फिरदौस खान
भारतातील सूफी संतांनी इथल्या गंगा-जमनी संस्कृतीला बळकटी दिली. या सृष्टीचा निर्माता एकच ईश्वर आहे आणि सर्व मानव त्याचे भक्त आहेत, यावर सूफींचा विश्वास असतो. या विचारांना अनुसरून सूफी संतांनी प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाने वागण्याचा संदेश दिला. त्यामुळेच आजही त्यांच्या भक्तांमध्ये सर्वधर्मीय मंडळी दिसतात. म्हणूनच त्यांच्या खानकाहांवर म्हणजे दर्गांवर पूर्वीपासूनच सर्व धर्मांचे सण आनंदाने साजरे करण्याची परंपरा राहिली आहे. या दर्गांवर दिवाळीही साजरी होते. देशभरातली महत्त्वाच्या सुफी दर्गांवर नेमकी कशी साजरी होते दिवाळी, जाणून घेऊयात...
दरगाह हजरत निजामुद्दीन औलिया, दिल्ली
दिल्लीतील हजरत निजामुद्दीन औलिया यांच्या दरगाहमध्ये दिवाळीच्या दिवशी बरीच रोषणाई केली जाते. दरगाह परिसराला बल्बांच्या माळांनी सजवले जाते. दिवाळीच्या रात्री इथे मातीचे दिवे लावले जातात. हे सर्व हजरत निजामुद्दीन औलिया यांचे हिंदू भक्त करतात.
दिवाळीच्या रात्री भक्त इथे मातीचे दिवे, तेल आणि वात आणून दरगाहमध्ये दिवे लावतात. याला 'ईद-ए-चराग़ां' म्हणतात. 'ईद' म्हणजे आनंद आणि 'चराग़ां' म्हणजे दिवे. दिवे लावल्यानंतर इथे मिठाई वाटली जाते आणि एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात.
विशेष म्हणजे, यातील एक दिवा भाविक त्यांच्या घरी नेऊन ठेवतात. त्यांचा विश्वास आहे की हा दिवा हजरत निजामुद्दीन औलिया यांचे आशीर्वाद आहे. तो घरात ठेवल्याने धनधान्य व समृद्धी येईल. जर काही आजारपण झाले तर ते या दिव्याचे तेल त्यांच्या कपाळावर लावतात. त्यांचा असा विश्वास आहे की यामुळे त्यांची प्रकृती सुधारते. दिल्लीसह इतर दरगाहांवरही दिवाळीला दिवे लावले जातात. मुस्लिमही त्यांच्या हिंदू बांधवांसोबत सणात सहभागी होतात.
दरगाह हाजी अली, मुंबई
महाराष्ट्रातील मुंबईत वरळी किनाऱ्याजवळ एका बेटावर असलेल्या सैयद हाजी अली शाह बुखारी यांचा दरगाह परिसरातही दिवाळीला दिवे लावले जातात. ही दर्गा हाजी अली म्हणून ओळखले जाते. मुंबईतील ही सर्वांत जुनी वस्तू आहे. हाजी अली हे शेवटचचे पैगंबर हजरत मुहम्मद यांचे वंशज होते. त्यांनीही प्रेम आणि बंधुभावाचा संदेश दिला. त्यांच्या भक्तांमध्ये सर्व धर्मांचे लोक आहेत. दिवाळीच्या रात्री ते दरगाह परिसराला प्रकाशमय करतात. इथे ते मातीचे दिवे लावतात. दिवे आणि लाइटच्या प्रकाशात दरगाहचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.
दरगाह ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती, अजमेर
राजस्थानातील अजमेरमध्ये असलेल्या ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांच्या दरगाह परिसरातही दिवाळीला दिवे लावले जातात आणि मेणबत्त्या पेटवल्या जातात. ख्वाजा मोईनुद्दीनही पैगंबर मुहम्मद यांचे वंशज होते. त्यांनी चिश्तिया सुफी परंपरेचा प्रचार केला आणि प्रेमाचा संदेश दिला. दिवाळीच्या काळात येथे भक्तांची संख्या खूप वाढते. याचे एक कारण म्हणजे गुजरातमधील व्यापारी दिवाळीच्या निमित्ताने पाच दिवस आपला व्यवसाय बंद ठेवतात आणि त्या सुट्टीत अजमेरला येतात.
दरगाह कमरुद्दीन शाह दरगाह, झुंझुनूं
राजस्थानातील झुंझुनूं जिल्ह्यातील कमरुद्दीन शाह दरगाहही दिवाळीला रोषणाईने उजळून निघते. दिवाळीनिमित्त दरगाह परिसराला सजवला जातो. दिवाळीच्या रात्री बल्ब, मातीचे दिवे, मेणबत्त्यांच्या विशेष आरास इथे पाहायला मिळते. यावेळी इथे फटाके फोडले जातात आणि मिठाई वाटली जाते. इथे ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. येथील लोक सांगतात की हजरत कमरुद्दीन शाह यांची संत चंचलनाथ यांच्यासोबत गाढ मैत्री होती. ते दोघेइबादत आणि साधनेत मग्न राहत. गुदडी बाजारात त्यांची भेट होत असे. त्यांची मैत्री प्रसिद्ध होती.
दरगाह देवा शरीफ, बाराबंकी
उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील देवा नावाच्या गावात असलेल्या देवा शरीफ दरगाहवरही दिवाळीला दिवे लावले जातात. हाजी वारिस अली शाह यांची ही दरगाह आहे. त्यांचे हिंदू भक्त मोठ्या प्रमाणात आहेत. दरवर्षी ते दरगाहवर रोषणाई करतात आणि मिठाई वाटतात.
दरगाह किछौछा शरीफ दरगाह, किछौछा
उत्तर प्रदेशातील अम्बेडकर नगर जिल्ह्यातील अशरफपूर किछौछा गावात असलेल्या सुलतान सैयद मकदूम अशरफ जहांगीर सिमनानी यांच्या दरगाहवर दिवाळीला रोषणाई केली जाते. त्यांच्या दरगाहवर सर्व धर्मांचे लोक येतात, त्यामुळे दिवाळी येथे आनंदाने साजरी होते. दिवाळीनिमित्त दरगाहला सजवले जाते, मातीचे दिवे आणि मेणबत्त्या लावल्या जातात, मिठाई वाटली जाते.
दरगाह साबिर पाक, कलियर शरीफ
उत्तराखंडमधील रुडकीजवळील कलियर शरीफमधील हजरत मकदूम अलाउद्दीन अली अहमद यांच्या दरगाहवर दिवाळीला रोषणाई करण्याची जुनी परंपरा आहे. त्यांना साबिर पाक आणि साबिर पिया कलियरी म्हणून ओळखले जाते. दिवाळीच्या रात्री दरगाह परिसर उजळून निघतो. त्यावेळी इथे मातीचे दिवे आणि मेणबत्त्यांची आरास उठून दिसते.
- फिरदौस खान