ईद-उल-अजहा (बकरी ईद) : त्याग आणि निष्ठा यांचे स्मरण करण्याचा दिवस

Story by  आवाज़ मराठी | Published by  sameer shaikh • 1 Years ago
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

 

देशभरात आज 'ईद-उल-अजहा' म्हणजेच 'बकरी ईद' आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जात आहे. प्रेषित इब्राहिम यांच्याशी निगडित असलेली या सणाविषयीची कथाही फार उद्‌बोधक आहे. 'बकरी ईद' साजरी करण्यामागची प्रेरणा, या सणाचा खरा अर्थ यांच्याविषयी मांडणी करणारा हा संपादित लेख... 

सुमारे चार हजार वर्षांपूर्वीची गोष्ट. इराकमध्ये सुखसमृद्धीने नटलेली अशी दोन शहरे होती- काबूल व नैनवा. त्यावेळी येथे नमरुद नावाचा राजा राज्य करीत होता. या शहरात त्याचीच सत्ता होती. तो स्वतःच ईश्वर असल्याचे आपल्या प्रजेला सांगत असे. लोक त्याचीच पूजा व भक्ती करत. त्याच वेळी इब्राहिम  यांचा एका मूर्तिकाराच्या घरात जन्म झाला. इब्राहिम जसे वयाने मोठे होत गेले, तसतसे त्यांना ईश्वराचे ज्ञान मिळत राहिले. ते सतत सृष्टीच्या निर्मात्याच्या शोधात राहिले. त्यांचा जन्म संपन्न घराण्यात झाला होता. त्यांच्यासमोर सर्व सुख, सत्ता हात जोडून उभी होती.
 
परंतु हजरत इब्राहिम हे काही सामान्य मनुष्य नव्हते. त्यांच्या आयुष्याचे ध्येय वेगळेच होते. मानवात सुख, शांती, मानवता, सत्य, सदाचार, सत्कर्म, दया, परोपकार या जीवनमूल्यांची जपणूक व्हावी यासाठी ते प्रयत्नशील होते. मात्र राज्यकर्त्यांची स्वार्थी वृत्ती, ढोंगीपणा ते पूर्णपणे जाणून होते. त्यात बदल घडावा आणि गुण्यागोविंदाने सामान्य जनता नांदावी असेच त्यांना मनोमन वाटे. परंतु नेमके हेच विचार सत्ताधीशाला पटणारे नव्हते. म्हणूनच त्यांच्यावर संकटांचे डोंगर कोसळले आणि खुद्द जन्मदात्या पित्यानेच त्यांना घरातून हाकलून देण्याचा व वारसा हक्क रद्द करण्याचा निर्णय फर्मावला. एवढेच नव्हे तर त्यांना जिवंत जाळण्याचा हुकूम दिला. ईश्वरी कृपेने मात्र ते या प्रसंगातून सहीसलामत बचावले. परंतु त्यांना घरदार, प्रियजन, आप्तेष्टांचा त्याग करून देश सोडावा लागला. 

आपली पत्नी व मुलाला घेऊन हजरत इब्राहिम परदेशी रवाना झाले. मानव जातीच्या कल्याणासाठीच त्यांची ही भ्रमंती सुरू झाली होती. सीरिया, पॅलेस्टाईन, इजिप्त व अरबस्तानातील देशांचा दौरा त्यांनी केला. संकटामागून संकटे येतच होती. त्यांचा सामना करत ते पुढे चालतच राहिले. ईश्वराने पुन्हा एक दुसरी परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांची पत्नी हाजरा व तान्ह्या मुलाला वाळवंटात एकटे सोडून देण्याचा प्रसंग आला. त्या दोघांना वाळवंटात सोडून ते परतले. तेव्हा त्यांची पत्नीदेखील परीक्षेसाठी सज्ज झाली.
 
तिच्याकडील अन्नसाठा जेव्हा संपला तेव्हा मात्र स्वतःच्या बालकाच्या भुकेचा प्रश्न उभा राहिला. मुलगा तहानेने व भुकेने अक्षरशः व्याकूळ झालेला. पाण्यासाठी शोध घेणे महत्त्वाचे होते. सभोवतालचे सर्व डोंगर पालथे घातले. 'सफा' आणि 'मर्वा' या टेकड्यांच्या दरम्यान सात वेळा ये-जा करूनही पाण्याचा थेंब मिळेना. मातेचे मन मुलासाठी बेचैन झाले होते. परंतु मार्ग सापडत नव्हता. अखेर तिची ही केविलवाणी अवस्था पाहून ईश्लावराला त्या मातेची दया आली आणि ज्या ठिकाणी मूल होते तेथे मुलाच्या पायाच्या स्पर्शानेच पाण्याचा झरा निर्माण झाला, जो 'जम जम' म्हणून आज हजारो वर्षांनंतरही ममतेच्या प्रेमाची साक्ष देतो. 

