हिंदू बांधवांची आहे या दर्ग्यावर निस्सीम श्रद्धा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

जळगावात सार्वजनिक गणेश मंडळ विसर्जन मिरवणुकीवर दरवर्षाप्रमाणे मुस्लिम बांधवांकडून भव्य पुष्पवृष्टी करण्यात येते. तर मिरवणुकीतील हिंदू बांधवांतर्फे आणि गणेश महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून पीर लालशहा बाबांच्या दर्ग्यावर चादर चढविण्यात येते. गणेश मंडळ कार्यकर्त्यांवर पुष्पवृष्टी करण्याची परंपरा जळगाव शहरातून सुरू होऊन हळूहळू संबंध महाराष्ट्रात पोहोचली आहे.  

भिलपुरा चौकातून शेवटचे मंडळ निघेपर्यंत सैय्यद नियाज अली फाउंडेशनचे कार्यकर्ते पदाधिकारी हजर असतात. शहरात १९७० मध्ये मोठी जातीय दंगल उसळली होती. या दंगलीच्या कटू आठवणी मिटवून शहरातील जातीय सलोखा कायम करण्यासाठी भिलपुरा परिसरात राहणारे तत्कालीन नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते सय्यद नियाज अली यांनी हिंदू - मुस्लिम बांधवांमध्ये एकोपा वाढवा, या उद्देशातून रथोत्सव आणि गणेशोत्सवात मुस्लिम बांधवांनी सहभागी होण्याची परंपरा सुरू केली.

या परिसरातून १९७० पासून जात असलेल्या रथावर मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी केली जाते. त्यानंतर याच मार्गावरून जाणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकीवर सुद्धा मुस्लिम बांधवांकडून भव्य अशी पुष्पवृष्टी केली जाते. तसेच आरती केली जाते. तर हिंदू बांधवांकडूनही या ठिकाणी हजरत पिरलाल शहा सरकार दर्ग्यावर चादर चढविली जाते.  

हिंदु-मुस्लिम बांधवांतर्फे दर्ग्यावर चादर
तब्बल ५३ वर्षांपासूनची परंपरा अद्यापही सुरू आहे. स्वर्गीय सैय्यद नियाज अली यांच्या पश्चात मुलगा सैय्यद अयाज अली याने धुरा समर्थपणे सांभाळली असून, दरवर्षी भिलपुरा चौकात गणेश मंडळ आल्यावर गणेशभक्तांवर पुष्पवर्षाव करण्यात येतो. तर हिंदू बांधवांच्या वतीने महामंडळाचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्या हस्ते हजरत पीर लाल शहा सरकार यांच्या दर्ग्यावर चादर चढविण्याची परंपरा अद्यापही सुरू असून, तसे नियोजन भिलपुरा चौकातील सय्यद नियाजअली फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

गुलालास राम-राम
विशेष म्हणजे जळगाव शहरातील मुख्य मिरवणुकीत गुलालाचा वापर करणे टाळण्यात येऊन पुष्प पाकळ्यांचा वापर करण्यात येतो. संपूर्ण मिरवणुकीत शहरातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या भिलपुरा चौकात मुस्लिम बांधवांकडून गणेश मंडळांवर होणारी पुष्पवृष्टी डोळ्याचे पारणे फेडणारी ठरते.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter