कोल्हापूरच्या तालमीत का बसवले जातात मोहरमचे पंजे...

Story by  Mateen Shaikh | Published by  sameer shaikh • 1 Years ago
गंगावेस तालमीत बसवण्यात आलेल्या पंजांसोबत कुस्तीपटू
गंगावेस तालमीत बसवण्यात आलेल्या पंजांसोबत कुस्तीपटू

 

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोहरमचा सण पाळला जातो. ताजीये, पंजे बसतात, मिरवणुका निघतात. यात हिंदूंचा लक्षणीय सहभाग असतो. यातून मराठी संस्कृती आणि मोहरम यांचे विशेष नाते तयार झाले. मल्लांची भुमि असणाऱ्या कोल्हापूरातला मोहरमही विशेष असतो. तिथल्या मोहरमच्या एका परंपरेची माहिती सांगणारा हा विशेष लेख. 
 
समता, बंधुभाव, एकोपा अशी परंपरा संस्थान काळापासून करवीर नगरीला लाभली आहे. मोहरम व गणेशोत्सव हे सण एकत्रित साजरा करण्याची वेगळी परंपरा या शाहूनगरीत रुजली. त्यामुळे कोल्हापुरातील सामाजिक वातावरण कायमच हिंदू-मुस्लिम सलोख्याचे राहिले आहे. त्याची उदाहरणे आपल्याला जागोजागी दिसतात. शहरातील शाहू विजयी गंगावेस तालमीत मोहरम व गणेशोत्सव एकत्रित साजरी करण्याची परंपरा जवळपास शंभर वर्षापासून अखंडित सुरू असलेली परंपरा हे त्याचेच एक उदाहरण. 

गंगावेस तालीमीने महाराष्ट्राला अनेक चांगले मल्ल दिले. मल्लविद्येची परंपरा पुढे चालवताना या तालीम मंडळाने गणेशोत्सवा बरोबर मोहरम वेळी पंजाची प्रतिष्ठापना करतात सलोख्याचे बंध जपते आहेत, मोहरम हा संप मुस्लिम कैलेंडर प्रमाणे गणेशोत्सवाच्या सोबतीने जरी नाही आला तरी देखील, या तालमीत पंजे कायम बसवले जातात. 

राजर्षी शाहू महाराजांनी नारायण जाधव यांना येथे मर्दानी खेळाच्या सरावासाठी ही जागा देऊ केली होती. नंतर काही दिवसात पीर सई साहेब यांच्या स्थानाची प्रतिष्ठापना येथे झाली. या ठिकाणी कुस्ती आखाडा ही सुरु व्हावा अशी इच्छा शाहू महाराजांची होती. जी पुढे राजाराम महाराजांनी या ठिकाणी आखाडा बांधत पुरी केली. सध्या आखाड्याच्या बाजूलाच पीर सई साहेबांचे स्थान आहे. पैलवानांचे आराध्य देवत हनुमानाबरोबर पीर साहेबांची पूजा-अर्चा या ठिकाणी कायम चालत आली आहे.
 
जाधव व नाईक घराण्यांचे मोहर्रमचे पंजे येथे आहेत. मोहरम काळात विविध मानकऱ्यांना येथे सेवेचा मान मिळतो. चौर्याचे मानकरी जाधव दरवार, दिवट्या चे मानकरी सूर्यवंशी तर द्वारा चे मानकरी पठाण बंधू हे आहेत. यंदा सेवेचा मान असणारे संदीप जाधव म्हणतात, 'तालमीमध्ये पंजा तालमीचे सर्व कार्यकर्ते, मानकरी तसेच मल्ल एकत्र येत दरवर्षी पंजाची प्रतिष्ठापना करतो. सर्व जाती धर्मातीत लोक यात सहभागी होतात.

श्रीगणेशाची आरती तसेच पण उद धूप वाहण्याचा कार्यक्रम एकत्रित होत असतो. शहरातील पीर भक्त येथे दर्शनासाठी हजेरी लावतात. शाहू संस्थांकडून या पंजास सोनेरी जरीचे वस्त्र भेट मिळाले आहे पण त्याची स्थापना करणे, पूजा करणे, तसेच भक्तांकडून आलेली तोरणे बांधण्याचे काम मुजावर बंधू करत आलेली आहेत. या उत्सावात अठरापगड जातीची मंडळी सहभागी होतात.

पंजा मिरवणुकीत मल्लांचा सहभाग
गंगावेस तालमीत कोल्हापूर सह सोलापूर, अहमदनगर सातारा तसेच इतर जिल्ह्यातील सर्व जातीधर्मातील मल्ल कुस्तीच्या सरावासाठी असतात. हे मल्ल मोहरम आणि गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात उत्साहात सहभागी होतात. सर्व मल्ल व भक्त फेटे बांधून पारंपारिक वाद्याच्या तालावर पंजा मिरवणुकीत सहभागी असतात. पंजाची स्वारी नंतर पंचगंगा नदीकडे विसर्जनासाठी जाते. गंगावेस तालीम मंडळाकडून हिंदू-मुस्लिम ऐक्याची प्रतीक असणारा हा उत्सव अखंडीत सुरु आहे..

मोहरममधून स्वातंत्र्य सैनिकांना मदत
इंग्रज राजवटीत विविध स्वातंत्र्यसैनिक इंग्रजांना चकवा देत या तालमीत वास्तव्याला असायचे. यावेळी येथील वस्ताद अण्णाप्पा पडळकर हे पंजाच्या मानकऱ्यांकडून शिधा गोळा करून स्वातंत्र्यसैनिकांच्या जेवणाची सोय करते. तसेच गल्लीतून धान्य मदत गोळा करून सर्व समाजासाठी मोहरम मध्ये मोठे जेवण ठेवत असत.

रांगड्या कोल्हापूरच्या या जिव्हाळ्याच्या संस्कृतीविषयी कुस्तीसम्राट अस्लम काझी म्हणतात, 'तालमीत एकत्रित साजरा होणारा गणेशोत्सव व मोहरम हा आमच्यासाठी आनंदोत्सवच असायचा. जाती-धर्माच्या पलीकडे एकतेचे संदेश हे सण देतात, तालमीने कायम ही परंपरा जपली आहे.’

- मतीन शेख, कोल्हापूर