मुलाची व मातेची तर तहान भागलीच, परंतु भविष्यात ईश्वराच्या मार्गावर येणाऱ्या सर्व भाविकांची तहान भागवणारा पाण्याचा हा अजब साठा आजही पाहावयास मिळतो. 'हज' यात्रेतील प्रत्येक प्रवासी 'जमजम'चे पाणी घेतल्याशिवाय परतूच शकत नाही. 'जमजम'ची खोली ३५ मीटर असून हजारो वर्षांपासून लाखो भाविक पाणी घेऊन स्वदेशी जातात; तरीदेखील पाण्याची पातळी किंचितही कमी होत नाही. वाळवंटातील 'जमजम'ची ही उत्पत्ती खरोखरच ईश्वरी देणगी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

जेव्हा इब्राहिम ८६ वर्षांचे होते, त्यांना संतती प्राप्त झाली. त्या पुत्राचे नाव इस्माईल असे ठेवले गेले. खरा कठीण परीक्षेचा काळ पुढचा होता. ईश्वराने वृद्धापकाळात संतती तर दिली; परंतु नेमक्‍या याच संततीचा बळी स्वतःच्या हाताने जगाच्या पालनकर्त्यासाठी आपण देऊ शकतो की नाही, असा प्रसंग त्यांच्यासमोर उभा राहिला. इब्राहिम यांना स्वप्नात ईश्वराकडून अशी आज्ञा मिळाली, की 'आपल्या लाडक्‍या मुलाचे माझ्यासाठी बलिदान कर'. तेव्हा इब्राहिम  यांनी आपल्या लाडक्‍या मुलास, "हे माझ्या पुत्रा, आता तूच सांग तुझा काय विचार आहे?" असे विचारले. तो म्हणाला, "पिताजी, जी काही आज्ञा आपणास दिली जात आहे तसेच करा." सरतेशेवटी जेव्हा दोघा पिता-पुत्रांनी आज्ञापालनासाठी मान तुकविली आणि इब्राहिम यांनी पुत्राला बळी देण्यासाठी सुरा उगारला. परंतु ईश्वराला कोण्या मुलाचा बळी घ्यावयाचा नव्हता.

याच वेळी इस्माईल  यांच्याकडे निसर्गातून ईशदुतामार्फत एक मेंढा पाठवण्यात आला व त्याचाच बळी देण्यात आला. इस्माईल  सहीसलामत राहिले. इब्राहिम  आपल्या परीक्षेत पूर्णतः उत्तीर्ण झाले. ईश्वराला कुण्या प्राण्याची हत्या करणे किंवा त्यांचे मांस व रक्त यांची आवश्‍यकता नव्हती. निश्‍चितच ही एक उघड परीक्षा होती. त्यामुळेच कुरानात स्पष्टपणे येते, '(पण हे लक्षात असू द्या) ईश्वरापर्यंत ना त्यांचे मांस पोहोचतो, ना त्यांचे रक्त. तर ईश्वराप्रति तुमच्या मनात जो भाव आहे, तो त्याला पोहोचतो.' या घटनेपासून प्रेरणा घेऊन सर्व मुस्लिम बांधव 'बकरी ईद' साजरी करतात आणि कुर्बानी देतात.

ईश्‍वर भक्ताकडून जीवनातील प्रत्येक क्षेत्रात त्यागाची अपेक्षा ठेवतो. यात गोरगरिबांच्या सेवेत स्वतःचे आयुष्य खर्ची करणे, त्याग करणे, आजारी गरजूंना औषध देणे, निराधार मुला-मुलींच्या शिक्षणासाठी मदत करणे, आपले घर, समाज, देशाच्या प्रगतीसाठी आयुष्य व्यतीत करणे ही उत्तम कुर्बानी आहे. प्रेषित इब्राहिम यांनी स्वतःचे आयुष्य ईश्‍वराच्या आज्ञेनुसार व्यतीत केले. त्यामुळे त्यांच्यावर ईश्‍वराची कृपादृष्टी होती. म्हणून त्यांना ‘खलीलुल्लाह’ म्हणजे ईश्वराचा प्रिय अशी पदवी खुद्द ईश्‍वरानेच दिली होती. प्रेषितांच्या निष्ठेस व त्यागास सलाम करण्याचा दिवस म्हणजेच बकरी ईद होय. कुर्बानीचा अर्थ आपला वेळ, संपत्ती इतकेच नव्हे, तर स्वतःचाही त्याग असा आहे. या ईदद्वारे सामाजिक एकता आणि समाजकल्याणाची प्रेरणा मिळते व त्यात मानवजातीचे ऐक्‍य अबाधित राखण्याचे महान कार्य पार पाडले जाते. 

- अस्लम जमादार


 

'बकरी ईद' विषयीचे हे लेखही जरूर वाचा :