'भक्ती-शक्ती'चा मेळ साधणारे सर्वधर्मीय इफ्तार

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 9 d ago
पुण्यात साजरा झाला सर्वधर्मीय इफ्तार
पुण्यात साजरा झाला सर्वधर्मीय इफ्तार

 

बरेचदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वावर एकाच धर्माचा शिक्का मारून ते मुस्लिमविरोधी असल्याचा प्रचार केला जातो. आज प्रत्येकजण आपापल्या राजकीय विचारसरणीनुसार महाराजांची प्रतिमा तयार करत आहे. प्रत्यक्षात मात्र महाराजांनी अठरापगड जातींची एक मोट बांधून स्वराज्य निर्माण केल्याचे अनेक पुरावे सापडतात.  सध्या राज्यात अनेक ठिकाणी धार्मिक तेढ निर्माण करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा परिस्थितीत पुण्यातील एका संघटनेने महाराजांचे विचार पुढे घेऊन धार्मिक सलोखा जपण्याचा प्रयत्न केला. 

काही दिवसांपूर्वी मुस्लिम धर्मियांचा रमजानचा पवित्र महिना सुरू झाला आहे, तर नुकताच देशभरात तिथीनुसार शिवजन्मोत्सव देखील उत्साहात साजरा झाला. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील नव जागृती मित्रमंडळाच्या पुढाकारातून आणि बज्मे तहा यंग सर्कल, बज्मे रहेबर यंग सर्कल, युनिटी फ्रेंड सर्कल, फैजाने रजा यंग सर्कल, जियान फ्रेन्ड सर्कल यांच्या सहकाऱ्यातून मंगळवार पेठेत भव्य इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते. 

नव जागृती मित्रमंडळाचे अध्यक्ष राहुल शर्मा यांनी उपक्रमविषयी बोलताना म्हटले की, “छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही मुघलांविरोधात होती. त्यांनी ज्यापद्धतीने सर्व जाती-धर्मातील लोकांना एकत्र घेत स्वराज्याची निर्मिती केली, त्यातून लक्षात येते की ते मुस्लिम विरोधी कधीच नव्हते. आमच्या शिवजयंतीची कल्पना भक्ती-शक्ती संगमावर आधारित आहे. मुस्लिम बांधव आणि वारकरी संप्रदायातील मंडळींना सोबत घेऊन यंदा हा उपक्रम राबवण्याचे ठरवले.”

भक्ती-शक्ती संकल्पनेवर आधारित 
छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवकाळात समता आणि सुराज्यासाठी भक्ती-शक्ती ही संकल्पना यशस्वीपणे राबवली. भक्तीच्या माध्यमातून त्यांनी समाजात धार्मिक एकात्मता आणि समानतेचा संदेश पसरवला आणि शक्तीच्या जोरावर स्वराज्याची स्थापना केली. तर वारकरी संप्रदायाने सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. यामुळे समाजात समता प्रस्थापित झाली आणि सुराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. त्यामुळे याच भक्ती-शक्ती संकल्पनेवर आधारित हा उपक्रम राबवण्याचे ठरवले असल्याचे आयोजकांनी सांगितले.  
 
 
उपक्रमाच्या संकल्पानेविषयी बोलताना राहुल म्हणाले, “आम्ही मागील चार वर्षांपासून इफ्तारचे आयोजन करत आहोत. गेल्या काही वर्षी रमजान महिन्यात हनुमान जयंती येत होती, त्यामुळे हे दोन्ही सण आम्ही एकत्रित साजरे करतो. परंतु यावेळी शिवजयंती पवित्र रमजान महिन्यात आल्याने माझ्या सगळ्या मुस्लिम सहकाऱ्यांनी शिवजयंती आणि इफ्तार एकत्रित साजरा करण्याची संकल्पना मांडली. आणि अशापद्धतीने आम्ही हा उत्सव साजरा करण्याचे ठरवले.”

ते पुढे म्हणतात, “यंदाच्या संकल्पनेविषयी वारकऱ्यांना आम्ही आमची कल्पना सांगितली तेव्हा त्यांनी सर्वात आधी प्रश्न उपस्थित केला की सर्व एकत्र येणे खरंच शक्य होऊ शकेल का? परंतु प्रत्यक्षात ते जेव्हा उपक्रमात सहभागी झाले तेव्हा ते खऱ्या अर्थाने भारावून गेले. त्यांनी आमच्या या भक्ती-शक्ती संगमाचे भरभरून कौतुक देखील केले. हीच आमच्या कार्याची पोचपावती आहे.”   

या उपक्रमात सहभागी झालेल्या परवीन तांबोळी यांनी उपक्रमविषयी आपली प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “आज आपल्या महाराजांच्या जयंतीनिमित्त हा जो उपक्रम पार पडला तो खरंच कौतुकास्पद आहे. भारतात आम्ही हिंदू-मुस्लिम सगळे एकतेने नांदतो, त्याचाच प्रत्यय दरवर्षीच्या या कार्यक्रमातून मिळतो. जो या महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिम करेल त्याला आम्ही हाणून पाडू. आज मी माझा रोजा सोडण्यासाठी याठिकाणी आले कारण मला स्वतःला दाखवून द्यायचे आहे की ‘हिंदू-मुस्लिम एक है’.”   

पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे उपाध्यक्ष रिझवान खान हे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, “यंदा या कार्यक्रमात मी पहिल्यांदाच सहभागी झालो आहे. इथे आल्यावर मला अतिशय भारावून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले. इथे गंगा-जमुनी संस्कृतीचा मेळ झालेला पाहायला मिळाला. हिंदू-मुस्लिम आणि वारकरी संप्रदायाची मंडळी एकत्र आल्याने इथे अतिशय पवित्र माहौल मी अनुभवला. अशापद्धतीचे उपक्रम सर्वत्र राबवले गेले पाहिजेत. मी सुद्धा आमच्या व्यापारी संघाला एकत्र घेत हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.” 

कार्यक्रमाच्या आयोजकांपैकी एक असलेले इस्माईल खान यांनी हा उपक्रम राबवण्याचे महत्व सांगितले. ते म्हणाले की, “शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर आम्ही इफ्तारचे आयोजन करण्याचे ठरवले. आम्ही चार मंडळे एकत्र येत गेल्या चार वर्षांपासून हिंदू-मुस्लिमांसाठी भंडारा आणि इफ्तारचे आयोजन करतो. आम्हाला या उपक्रमाद्वारे पूर्वापार चालत आलेली हिंदू-मुस्लिम एकता अशीच टिकवून ठेवायची आहे.”  

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा खरा वारसा पुण्यातील नव जागृती मित्रमंडळाच्या उपक्रमातून दिसून येतो. शिवजयंती आणि रमजानच्या निमित्ताने आयोजित भव्य इफ्तारात हिंदू-मुस्लिम आणि वारकरी संप्रदाय एकत्र आले, त्यामुळे धार्मिक सलोखा आणि एकतेचे दर्शन घडले. महाराजांनी सर्व जाती-धर्मांना एकत्रित करून स्वराज्य निर्माण केले होते, हे सिद्ध करत हा उपक्रम भक्ती-शक्तीचा संगम ठरला. 
 
- भक्ती चाळक
([email protected])

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter