यंदा होळी आणि जुम्मा यांचा पवित्र संगम झाल्याने देशभरात धार्मिक सौहार्दाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी हिंदू-मुस्लिम बांधव सोबत होळी खेळतानाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. अशाप्रकारे एकीकडे एकतेचे दृश्य दिसत असताना मात्र, दुसरीकडे धर्माच्या नावाखाली काही विकृतांकडून हेटाळणी केली जात आहे.
सामाजिक सौहार्दाला तडा जाण्याच्या सध्याच्या या परिस्थितीत मात्र धुळेकरांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. 'तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद है, इन्सान बनेगा' अशा जयघोषात धुळ्यातील हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या.
धुळ्यातील हिंदू-मुस्लिम एकता व प्रेमाची महती सर्वत्र वाखाणली जाते. मात्र राज्यात घडत असलेल्या काही घटनांमुळे दोन्ही गटातील किरकोळ वादाने एकतेची ही ज्योत विझेल की काय, असे वाटत असतानाच येथील गुजर समाज व त्यांच्या श्रीमंत मोरया गणेश मित्र मंडळाने रमजान व होळीचे औचित्य साधून हिंदू-मुस्लिम एकता व प्रेमाची ज्योत पुन्हा प्रज्वलित करण्याचे काम केले आहे.
बंधुभाव वृद्धिंगत व्हावा
आलिम जियाउद्दीन मौलवी यांनी रमजानचे महत्त्व स्पष्ट करून हा बंधुभाव अधिकाधिक वृद्धिंगत व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर सागर पटेल म्हणाले, "सर्व धर्मात मानवता धर्म श्रेष्ठ असून, त्याचे पालन केल्यास सर्वत्र बंधुता निर्माण होईल." आरिफ पठाण यांनी आयोजन व संयोजकांचे कौतुक केले.
या उपक्रमामुळे दोन्ही धर्मियांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या मुस्लिम बांधवांचे पवित्र रमजानचे रोजे (उपवास) सुरू आहेत. तर हिंदू बांधवांचा धुळवडीचा सण नुकताच साजरा झाला आहे. या पार्श्वभूमीवर मोरया मंडळाने दोन्ही धर्मातील लोकांना गुजर गल्लीतील मशिदीजवळ एकत्र आणून इफ्तार पार्टीचे आयोजन केले. यावेळी हिंदू व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना सरबत देऊन शुभेच्छा दिल्याच परंतु संपूर्ण मानव जातीला एकतेचा संदेश देखील दिला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विकास संस्थेचे अध्यक्ष शामकांत गुजर हे होते. पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन, युवानेते राजेंद्र महाजन, प्रकाश गुजर, सुहानंद गुजर, पांडुरंग गुजर, आरिफ पठाण, मुत्रा पठाण, गोरख पाटील, सुनील बागूल, एल. बी. चौधरी, प्रमोद धनगर, पोलिस प्रतिनिधी विजय पाटील, उत्तम महाजन, रोशन जैन आदी मान्यवर उपस्थित होते.
या विशेष उपक्रमाचे संयोजन श्रीकांत गुजर, घनश्याम गुजर, संदीप गुजर, किरण गुजर, स्वप्निल गुजर, दीपक गुजर, उमेश गुजर, विकास गुजर, हर्षल गुजर, रोहित गुजर, निवा गुजर, अक्षय गुजर, शुभम गुजर, तेजस गुजर, अर्पण गुजर, मयूर गुजर, अतुल गुजर, विनोद गुजर, गौरव गुजर, भावेश गुजर, मंगेश गुजर, सोहम गुजर, अल्केश मुकर, वैभव गुजर, धनंजय गुजर, कुणाल गुजर, पिंटू गुजर, प्रथमेश गुजर, जय गुजर, मिलिंद गुजर आदी मान्यवरांनी केले.