ओडिशात यंदा दोन दिवस ‘जग जगन्नाथ’

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 3 d ago
ओडिशा जगन्नाथ रथयात्रा
ओडिशा जगन्नाथ रथयात्रा

 

पुरीत जगन्नाथाची वार्षिक रथयात्रा येत्या ७ व ८ रोजी होणार आहे. यानिमित्त ओडिशाचे मुख्यमंत्री मोहनचरण माझी यांनी राज्यात या दोन्ही दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. पुरी येथील भगवान जगन्नाथ आणि त्यांच्या भावंडांच्या वार्षिक रथयात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी माझी यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन मंगळवारी (ता.२) करण्यात आले होते. बैठकीत त्यांनी १९७१ मध्ये शेवटचा साजरा करण्यात आलेल्या या दुर्मिळ उत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले.

या वेळच्या उत्सवाप्रमाणे यंदाही दोन दिवस रथयात्रेचा उत्सव होणार आहे. ५३ वर्षांपूर्वी जसे विधी झाले होते, त्यावेळी तसेच विधी यंदा होणार आहेत. यावर्षी नबाजौबाना दर्शन, नेत्र उत्सव आणि रथयात्रा असे धार्मिक कार्यक्रम रविवारी (ता.७) रोजी एकाच दिवशी आले आहेत. त्यादिवशी थोड्या अंतरापर्यंत रथ ओढले जातील. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी (ता.८) पुन्हा रथयात्रा निघेल. दोन दिवसांच्या रथयात्रेची दुर्मिळ घटना याआधी १९७१ आणि १९०९ मध्ये पाहायला मिळाली होती.

माझी म्हणाले की, ५३ वर्षांपूर्वीच्या दुर्मिळ रथयात्रेचा योग यंदाही आला आहे. सलग दोन दिवसांच्या हा उत्सव नवीन सरकारसाठी शुभसंकेत आहे. त्यामुळे रथयात्रेची सुट्टी आणखी एक दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

अनेक परीक्षा आणि इतर गोष्टी असल्याने सुट्टी जाहीर करण्याची गरज होती. त्यामुळे हा निर्णय स्वागतार्ह आहे.

- पृथ्वीराज हरिचंदन, कायदा मंत्री, ओडिशा

ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर यंदाच्या रथयात्रेसाठी ७ जुलैला पुरीला जाण्यासाठी तब्बल ३१५ विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. गेल्या वर्षापेक्षा गाड्यांची संख्या दुप्पट करणार आहे. स्थानकाजवळ एक मोठा तंबू उभारण्यात येणार असून त्यात १५ हजार प्रवाशांच्या बसण्याची सोय करण्यात येणार आहे.

अश्‍विनी वैष्णव, रेल्वेमंत्री

अहमदाबादमध्येही तयारी पूर्ण

अहमदाबाद : शहरात मोठ्या भक्तीभावाने साजऱ्या होणाऱ्या भगवान जगन्नाथाची रथयात्रेची तयारी पूर्ण झाली. रविवारी (ता.७) होणाऱ्या या रथयात्रेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

१६ किमी

रथयात्रेचे अंतर

१८,७८४

सुरक्षा कर्मचारी तैनात

१,७३३

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडील बॉडीकॅम

२०

ड्रोन

९६

निरीक्षण कॅमेरे

१,४००

दुकानदारांनी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे