प्रयागराजमध्ये १३ जानेवारीपासून महाकुंभ मेळा सुरू झाला आहे. हा जगातील सर्वात मोठा अध्यात्मिक आणि सांस्कृतिक समारंभ मानला जातो. २६ फेब्रुवारी म्हणजे महाशिवरात्रीपर्यंत हा महाकुंभ सुरू राहणार आहे. जगभरातील भाविक या सोहळ्यात सहभागी होत असताना मात्र, पाकिस्तानातील हिंदूंना व्हीसा संबंधीत समस्येमुळे यात सहभागी होता येत नाही. यामुळे पाकिस्तानातील हिंदूंनी आपला एक वेगळा कुंभमेळा आयोजित केला आहे.
पाकिस्तानी युट्यूबर हरचंद राम याने आपल्या ब्लॉगमध्ये या अनोख्या कुंभमेळ्याची झलक दाखवली आहे. रहीमयार खान जिल्ह्यात झालेल्या या कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या एका पुजाऱ्याने बोलताना म्हटले आहे की, "आम्ही भारतातील प्रयागराज येथे जाऊ शकत नाही. यामुळे आम्ही येथेच महाकुंभचे आयोजन केले. १४४ वर्षांनंतर आलेला हा कुंभमेळा कदाचित आमच्या आयुष्यातील अखेरचा कुंभमेळा असेल. महाकुंभमेळ्यात गंगास्नानाचे विशेष महत्व आहे. मात्र, पाकिस्तातील हिंदूंना भारतात जाऊन गंगा स्नान करणे अवघड आहे. यामुळे भारतातून गंगेचे पाणी आणून ते येथील पाण्यात टाकण्यात आले आहे."
पाकिस्तानात कुंडस्नान विधी
पाकिस्तानात गंगा नदीच्या पाण्यात आंघोळीसाठी एक तलाव बांधण्यात आला आहे. त्या तलावात गंगेचे पाणी टाकण्यात आले आहे. भाविक त्यात उभे राहून स्नान करत आहेत. त्यांना गंगास्नानाचा अनुभव घेता यावा, यासाठी पुजारी त्यांच्या अंगावर पाणी टाकत आहेत.
भाविकांसाठी तीर्थप्रसाद
स्नानानंतर भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्थाही करण्यात आली होती. सर्वांसाठी खिचडी तयार करण्यात आली होती. धार्मिक विधी दरम्यान, भक्तांनी त्यांच्या गुरूंचे चरणस्पर्श केले आणि आशीर्वाद घेतले. छोट्या प्रमाणावर आयोजित केलेल्या या महाकुंभात भाविकांचा उत्साह पाहण्यासारखा होता.