अविनाश कोल्हे
फाळणी होऊन दहा वर्ष झालेली आहेत. प्रौढ मतदानाचा अधिकार मिळालेल्या भारतीयांनी जात-धर्म-भाषा वगैरेंचा विचार न करता मतदान केलं. अशा वातावरणात 'हिंद १९५७'चं कथानक घडतं. दिग्दर्शक फिरोझ अब्बास खान यांना 'फेंसेस' नाटकात फाळणीनंतर भारतात राहिलेल्या गरीब मुसलमान कुटुंबाची समांतर कथा दिसली. त्यांनी त्याला भारतीय बाज चढवला आणि एक अंतर्मुख करणारं नाटक जन्माला आलं...
भारताला स्वातंत्र्य मिळालं; पण देशाची फाळणी होऊनच. २४ मार्च १९४० रोजी लाहोरमध्ये भरलेल्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनात 'स्वतंत्र पाकिस्तान 'ची मागणी करण्यात आली आणि १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तानची निर्मिती झाली. हिंदू-मुस्लिम या दोन भिन्न संस्कृती आहेत, भिन्न देश आहेत... ते कदापि एकत्र नांदू शकत नाहीत वगैरे प्रचार करून जिनासाहेबांनी पाकिस्तान प्रत्यक्षात आणला; मात्र त्यात भारतभर पसरलेल्या लाखो गावांतून अनेक शतकं एकत्र राहत असलेल्या सामान्य हिंदूंनी किंवा मुसलमानांनी काय करावं, याचं ठसठशीत उत्तर नव्हतं. असं असलं तरी पाकिस्तानातील हजारो हिंदूंनी भारतात स्थलांतर केलं. भारतातील हजारो मुसलमानांनीही पाकिस्तानात जाणं पसंत केलं; पण याचा अर्थ असा नव्हे, की पाकिस्ताननंतर एकही हिंदू उरला नाही किंवा भारतात एकही मुसलमान नाही.
२०२३ सालच्या जनगणनेनुसार पाकिस्तानात सुमारे बावन्न लाख हिंदू आहेत. २०२१ सालातील भारतातील आकडेवारीनुसार भारतात सुमारे वीस कोटी मुसलमान आहेत. हे सर्व तपशील आणि ही सर्व आकडेवारी देण्याचं कारण म्हणजे अलीकडेच मुंबईत मंचित झालेलं, विचार करायला लावणारं हिंदी नाटक 'हिंद १९५७ः त्यातील १९५७ सालचा उल्लेख फार महत्त्वाचा आहे. म्हणजे फाळणी होऊन दहा वर्ष झालेली आहेत. सर्वांना समान लेखणारी, सर्वांना समान संधी देणारी, प्रजासत्ताक भारताची राज्यघटना मान्य होऊन तब्बल सात वर्ष झालेली आहेत. प्रौढ मतदानाचा अधिकार मिळालेल्या भारतीयांनी जात-धर्म-भाषा वगैरेंचा विचार न करता निवडणुका लढवल्या, मतदान केलं. अशा वातावरणात 'हिंद १९५७'चं कथानक घडतं.
'हिंद १९५७' नाटकाची चर्चा करण्याअगोदर त्याची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. ऑगस्ट विल्सन (१९४५-२००५) या आफ्रिकन-अमेरिकन नाटककाराच्या 'फेंसेस' या नाटकावर ते आधारित आहे. विसाव्या शतकातील आफ्रिकन-अमेरिकन साहित्याच्या जगतात त्याचं नाव आदराने घेतलं जातं. काही अभ्यासक तर त्याला 'आफ्रिकन अमेरिकन थिएटरचे कवी' असंच म्हणतात. या समाजाचे अनुभव केंद्रस्थानी ठेवून त्याने दहा नाटकांची मालिका लिहिली आहे. या मालिकेला 'पिटसबर्ग सायकल' असंही म्हणतात. या मालिकेतील १९८७ साली आलेल्या 'फेंसेस' या नाटकाला आणि १९९० साली आलेल्या 'द पियानो लेसन्स' या नाटकाला त्या त्या वर्षीचे उत्तम नाटकाचे पुलित्झर पुरस्कार मिळाले होते. त्यातील 'फेंसेस 'वर आधारित 'हिंद १९५७'चे प्रयोग अलीकडेच मुंबईत झाले.
ऑगस्टचं बालपण पेनसिल्वेनिया राज्यातल्या पिटसबर्ग गावात अतिशय गरिबीत गेलं. त्याच्या अनुभवविश्वात या गावाला महत्त्वाचं स्थान आहे. त्याची आई घरकाम करीत असे. त्याच्या आजूबाजूला त्याच्यासारखेच हलाखीत जगणारे लोक होते. वयाच्या सोळाव्या वर्षापासून त्याला पडेल ते काम करून जगावं लागलं. गरिबी एवढी, की त्याला कधी बारमध्ये, तर कधी पानाच्या टपरीच्या बाजूला बसून लिहावं लागलं. त्याच्या १९८२ साली आलेल्या 'जिटनी' नाटकाने त्याला नाव मिळवून दिलं. १९८५ साली आलेल्या त्याच्या 'फेंसेस' नाटकात १९५० आणि १९६०च्या दशकांतील अमेरिकेतील आफ्रिकन-अमेरिकन समाजाचं चित्रण करण्यात आलं आहे. 'पिटसबर्ग सायकल' मालिकेतील हे सहावं नाटक. 'फेंसेस 'मध्ये त्या काळातल्या आफ्रिकन-अमेरिकन समाजाला गरिबीचा, वांशिक अत्याचारांचा कसा सामना करावा लागत होता, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. 'हिंद १९५७'चे दिग्दर्शक फिरोझ अब्बास खान यांना 'फेंसेस 'मध्ये फाळणीनंतर भारतात राहिलेल्या गरीब मुसलमान कुटुंबाची समांतर कथा दिसली.
त्यांनी विकास बाहिरीच्या मदतीने 'फेंसेस 'ला भारतीय बाज चढवला आणि एका दर्जेदार, अंतर्मुख करणाऱ्या नाटकाची निर्मिती केली. 'हिंद १९५७'मध्ये पन्नाशीला आलेला तबरेझ अन्सारी बिडीच्या कारखान्यातला कामगार आहे. त्याचा थोडा वेडसर भाऊ गुल्लेर आहे. तबरेझला पहिल्या पत्नीपासून झालेला आता तिशीला आलेला मुलगा लतीफ आहे. दुसरी पत्नी जानकी आहे. तिच्यापासून झालेला अठरा वर्षांचा मुलगा आहे. त्याचा अनेक वर्षांचा हिंदू शेजारी आहे. या पात्रांतून फिरोझ खान आणि बाहिरींनी दोन अंकी जबरदस्त हिंदी नाटक सादर केलं आहे.
सुरुवातीला पाकिस्तानात न जाता भारतात राहिलेल्या तबरेझला अलीकडे मात्र पाकिस्तानात न जाता भारतात राहिल्याचा पश्चात्ताप होत आहे. याचं साधं कारण म्हणजे पोलिसांना संशय असतो, की तो पाकिस्तानसाठी हेरगिरी करीत आहे. म्हणूनच तबरेझला अनेकदा चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावलं जातं. तेच तेच प्रश्न विचारून वैताग दिला जातो. त्यामुळे तबरेझ कधी त्याच्या हिंदू मित्राजवळ; तर कधी पत्नीजवळ सरकारला शिव्या देतो. म्हणूनच तो धाकट्या मुलाच्या मागे 'हॉकी खेळण्यापेक्षा आणि भारतीय सैन्यात जाण्याची स्वप्नं बघण्यापेक्षा छोटी-मोठी नोकरी कर' असा तगादा लावतो. त्याच्या मते आता भारतात मुसलमानांना समान संधी मिळणार नाही. त्यांची प्रगती होणार नाही. त्यांना सैन्यातसुद्धा भरती होता येणार नाही. हे या नाटकाचं महत्त्वाचं सूत्रं आहे, मध्यवर्ती नाही...
भारतात राहिलेल्या मुसलमान समाजावर होणारे अन्याय हे नाटकाचं मध्यवर्ती सूत्र आहे, असं वाटत असताना तबरेझ पत्नी जानकीला सांगतो, की त्याच्याही नकळत तो त्याच्या कंपनीत काम करणाऱ्या एका मुस्लिम बाईच्या प्रेमात पडला. त्याने तिच्याशी काही महिन्यांपूर्वी लग्न केलं आहे आणि आता त्या बाईला त्याच्यापासून दिवस गेले आहेत. हे ऐकल्यावर जानकीइतकेच प्रेक्षकसुद्धा हादरतात. आतापर्यंतच्या नाटकात तबरेझ एक चांगला शायर, आजकाल पोलिसांच्या कटकटीमुळे चिडचिड जरी करीत असला तरी मुळात एक चांगला माणूस, अशी प्रेक्षकांच्या मनात प्रतिमा तयार होते. त्याला छेद जातो. धाकटा मुलगासुद्धा वडिलांचं न ऐकता हॉकी खेळत राहतो आणि एक दिवस पळून जाऊन सैन्यात भरती होतो.
मोठा मुलगा, तबरेझची दुसरी पत्नी जानकी त्याच्याशी कामापुरतंच बोलतात. बघता बघता तबरेझ त्याच्याच घरात एकटा पडतो. अशात त्याची तिसरी पत्नी बाळंत होते आणि एका मुलीला जन्म देऊन मरते. पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा वाढवलेली जानकी आता या मुलीला वाढवायला सज्ज होते. एक दिवस तबरेझला हृदयविकाराचा तीव्र झटका येतो आणि त्यात त्याचा मृत्यू होतो. तोपर्यंत त्याच्या मागचा पोलिसांचा ससेमिरा संपलेला असतो. धाकटा मुलगा सैन्यात जातो, हॉकी खेळतो वगैरे सुख बघणं तबरेझच्या नशिबी नसतं. त्याच्या मृत्यूला मात्र अक्षरशः शेकडो लोक येतात. सैन्यातून सुट्टीवर आलेल्या धाकट्या मुलाच्या मनात वडिलांबद्दल जुना राग असल्यामुळे तो सुरुवातीला त्यांचे अंतिम विधी करण्यासाठी दफनभूमीत जाण्यास तयार नसतो. त्याची आई त्याला समजून सांगते आणि मग तो तयार होतो... येथे हे बरीच उपकथानकं असलेलं नाटक संपतं.
दिग्दर्शक फिरोझने या नाटकासाठी नट आणि बॅकस्टेज कलाकारांचा संच गोळ केला आहे. सचिन खेडेकर (तबरेझ अन्सारी), सोनल झा (जानकी) या दोघांनी महत्त्वाच्या पात्रांत जान ओतली आहे. त्यांना दाधी पांडे, अंकित, रवी चहर, एनके पंत यांनी यथोचित साथ दिली आहे. मनीष सप्पेल यांचं जबरदस्त नेपथ्य आणि वेशभूषा लक्षवेधक आहे. खासकरून ती मोडलेली भिंत अनेक प्रसंगांत अबोलपणे काही तरी सांगते. अमोघ फडके (प्रकाशयोजना), पीयूष कनोजिया (संगीत) वगैरेंच्या कामगिरीमुळे नाटकाचा परिणाम खोलवर होतो. या नाटकात फिरोझने अभिषेक शुक्लांच्या काही कवितांचा यथोचित वापर केला आहे. नाटकाची निर्मिती प्लॅटफॉर्म थिएटर कंपनीने केली होती. मला हे नाटक बघताना १९७३ साली आलेला हिंदी चित्रपट 'गर्म हवा' अनेकदा आठवत होता. 'गर्म हवा 'त बलराज सहानींनी सादर केलेला मिर्झा आणि 'हिंद १९५७'मधील तबरेझ या दोघांना सहन कराव्या लागलेल्या कोंड कमालीचं साम्य आहे. अशी नाटकं अनेक मोहन, अनेक वर्ष लक्षात राहतात.
(लेखक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कलासंस्कृतीच्या घडामोडींचे अभ्यासक, राज्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आणि कादंबरीकार आहेत.)