या रामलीलेत मुस्लिम कलाकार निभावतात सीतेपासून शिवापर्यंतच्या भूमिका

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 3 d ago
रामाच्या भूमिकेत गुड्डू तिवारी आणि सीतेच्या भूमिकेत अकलीम शेख
रामाच्या भूमिकेत गुड्डू तिवारी आणि सीतेच्या भूमिकेत अकलीम शेख

 

अभिषेक कुमार सिंह / वाराणसी / सासाराम

पटना पासून १९० किमी अंतरावर असलेल्या कैमूर जिल्ह्यातील सातो अवंती या गावातील रामलीला येथील धार्मिक सौहार्दाच्या संस्कृतीचे वर्षानुवर्षे चालत आलेले उदाहरण आहे. बिहारच्या या छोट्याशा गावात रामलीलेतील कलाकार, आयोजक आणि प्रेक्षकांमध्ये मुस्लिमांचा लक्षणीय सहभाग असतो.

या रामलीलेत दिग्दर्शक शेख मुमताज अली माईक हातात घेऊन रंगमंचावर असलेल्या पात्रांना पुढील संवादांविषयी सूचना देताना 'रामचरितमानस'मधील चौपाईचे पठण सुरू करतात. गावातील प्रत्येक व्यक्तीसाठी ही अगदी सामान्य बाब आहे. या रामलीलेत सीतेची भूमिका मुमताज अली यांचा १९ वर्षीय मुलगा अकलीम निभावतो.

'सियावर राम चंद्र की जय' हा घोष दुमदुमून जातो आणि प्रेक्षक मंचावरील पात्रांचा जयजयकार करू लागतात. कोणाला आठवणही राहत नाही की या जयकार करणाऱ्या जमावात सातो अवंती गावातील अनेक मुस्लिमही आहेत. वर्षांपासून रामलीलेत भाग घेण्यासाठी आणि ती पाहण्यासाठी ही मंडळी मैलोनमैलांचा प्रवास करून येथे येतात.

सातो अवंती गावाची सौहार्दाची संस्कृती
गावातील वयोवृद्धांच्या मते, १९८२मध्ये तत्कालीन सरपंच जमालुद्दीन अंसारी आणि मास्टर नुरुल अंसारी यांच्या प्रयत्नांमुळे गावात रामलीलेची सुरुवात झाली. धार्मिक प्रवृत्तीचे मुस्लीम असूनही ही मंडळी रामचरितमानस आणि त्यातील शिकवणींचा आदर करायचे, अशी आठवण ते सांगतात. त्यांचा विश्वास होता की रामचरितमानस ऐकल्याने व्यक्ती, त्याचे कुटुंब आणि समाजात सकारात्मक बदल होतो.

'हिंदुस्तान टाइम्स'शी बोलताना या रामलीलेचे काळजीवाहक सुरेश सिंह सांगतात, "दोघांनी गावकऱ्यांची बैठक बोलावली आणि रामलीला सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. या कल्पनेचे दोन्ही समुदायातील लोकांनी स्वागत केले आणि त्यासाठी सर्वांनी मदतीचे आश्वासन दिले."

पाणी आणि वीज नसलेल्या या दुर्गम गावात संसाधनांची, रंगमंच, पोशाख आणि सजावट यांची व्यवस्था करणे सोपे नव्हते. तरीही अंसारी आणि इतरांनी खूप मेहनत केली. सण सुरू होण्यापूर्वी ते वाराणसी आणि आसपासच्या ठिकाणांहून आवश्यक वस्तूंची खरेदी करत.

१९८२मध्ये रामिलेलेच्या पहिल्याच कार्यक्रमात खुर्शीद आलम यांनी रामाची भूमिका केली होती, तर खुद्द सरपंच जमालुद्दीन अंसारी यांनी कुंभकर्णाची भूमिका निभावली होती. मार्शल आर्ट तज्ञ खलीफा सदरुद्दीन अंसारी आणि शहाबुद्दीन अंसारी यांनी त्यातील युद्धाच्या दृश्यांचे दिग्दर्शन केले. विशेष म्हणजे आज ४२ वर्षांनंतरही ते ही जबाबदारी निभावत आहेत.

समारंभाचे आयोजन आणि सहभाग
आश्विन महिन्यात पंधरवडाभर संध्याकाळी ५ ते ७:३० वाजेपर्यंत रामलीलेचे आयोजन केले जाते. विजयादशमीच्या दिवशी भगवान रामाच्या राज्याभिषेक समारंभाने रामलीला संपते. सुरेश सिंह सांगतात, "दोन्ही समुदायातील लोक रामलीलेत दरवर्षी मनापासून आपापल्यापरीने योगदान देतात."

रामलीलेत दरवर्षी किमान ३५ टक्के मुस्लिम असतात आणि दरवर्षी त्यांचा सहभाग वाढतो आहे.आता चार दशकांनंतर मुमताज अली  दिग्दर्शक म्हणून काम पाहात आहेत. तर त्यांचा मुलगा अकलीम शेख सीतेची भूमिका निभावत आहे. सोबतच तौकीर अंसारी कुंभकर्णाची, आझाद अंसारी सुमित्राची, इम्रान अंसारी कैकेयीची आणि अफजल अंसारी भगवान शिवाच्या रूपात रंगमंचावर येतात. तर नुरुल होदा अंसारी उत्तानपाद (हास्य कलाकार) म्हणून प्रेक्षकांना हसवतात. या रामलीलेत केवळ वयोवृद्धच नाही, तर मुस्लिम मुलंही सक्रियपणे सहभागी होतात आणि राम-रावणाच्या सैन्यातील सैनिकांच्या भूमिका करतात.

हिंदू-मुस्लिम एकात्मता
या रामलीलेत भगवान रामाची भूमिका गुड्डु तिवारी करतात, तर लक्ष्मणाची भूमिका यशवंत सिंह करतात. हनुमानाची भूमिका अमित सिंह करतात. ईश्वरचंद्र सिंह रावणाच्या भूमिकेत त्यांच्या गरजणाऱ्या आवाजाने मंच व्यापून टाकतात. हिन्दु-मुस्लिम कलाकारांच्या योगदानाने सातो अवंती गावाची रामलीला लोकप्रिय होऊ लागली आहे. यामुळे गावातील धार्मिक सौहार्द बहरले आहे.

सीतेची भूमिका निभावणारा अकलीम म्हणतो, "गावातील हिंदू मुहर्रम आणि मिलादुन्नबीच्या आयोजनात संपूर्ण मदत करतात. आम्ही ईद आणि सर्व सण एकत्र साजरे करतो. इतर भागांतून येणाऱ्या सांप्रदायिक तणावाच्या बातम्या वाचून मी आश्चर्यचकित होतो. जेव्हा आपण सर्व एकाच ईश्वराची निर्मिती आहोत, तर एक माणूस दुसऱ्यावर कशी काय द्वेष करू शकतो?"