गणरायाचे दर्शन घेण्यासाठी आणि देखावे पाहण्यासाठी मध्य पुण्यात आलेल्या भक्तांच्या गर्दीने रविवारी उच्चांक गाठला, रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत दर्शनासाठी आलेल्या नागरिकांमुळे या भागात भक्तांचा महापूर लोटला होता. यामुळे रात्री उशिरापर्यंत सगळेच रस्ते भाविकांनी तुडुंब भरले होते. गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी (ता. १७) होणार आहे. देखावे पाहण्यासाठी अवघे दोन दिवस उरल्याने आणि त्यातच रविवार मिळाल्याने अनेकांनी मध्य पुण्यात धाव घेतली. यात पुणेकरांसह उपनगरे आणि जिल्ह्यातील नागरिकांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश होता.
पावसाने विश्रांती घेतल्याने साऱ्यांच्याच उत्साहाला उधाण आले होते. सकाळपासूनच या गर्दीला सुरुवात झाली. सायंकाळी गर्दनि उच्चांक गाठला. अनेकांनी तर रात्री उशिरापर्यंत जागून गणरायाचे दर्शन घेतले. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी शहरातील महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांनी मेट्रो, बस यासारख्या सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर केला. दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर आलेल्या नागरिकांनी नदीपात्रासह जयंतराव टिळक पूल येथे आपल्या वाहनांचे पार्किंग केले होते. तेथून पायी चालत भक्तांनी छत्रपती शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, सदाशिव पेठ आदी परिसरातील देखावे पाहिले. मानाच्या गणपतींसह विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींसमोर थांबून हा जनसागर आपल्या डोळ्यांत गणरायाचे लोभस रूप साठवून घेत होता. हेच रूप आणि नानाविध मनोहारी देखावे आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठीही अनेकांची धडपड सुरू होती. गणपती पाहून झाल्यानंतर पोटातील भूक शमविण्यासाठी साऱ्यांची पावले उपहारगृहांकडे वळली.
गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने देखावे बंद करण्याची वेळ
गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी शनिवारी (ता. १४) रात्री झालेल्या तुटुंब गर्दीमुळे धक्काबुक्कीच्या घटना घडल्या. अक्षरशः चेंगराचेंगरीसदृश स्थिती निर्माण झाली. यामुळे वृद्ध, महिला आणि लहान मुलांना सर्वाधिक फटका बसला. गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने काही मंडळांनी थेट देखावे बंद करण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, महात्मा फुले मंडई, तुळशीबाग, शनिपार चौक, कुमठेकर रस्ता आणि शनिवारवाडा परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. साईनाथ मंडळ ट्रस्टच्या कार्यकत्यांनी गर्दीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. साईनाथ मंडळाने आपला देखावा तासभर बंद केला. कुमठेकर रस्त्यावर राजाराम मंडळाच्या देखाव्यांच्या ठिकाणीही गर्दा अक्षरशः नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे या मंडळानेही मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास काही वेळासाठी देखावा बंद केला.
साईनाथ मंडळ ट्रस्टचे पीयूष शहा म्हणतात, "शनिवारी रात्री अक्षरशः चेंगराचेंगरीसारखी स्थिती होती. महिला, लहान मुलांना आम्ही बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविले. काही ज्येष्ठ नागरिक चक्कर येऊन पडले. गर्दीवर नियंत्रण न ठेवल्यास मोठी दुर्घटना घडू शकते."
राजाराम मित्र मंडळाचे युवराज निंबाळकर म्हणतात, "गणेशोत्सवासाठी प्रमाणापेक्षा जास्त गर्दी झाली.गर्दीमुळे गोंधळ वाढत्याने आम्हीही मध्यरात्री देखावा काहीवेळ बंद ठेवला होता गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत."
गर्दीवर नियंत्रण ठेवणे अशक्य
गणपती पाहण्यासाठी आलेल्या भक्तांची संख्या सायंकाळनंतर प्रचंड प्रमाणात वाढत गेल्याने काही काळ गर्दी नियंत्रणाबाहेर गेली होती. पोलिस, स्वयंसेवक आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांनाही गर्दीवर नियंत्रण ठेवणे अशक्य झाले होते. त्यातच चौकाचौकात काही ढोल-ताशा पथकांचे स्थिर वादन सुरू असल्याने गर्दीत भरच पडत होती. यामुळे मध्य भागातील कोणत्याही रस्त्यावरून अगदी पायी चालणेही कठीण झाले होते.
सर्वांचीच दमछाक