासाहेब सरकार पंजा इतर पंजांच्या भेटीसाठी सवाद्य मिरवणुकीने बाहेर पडले.
 
या सोहळ्यात परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. शहर आणि परिसरातील विविध तालीम संस्थांसह मोहरम उत्सव मंडळांतर्फे ठिकठिकाणी दीडशेहून अधिक पंजांची प्रतिष्ठापना झाली आहे. १२ जुलैपासून पंजेभेटीला प्रारंभ झाला असून, काही पंजे शहरातील तर काही पंजे महाराष्ट्रासह कर्नाटकातील विविध ठिकाणी भेटीसाठी बाहेर पडणार आहेत. शहरातील बहुतांश पंजे रविवारीपासून  मोठ्या संख्येने बाहेर पडले. 

गल्लोगल्ली दरवळू लागला ऊद-धुपाचा सुगंध 
या सोहळ्यांना खऱ्या अर्थाने रविवार (१४ जुलै) पासून उधाण आले. पारंपारिक वाद्यांच्या गजरात पंजे भेटीसाठी बाहेर पडले. काही पंजे दहा ते पंचवीस वर्षांपूर्वी भेटीसाठी बाहेर पडले होते. यंदा ते पुन्हा सवाद्य मिरवणुकीसाठी भेटीसाठी निघाले. दरम्यान, ऊद आणि धुपाच्या सुगंधाने शहरातील गल्लोगल्ली भक्तिमय माहोल झाला होता.

कारुण्याची झालर
मंगळवारी (१६ जुलै) कत्तलरात्र असून, 'खाई फोडण्याचा' विधी झाल्यानंतर या साऱ्या माहोलाला कारुण्याची झालर लाभणार आहे. बुधवारी (१७ जुलै) पारंपरिक पध्दतीने पंजे विसर्जन होणार आहेत. 
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter