उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याची सुरुवात झाली आहे पहिल्या दिवशी जवळपास ४० लाख भाविकांनी कुंभमेळ्याला हजेरी लावली. ४५ दिवस चालणाऱ्या या कुंभमेळ्यात यंदा ४० कोटींहून अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रयागराजमध्ये येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश सरकारने चोख बंदोबस्त केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, राज्य सरकारने ४० हजार पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. याशिवाय २७०० कॅमेरे लावण्यात आले आहेत. १२० मीटरपर्यंतच्या उंचीवर ड्रोनही तैनात करण्यात आले आहेत.
या परिसरात लावण्यात आलेले कॅमेरे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये फेशियल टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. मोठ्या प्रवेशद्वारांवर कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पोलीस ठाण्यांमध्ये सायबर हेल्प डेस्कही स्थापन करण्यात आला आहे. या डेस्कवर ५६ सायबर वॉरियर्स तैनात करण्यात आले आहेत.
याशिवाय प्रशासनाने भाविकांना राहण्यासाठी सुमारे दीड लाख तंबूही लावले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात शौचालये बांधण्यात आली आहेत. या परिसरात २३ तात्पुरती रुग्णालयेही तयार करण्यात आली आहेत. या रुग्णालयांमध्ये प्रयोगशाळा उभारण्यात आल्या असून याठिकाणी शस्त्रक्रियेचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
देशातील भाविकांसह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया यांसारख्या इतर देशांतील नागरिकही महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी होणार असल्याने सरकारद्वारे भाविकांच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.