नदीकिनाऱ्यावर पसरलेले धुके अन् कडाक्याच्या थंडीत लाखो भाविकांनी गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या संगमावर हाडे गोठवणाऱ्या थंड पाण्यात सोमवारी पौष पौर्णिमेनिमित्त पहिले शाही स्नान केले.
हर हर महादेव, जय श्रीराम आणि हर हर गंगा मैच्या या जयघोषात लक्षावधी भाविकांनी सोमवारी पवित्र स्नान केले. कुंभमेळ्याच्या पहिल्याच दिवशी दीड कोटीहून अधिक भाविकांनी संगमात्त स्नान केल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पौष पौर्णिमेनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या, "इये संस्कृतीचा संगम आहे आणि श्रद्धा व समरसता यांचाही संगम पाहायला मिळत आहे. विविधतेत एकतेचा संदेश देत महाकुंभ २०२५ मानव कल्याणाबरोवरच सनातन संस्कृतीचे दर्शन घडवत आहे," असे आदित्यनाथ यांनी 'एक्स' या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, मंगळवारी दूसरे शाही स्नान असून विविध आखाड्यांचे साधू मंगळवारी पवित्र स्नान करणार आहेत.
भाविकांमध्ये उत्साह
देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांमध्ये पहिल्या शाही स्नानासाठी मोठा उत्साह दिसत होता. "कुंभमेळ्यानिमित्त संगमावरील स्नानाचा अनुभव आध्यात्मिक अनुभूती देणारा होता," असे मत हरियानातील रहिवासी मनजित यांनी व्यक्त केले. हमीरपुर येथील रहिवासी कैलास नारायण शुक्ला आणि अरविंद राजपूत हेदेखील कुंभमेळ्यात सहभागी झाले असून, उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या व्यवस्थेचे त्यांनी कौतुक केले आहे. "प्रशासनाच्या वतीने येथे अत्यंत उत्तम व्यवस्था ठेवण्यात आली असून एकाच वेळी लक्षावधी माणसे स्नानासाठी येत असूनही आमची येथे कोणतीही गैरसोय झाली नाही," असे मत शुक्ला यांनी व्यक्त केले. स्नानाच्या ठिकाणी नदीकाठावर पोलिस तैनात असून अडथळे येणार नाहीत, याची काळजी घेतली जात आहे, असे मतही अनेक भाविकांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “पौष पौर्णिमेच्या पवित्र स्नानासह प्रयागराज येथे महाकुंभची सुरुवात झाली आहे. आपली आस्था आणि परंपरा यांचे प्रतीक असलेल्या या पर्वाच्या निमित्ताने मी सर्व भाविकांना मनापासून वंदन करतो. भारतीय आध्यात्मिक परंपरेचा हा विराट उत्सव आपल्या सर्वांच्या जीवनात नवी ऊर्जा आणि उत्साहाचा संचार करणारा ठरो याच सदिच्छा.”
परदेशी पर्यटकांचा लक्षणीय सहभाग
यंदाच्या कुंभमेळ्यामध्ये परदेशी पर्यटकांचा लक्षणीय सहभाग दिसून येत आहे. दक्षिण कोरियामधील युट्यूबर कुंभमेळ्यात सहभागी झाले असून, ते येथील विविध क्षण कॅमेऱ्यात टिपत आहेत. त्याचप्रमाणे रशिया, अमेरिका आणि युरोपसह जगभरात सनातन धर्माचा अवलंब करणारे अनेक परदेशी नागरिक कुंभमेळ्यात दाखल झाले आहेत. या नागरिकांनीदेखील आज स्नानाची पर्वणी सावली,
हेलिकॉप्टर सफरीचे दर कमी
कुंभमेळ्याचे हवाई दर्शन करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी पर्यटन मंत्रालयाने हेलिकॉप्टर सफरीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या हेलिकॉप्टर सफरीसाठी आकारण्यात येणारे शुल्क आता कमी करण्यात आले. हेलिकॉप्टर सफरीसाठी याआधी तीन हजार रुपये प्रतिव्यक्ती शुल्क आकारण्यात येणार होते. आता हे शुल्क एक हजार २९६ रुपये इतके करण्यात आले आहे. सुमारे ७८ मिनिटांच्या या सफरीमध्ये कुंभमेळ्याचे विहंगम दृश्य पाहता येणार आहे. १३ जानेवारीपासून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अध्यात्माचेच नव्हे, तर व्यापाराचेही केंद्र
महाकुंभमेळ्यामुळे प्रयागराजमध्ये लाखो साधू आणि कोठायधी भाविक जमा झाले आहेत. ४५ दिवसांच्या या जगातील सर्वांत मोठ्या धार्मिक उत्सवात चाळीस कोटी जण सहभागी होण्याचा अंदाज आहे. यामुळे साहजिकच प्रयागराज देशातील आध्यात्मिक केंद्र बनले आहे. मात्र, या कालावधीत कुंभमेळ्याला भेट देणाऱ्यांमुळे व्यापारातही मोठी वाढ होऊन सुमारे दोन लाख कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज अखिल भारतीय व्यापारी संघटनेने (सीएआयटी) व्यक्त केला आहे.
कुंभमेळ्याला ३५ ते ४० कोटी जण भेट देण्याचा अंदाज असल्याने व्यापार, पर्यटन आणि रोजगाराला बळ मिळणार आहे. येथील अर्थव्यवस्थावादीत पर्यटन आणि हॉटेल क्षेत्राचा वाटा मोठा असेल. या क्षेत्रांमध्ये सुमारे ४० हजार कोटींची उलाढाल शक्य आहे. येथे येणारा प्रत्येक जण सरासरी पाच हजार रुपये खर्च करेल, असा अंदाज आहे. राहण्याची व्यवस्था, जेवण, पाणी, धार्मिक वस्तूंची खरेदी, दक्षिणा, आरोग्यसेवा यांचा सभावेश आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter