वारीदरम्यान पुण्यात घडले हिंदू मुस्लीम सौहार्दाचे दर्शन

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
सर्वधर्मीय दिंडीतील एक दृश्य
सर्वधर्मीय दिंडीतील एक दृश्य

 

अभंगाच्या तालावर आणि टाळमृदंगाच्या गजरात नुकतेच पालख्यांचे प्रस्थान झाले. मानाच्या पालख्यांपैकी असलेल्या संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान २९ जूनला झाले तर, ३० जूनला आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. प्रस्थान झाल्यानंतर बरोबर तिसऱ्या दिवशी या पालख्या पुण्याच्या मध्यवर्ती भागात पोहोचतात. 

अनेक शतकांच्या परंपरेनुसार ही भक्तीची गंगा देहू, आळंदी येथून निघताच ठिकठिकाणी भाविकांचा जनसागर पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी जमलेला असतो. समाजातील उच्च-नीच, जात-पात यासारख्या अगम्य गोष्टींमुळे माणसातील माणूसपण हरवत असताना, विठू नामाच्या गजरात हरवलेला वारकरी जातपात न पाहता खांद्याला खांदा देत चालत असतो, हे निरपेक्ष भाव सामजिक सलोख्याचा आदर्श निर्माण करताना दिसतात. 
 
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म।
भेदाभेद भ्रम अमंगळ।

वारीत चालणारा प्रत्येक माणूस कोणत्याही जातीधर्माचा नसून तो केवळ वारकरी असतो. वारकऱ्याचं क्वालिफिकेशनच तुकोबारायांनी सांगून ठेवल आहे. वारकरी संप्रदायात जाती, वर्ण, धर्म, प्रांत, भाषा या क्षुद्र भेदाभेदांना कुठलेच स्थान नाही. याठिकाणी उच-निचतेच्या, श्रेष्ठ- कनिष्ठतेच्या विचारांनाही थारा नाही. त्यामुळे कोणत्याही समाजातील व्यक्ती वारीत पाहायला मिळते. तसेच पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक सेवाभावी हात देखील राबत असतात.

या काळात ठिकठिकाणी वारकऱ्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था स्थानिक नागरिक स्वखुशीने करत असतात. त्यात सर्व जाती-धर्माचे लोक असतात. अन्नदान, उपयोगी वस्तूंचे वाटप ते अगदी चपला सांधून देणे, दाढी करून देणे, थकलेल्या पायांना मालीश करून देणे, अशा पद्धतीची जमेल ती सेवा लोक मनोभावे करतात. याबाबतीत पुणेकर मागे हटले नाहीत, त्यांनीसुद्धा जमेल त्यापद्धतीने वारकऱ्यांची सेवा करण्यात योगदान दाखवले. दरवर्षी प्रमाणे यंदाही वारीत सामाजिक सलोख्याचे दर्शन झाले. 

थकलेल्या पायांची मालिश करून देणारे अब्दुल चाचा 
वाटचाल करून थकल्या-भागलेल्या वारकर्‍यांना नाना पेठेतील अब्दुल रजाक मालीश सेवा देतात. मुळचे हैदराबादचे असलेले अब्दुल चाचा फिजिओथेरपीचं काम करतात. तसेच सांधेदुखी, पॅरालिसिस असलेल्यांची ते मसाज करतात. ते स्वत: वनस्पतीपासून तेल बनवतात. हे तेल वापरुन ते वारकर्‍यांची सेवा म्हणून मोफत मसाज करतात. 

आवाज मराठीशी बोलताना अब्दुल रजाक म्हणाले, “मी गेल्या ३० वर्षांपासून वारकऱ्यांना ही निरपेक्ष सेवा देत आहे. जात-धर्म न पाहता वेदनेत असलेल्या वारकऱ्यांना मी मोफत सेवा देतो. माझा व्यवसाय मालिश करण्याचा असून त्यावरच माझी उपजीविका चालते. मात्र सेवा म्हणून मी हे कार्य करतो. जो पर्यंत मला शक्य होईल तोपर्यंत माझी सेवा सुरूच राहील.”
 

