सप्तशृंगी गडाच्या चैत्रोत्सवात हिंदू-मुस्लिम एकतेचा अनोखा मेळ

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
सप्तशृंगी गडाच्या चैत्रोत्सवातील हिंदू-मुस्लिम सौहार्दाचा क्षण
सप्तशृंगी गडाच्या चैत्रोत्सवातील हिंदू-मुस्लिम सौहार्दाचा क्षण

 

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात वसलेले मालेगाव हे मुस्लिमबहुल शहर. याठिकाणी हिंदूंची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. गिरणा आणि मोसम नद्यांच्या काठावर बहरलेले हे शहर म्हणजे धार्मिक एकतेच्या परंपरेचा अनोखा संगम. या शहराने गेल्या अनेक शतकांपासून सांस्कृतिक आणि धार्मिक संमिश्रणाची पायाभरणी केली आहे. कठीण काळातही आपली एकतेची परंपरा कायम राखल्याचा इतिहास इथे पाहायला मिळतो. येथील सामाजिक जीवनात हिंदू आणि मुस्लिम समुदायांनी एकमेकांच्या सण-उत्सवांत सहभाग घेत, परस्पर सौहार्द आणि बंधुभाव जपला आहे. 

मालेगावातील सणोत्सव म्हणजे गंगा-जमुनी तहजीबचे प्रतीक. नुकताच नाशिकच्या सप्तशृंगी गडावर देवीचा चैत्रोत्सव सुरू झाला. यानिमित्ताने खानदेशमधील लाखो भाविक पायी यात्रेने गडाकडे चालले आहेत. मालेगाव मार्गे सप्तशृंग गडाकडे जाणाऱ्या श्रद्धाळूंच्या सेवेसाठी मालेगावकर सज्ज झाले आहेत. चाळीसगाव चौफुली ते दाभाडी या बारा किलोमीटरच्या रस्त्यावर अनेक दानशूर व स्वयंसेवी संघटनांकडून ठिकठिकाणी यात्रेकरूंच्या सेवेसाठी स्टॉल उभारले गेलेत. यातील एका स्टॉलने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रणरणत्या उन्हात तापलेल्या रस्त्यावरुन गडाकडे जाणाऱ्या भाविकांसाठी मुस्लिम तरुणांनी पाण्याचा स्टॉल लावला. 

मालेगाव परिसरातील पारा सध्या ४० अंशांवर गेला आहे. अंगावर इतके कडक ऊन झेलत भाविक मार्गक्रमण करतात. या भाविकांच्या सेवेसाठी आणि त्यांची तहान भागवण्यासाठी या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले आहे उद्योजक मोहम्मद यासीन यांनी. या सत्कृत्यामागचा उद्देश सांगताना यासीन म्हणतात, “आम्ही लहानपणापासून या यात्रेकरूंना पायी वारी करताना पाहत आलोय. गडाकडे जाण्याच्या या मार्गावर अनेक लोक भाविकांसाठी विविध स्टॉल लावतात. या यात्रेकरूंच्या सेवेची संधी आम्हालाही मिळावी या उद्देशाने गेल्या १०-१२ वर्षांपासून आम्ही पिवळा पंप भागात पाणी वाटपाचे काम करतो.” 
 

ते पुढे म्हणतात, “भुकेलेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी देणे ही आमची धार्मिक शिकवण आहे. त्यामुळे या उन्हाळ्याच्या काळात वाटसरूंना पाणी पाजून आम्ही माणुसकीचा धर्म निभावतोय. माझ्या कर्मचाऱ्यांसह मी स्वतः या उपक्रमात सहभागी असतो. आमच्या मालेगावला हिंदू-मुस्लिम एकतेची परंपरा आहे. आम्हाला हीच एकता टिकवून ठेवायची, म्हणून आम्ही असे अनेक उपक्रम राबवत असतो. आमचे अनेक हिंदू मित्र आमच्या सणांमध्ये सहभागी होतात. आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत त्यांचे सण साजरे करतो. आमच्यातील बंधुभाव असाच टिकून रहावा, हीच आमची इच्छा आहे.” 

मानाच्या रथावर फुलांची उधळण 
मालेगावमधील जाफरनगर भागातील मुस्लिम समाज दरवर्षी मानाच्या रथाचे स्वागत करतो. दरेगाव ते मोसम पुलापर्यंत ठिकठिकाणी मुस्लिम बांधव पाणी, सरबतचे वाटप करत भाविकांचे स्वागत करतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही कुल जमाती तंजीमच्या सदस्यांनी मानाच्या रथावर व भाविकांच्या अंगावर गुलाबाच्या पाकळ्यांचे उधळण करत स्वागत केले.

मालेगावत मुस्लिम समाजाने सेवाभावी वृत्तीने केलेल्या या कार्याचे कौतुक करताना शिरपूर येथील मानाच्या रथाचे संचालक आबा चौधरी म्हणाले की, “मुस्लिम मोहोल्ल्यांमधून रथ घेऊन जात असताना तेथील वातावरण अगदी भारावून टाकणारे होते. मुस्लिम बांधव ठिकठिकाणी गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करत होते. मुस्लिम धर्मगुरूंनी अक्षरशः रथासोबत चालून आमचे स्वागत केले. या कृतीने हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश मालेगावने अख्या देशाला दिले आहे.”
 

ते पुढे म्हणतात, “या चैत्रोत्सवात आपल्या देशाच्या सौहार्दाची संस्कृती सगळीकडे झळाळून आली. मुस्लिम बांधवांनी जेवढ्या आनंद-उत्साहाने आमचे स्वागत केले, ते खरोखरच कौतुकास्पद होते. मालेगावकरांच्या या कृतीने देशचं  नाही तर, जगभरात आपल्या गंगा-जमुनी संस्कृतीचा एक प्रेमळ संदेश जाईल.”

- भक्ती चाळक
([email protected])

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter