महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोहरमचा सण पाळला जातो. ताजीये, पंजे बसतात, मिरवणुका निघतात. यात हिंदूंचा लक्षणीय सहभाग असतो. प्रत्येक शहराची मोहरमची स्वतःची अशी वेगळी ओळख आहे. यातून मराठी संस्कृती आणि मोहरम यांचे विशेष नाते तयार झाले. सांगलीमधील कडेगाव येथील मोहरमची ताबूत यात्रा भारतभर प्रसिद्ध आहे. कडेगावमधील या परंपरेचा इतिहास सांगणारा हा विशेष लेख...
हिंदु-मुस्लीम ऐक्याचे माहेरघर अशी सार्थ बिरुदावली धारण करणारं 'कडेगाव' सांगली जिल्ह्यातलं. गेल्या शंभर वर्षाच्या परंपरेतून साकार झालेला सर्व धर्मसमभाव आज या छोटयाशा गावी ऐक्याच्या कोंदणात बसलेला आहे. राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव जणू परापरात मुरली आहे.
मोहरमचा उत्सव मुस्लीमांचा. गणपतीप्रमाणेच मोहरमही अनेकदा धार्मिक तणावाला कारणीभूत झाले आहेत. पण आपल्या गावच्या मोहरमच्या उत्सवात हिंदूही यावेत आणि दोन्ही जमातींनी हा उत्सव साजरा करावा, गावातील दुहोला मूठमाती द्यावी, असा विचार कडेगावचे इनामदार भाऊसाहेब देशपांडे यांनी लोकांच्या गळी उतरवला. हे भाऊसाहेब देशपांडे म्हणजे औंध संस्थानिकांचे जावई. मुळातच इनामदार आणि त्यात संस्थानचे जावई. त्यामुळे भाऊसाहेब देशपांडे म्हणजे स्वाभाविकपणेच एक बडे प्रस्थ. भाऊसाहेबांनी सांगावे आणि लोकांनी ऐकावे असा तो काळ. पण 'पण राजा बोले दल हाले' अशी केवळ यांत्रिक सवय त्यामागे नव्हती. देशपांडे भाऊसाहेबांविषयी गावकऱ्यांना प्रेमही तितकेच वाटत होते. गावकरी उत्स्फूर्तपणे या कल्पनेच्या मागे उभे राहिले.
भाऊसाहेब देशपांडे यांनी नवस केला, तोही पीरालाच. 'मला मुलगा होऊ दे मी ताबूत करीन' तेव्हापासून ते ताबूत करू लागले. असे सांगितले जाते की, एकदा ते सातारा जिल्ह्यातील कऱ्हाडला आले. कऱ्हाडलाही अनेक ताबूत निघत असत. पण त्यावेळी कऱ्हाडकरांनी इनामदारांना योग्य तो मान दिला नाही. हा राग भाऊसाहेबांनी मनात धरला आणि कडेगावला जाऊन कऱ्हाडपेक्षा उंच ताबूत करण्याची प्रतिज्ञा केली! नुसती केली नाही तर लगेच साकारही केली. ११०, ११५, १२० फुटी उंच ताबूत कडेगावचे भूषण ठरले.
एकटयानेच ताबूत करून भाऊसाहेब देशपांडे थांबले नाहीत. स्वतः बरोबर इतर हिंदूंनाही ताबूत करण्याचा आग्रह धरू लागले. शंभर वर्षापूर्वीच्या काळातील हिंदूंनी भाऊसाहेबांचे म्हणणे मानले. आणि कडे- गावात हिंदूंचे ताबूत सुरू झाले ! भारतात कोठेही न आढळणारे हिंदूंचे ताबूत त्यावेळेपासून आजतागायत कडेगावात दिसतात. एका अर्थाने ही ताबूतांची जत्राच. गगनचुंबी ताबूत हे कडेगावचे वैशिष्टय हे ताबूत उचलण्याचा मान सर्वप्रथम हिंदूंनाच! हेही एक वैशिष्ट्यच. हिंदूंना ताबूत उचलण्याचा पहिला मान असलेले कडेगाव हे उभ्या भारतातील बहुधा एकमेव गाव असावे.
गावच्या परिसरातील बारा बलुतेदारांना सामील करून घेण्यात त्यावेळच्या स्थानिक नेतृत्वाने दाखविलेला उदारपणा आजच्या काळाच्या संदर्भात लक्षणीय ठरला आहे. देशपांडे, सुतार, वाणी हे हिंदूंचे तर पटेल, पिरजादे, कळवा, सातभाई हे मुस्लीमांचे असे तेरा ताबूत कडेगावच्या मोहरममध्ये निघतात. त्यापैकी पाच मोठे व इतर लहान, पाटील, कळ- वात आणि सातभाईंचे ताबूत मानाचे मानले जातात. सातभाईचा ताबूत नवसाला पावतो अशी अनेक भाविकांची श्रद्धा आहे.
या ताबूतांची बांधणी करण्यासाठी होणारी धांदलसुद्धाही वाचण्यासारखी असते. बकरी ईद झाल्यानंतर मोहरमच्या 'जत्रे'ची तयारी सुरू होते. प्रतिपदेचा चंद्र पाहून कुदळ मारली की, ताबूतांची बांधणी सुरू होते. तुकाराम महाराजांनी 'आधी कळस मग पाया' म्हटले आहे. ताबूतांची उभारणी म्हणजे तुकारामांच्या या अभंगाचा प्रत्यक्ष प्रत्यय. प्रथम ताबूतांचा कळस बनविला जातो. त्यानंतर अष्टकोनी आकाराचे बांबू कामांचे मजले (ज्याला इकडे कांडकी म्हणतात) तयार केले जातात. या कांडक्यांना रंगीबेरंगी कागद, हंडया, नारळ, नोटा, कला- बूत, फोटो लावून ते सुशोभित केले जातात. ताबूतांच्या बांधणीसाठी हिंदु-मुस्लीम खांद्याला खांदा लावून काम करीत असतात. सगळे मजले तयार झाले की कळसाच्या खाली एक मजला. त्यानंतर खाली एक मजला, त्याखाली एक असे सर्व मजले रचले जातात!
ताबूतांच्या बांधणीचे वैशिष्टय असे की, याला कुठेही गाठ मारली जात नाही! ताबूत बांधीत असताना चिकणमातीने दोरा आवळला जातो. पण ही बांधणीही एवढी भक्कम असते की, मोठा पाऊस येऊन बांधणी भिजली तरच सुटण्याची शक्यता असते! एकाखाली एक मजला रचून ताबूताची उभारणी पूर्ण झाली की, तो ताबूत एका पलंगडीवर ठेवला जातो. त्या पलंगडीत वाघ, सिंह, हरीग यांच्या प्रतिकृती ठेवल्या जातात. एवढे सारे झाले की, मिरवणुकीसाठी ताबूत सिद्ध होतो.
उत्कृष्ट आणि बहारदार गाणी, भजने, सोंगे है या जत्रेचे आणखी एक वैशिष्टय. कडेगावात वार पेठ मेल मंडळ, बुधवार पेठ मेल मंडळ अशी मंडळे परंपरेनुसार अस्तित्वात आहेत. या मंडळाचे लोक मशिदीत जाऊन रंगून फकिराची सोंगे घेतात आणि गावातून मिरवणुकीने फिरतात. पहिला दिवस या अशा फकिरांचा असतो, दुसऱ्या दिवशी भाटाचे सोंग असते. शुक्रवार पेठ मेल मंडळाचे लोक उदेपूरच्या राजघराण्याचे भार बनतात, तर बुधवार पेठ मेल मंडळाचे लोक हस्तीनापूरच्या राजघराण्याचे भाट बनतात. हे भाट रानभर गावातून फिरत आपापली गाणी म्हणतात. रात्री दहानंतर दोन्ही राज- घराण्यातील भाटांचा समोरासमोर सामना होतो.
नानकशाच्या सोंगाचा तिसरा दिवस :-
हरदम कौसलवान
हुसेन का मातम
करे दिनरात...
हे गीत टिपयांच्या तालावर म्हणत नानकशाची सोंगे गावभर फिर- तात. त्यांचाही सामना होतो. चौथ्या दिवशी जोगीचे सोंग असते. यावेळी दोन्ही मंडळातील लोक जोगीचे वेष करून गाणी म्हणत येतात. ही गाणी शास्त्रीय संगीतावर आधारित असतात. हा कार्यक्रम सूर्योदयापर्यंत चालतो. पाचव्या दिवशी गोरखचे सोंग निघते. यावेळी हातात कोका हे तंतुवाद्य घेऊन, नाथपंथी गोसाव्यांचा वेष करून, दोन्ही मंडळे रंगून गावात फिरतात. रात्री भैरवनाथ मंदिरासमोर त्यांचा सामना होतो. आध्यात्मिक सवाल-जवाबांनी रात्र रंगते.
या साऱ्या उत्सवातील गाण्यात-
प्यारा प्यारा देश हमारा
अब एकीका करो पुकारा
अशी राष्ट्रीय गीतेही म्हटली जातात. ताबूत येत म्हटली जाणारी गाणी पूर्वीच्या प्रतिभावंत कवींनी रचली. ती गाण्याची परंपरा शंभर वर्षे तशीच टिकून आहे.
मोहरमच्या सणातील कत्तलची रात! ही एक महत्वाची रात्र. कत्तलच्या रात्री, गोरखचे सोंग आणि ताबुतांची पूर्ण होते.सकाळी सर्व ताबूत भेटीसाठी भैरवनाथ मंदिरासमोर आणले जातात. ताबूतांच्या गळाभेटी हा या जत्रेतील उत्कृष्ट क्षण असतो. चारपाचशे माणसे एकेक ताबूत उचलतात. एवढे त्यांचे वजन असते. मानाच्या ताबूतांसह सर्व ताबूत नाथ मंदिरासमोर आले की, त्यांची गळाभेट होते. लोक आनंद कल्लोळ करतात. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई, बंगलोर, सोलापूर अशा दूरदूरच्या ठिकाणाहून आठ ते दहा हजार लोक गळाभेटीसाठी आलेले असतात..
या गळाभेटीनंतर कडेगावात मोठी यात्रा भरते. गॅरवीच्या दिवशी (म्हणजे अकराव्या दिवशी) ताबूतांची कांडकी म्हणजे मजले उतरवले जातात. दोन्ही मंडळांना ग्रामस्थांकन मिळालेली बक्षिशी (फकिरी) एकत्र करून प्रीतिभोजनाचा कार्यक्रम होतो आणि या जत्रेची सांगता होते.
मोहरमच्या उत्सवाचा मान जसा हिंदूंना तसा हिंदूंच्या दसरा आणि गणोशोत्सवाचा मान कडेगावात मुस्लीम समाजाला दिला जातो मुस्लीमांच्या उत्सवात हिंदू जसे सहभागी होतात तसे हिंदुच्याही उत्सवात येथे मुस्लीम आनंदाने सहभागी होतात. पिढयापिढचा गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या या दोन्ही जमातीत गेल्या शंभर वर्षात एकदाही साधा ओरखडा निघालेला नाही! देशात हिंदू मुस्लीम तणाव निर्माण झाला तरी कडेगावची एकी अभंग राहिली आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा हा आदर्श उभ्या भारतात अनुकरणीय ठरावा!!
- मोहन कुलकर्णी
('महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती'च्या 'सण उत्सव' पुस्तकातून साभार)