अल्ला देवे, अल्ला दिलावे  
अल्ला दारू (दाता) अल्ला खिला 

संत तुकाराम महाराजांनी रचलेल्या या अभंगाचा प्रत्यय रविवार पेठेतील रिझवानी मस्जिद परिसरात आला. वारकऱ्यांसाठी अन्नदानासारखे श्रेष्ठदान तेथील मुस्लीम समुदायाने केले. यावेळी बोलताना रिझवानी मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष अंजुम भाई म्हणाले, “हे अन्नदानाचे कार्य आम्ही गेल्या १२ वर्षांपासून करत आहोत. यावेळी आमच्या मनात हिंदू-मुस्लीम असा कोणताच भाव नसतो. पंढरपूरला जाणारे वारकरी आपलं घरदार सोडून पायी वारीला जातो त्यामुळे आम्ही थकलेल्या वारकऱ्यांची माणुसकीच्या भावनेने सेवा करतो. मी समाजाला एवढंच सांगू इच्छितो की संत तुकारामांनी एकतेचा संदेश दिला आहे तोच वारसा पुढे घेऊन जाऊ आणि सत्कर्म करत राहू.” 

सलोख्याची वारी पंढरीच्या वाटेवरी…
विविध संघटनांनी एकत्र येऊन सर्व धर्मीय ऐक्य दिंडी काढून एकतेचे जतन आणि परंपरा जोपासण्याचे काम केले. यावेळी साखळीपीर तालीमचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर यांनी एकता दिंडीचे महत्व सांगितले. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे सर्व जाती धर्मातील लोकांना मावळा या शब्दाने संबोधित करत एकत्र आणून स्वराज्य स्थापन केले, त्याचप्रमाणे आज जातीजातील तणाव नष्ट करून सर्वांना एकत्रित आणण्याच्या उद्देशाने आम्हाही  उपक्रम सुरु केला आहे.”  

आझम कॅम्पस गेल्या ४० वर्षांपासून सर्वधर्मीय साक्षरतेची तसेच अध्यात्मिक वारी जोपासत आहेत. विद्यापीठाच्या वतीने वारकऱ्यांकरिता पिण्याच्या पाण्याची सुविधा, आरोग्य शिबिरे, जंतुनाशक औषध फवारणी, स्वच्छता अशा प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहेत. 
 
 
याविषयी बोलताना शिक्षणमहर्षी पी.ए. इनामदार म्हणाले, “परंपरागत मार्गानेच मी आणि माझी पत्नी आबेदा इनामदार साथीदारांसह अध्यात्मिक वारीकरिता तितक्याच आपुलकीने गेली अनेक सेवा देत आहोत. सामाजिक एकोपा, बंधुभाव शिकविणारा पालखी सोहळा हा फक्त एका समाजाचा किंवा धर्माचा सोहळा नसून हा संपूर्ण भारतीयांचा भक्ती मेळावा आहे. रोजच्या धकाधकीचे जीवन विसरून भगवंतचरणी लीन होणारा हा वारकरी संप्रदाय. या अध्यात्मिक परंपरेतील विशाल चळवळीने संतांचे अभंगरुपी दाखले देत जनमानसाच्या मनावर संस्कार केले आहेत. त्यामुळे यांची सेवा करण्यात आम्ही आनंद मानतो”  

मानवसेवा हीच ईश्वरसेवा 
 
 
 
विठ्ठलभेटीच्या ओढीने कित्येक किलोमीटरचा पायी प्रवास करीत पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी युनानी सारख्या अनेक मुस्लीम संघटनांनी एकत्र येत मोफत आरोग्य तपासणी आणि गोळ्या-औषधे पुरवण्याचे काम केले. उपक्रमाविषयी बोलताना संयोजक उमर शेख म्हणाले, “गेल्या १० वर्षांपासून आम्ही आरोग्य शिबिराचा उपक्रम राबवत आहोत. सर्व धर्मामध्ये सेवा हे अत्यंत महत्वाचे कार्य सांगितले आहे. वारकरी पंथ आणि सुफी विचार हे एकाच आहेत, यात जातधर्म मानले जात नाहीत. हा पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहोचावा आणि आमच्या हातून अशीच सेवा घडावी हाच या उपक्रमामागचा उद्देश आहे.”
 
- भक्ती चाळक

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter