प्रसिद्ध मुस्लिम सूफी संत हजरत निजामुद्दीन औलिया यांच्या पाच दिवसीय उरूसाला नुकतीच सुरुवात झाली आहे. या दर्ग्याचा उरूस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सुफी संत या दिवशी ईश्वराशी तादात्म्य पावतो अशी श्रद्धा असल्यामुळे सुफी संतांची पुण्यतिथी साजरी केली जाते.
उरुस म्हणजे काय
सुफी संतांच्या पुण्यतिथी दिनी उरुसाचे आयोजन केले जाते. संतांच्या अनुयायांसाठी त्यांच्या शिकवणींवर चिंतन करण्याची आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्याची ही एक संधी असते. ‘उर्स’ हा अरबी शब्द आहे ज्याचा एक अर्थ ‘लग्न’ असा होतो. सुफी संप्रदायांमध्ये असे मानले जाते की सुफी संतांचा मृत्यू हे देवासोबतच्या त्यांच्या मिलनाचे प्रतीक आहे. त्यामुळे उरूस हा सणासारखा साजरा केला जातो.
हजरत निजामुद्दीन औलिया यांच्या उरूस सोहळ्यादरम्यान देशभरातून हजारो अनुयायी आणि भाविक त्यांच्या दर्ग्यात पोहोचतात. यावेळी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये हम्द (ईश्वराची प्रार्थना) आणि कव्वाली सारखे कार्यक्रम राबविले जातात. हा उरूस दरवर्षी हजरत निजामुद्दीन दर्ग्याच्या परिसरात थाटामाटात साजरा केला जातो. ज्यामध्ये समाजातील सर्वच लोक सहभागी होतात. हा प्रसंग धार्मिक सौहार्दाचे आणि सांस्कृतिक विविधतेचे प्रतीक मानला जातो.
संत हजरत निजामुद्दीन औलिया यांच्याविषयी...
हजरत निजामुद्दीन औलिया यांचा जन्म १२३८ मध्ये उत्तर प्रदेशातील बदाऊन येथे झाला. ते चिश्ती पंथाचे प्रमुख सूफी संत होते. हजरत निजामुद्दीन यांनी आपले जीवन धार्मिक सलोखा, प्रेम आणि मानवतेची सेवा यासाठी समर्पित केले. दिल्लीत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी चिश्ती पंथाचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
हजरत निजामुद्दीन औलिया यांनी नेहमीच सर्व धर्म आणि समाजाच्या लोकांनी प्रेम आणि परस्पर आदराने जीवन जगले पाहिजे असा उपदेश केला. समाजातील धार्मिक आणि सांस्कृतिक विषमता संपवण्यासाठी त्यांनी लोकांना प्रेम आणि एकतेचा संदेश दिला. त्यांचे सर्वात प्रसिद्ध शिष्य अमीर खुसरो हे होते. ज्यांनी संगीत, कविता आणि साहित्य क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे. अमीर खुसरो यांच्या व्यतिरिक्त, हजरत नसीरुद्दीन महमूद, चिराग देहलवी यांच्यासह अनेकजण त्यांचे अनुयायी बनले.
हजरत निजामुद्दीन औलिया यांच्या उरुसाविषयी शुभेच्छा देताना काय म्हणाले नरेंद्र मोदी
हजरत निजामुद्दीन औलिया यांच्या ७२१ व्या यौम-ए-वफत (पुण्यतिथी) निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निजामुद्दीन औलिया यांच्या अनुयायांना शुभेच्छा दिल्या आहेत. निजामुद्दीन औलिया यांचे विचार आणि आदर्श प्रेरणास्त्रोत असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी आपल्या संदेशात म्हणाले, “हजरत निजामुद्दीन यांचा उरूस म्हणजे त्यांच्या अनुयायांसाठी एक सुवर्णसंधी आहे हजरत निजामुद्दीन यांच्या जीवन संदेशावर चिंतन करण्याची. हजरत निजामुद्दीन यांचे जीवन आजही प्रेरणास्थान आहे आणि त्यांची शिकवण शतकानुशतके समाजाला दिशा देत आहे.”
सुफी संतांच्या आध्यात्मिक शिकवणी
आपल्या संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुफी संतांनी दिलेल्या आध्यात्मिक वारशाचे महत्व सांगितले आहे. हजरत निजामुद्दीन औलिया यांच्या योगदानाबद्दल बोलताना ते म्हणाले की, “हजरत निजामुद्दीन यांच्या शिकवणीने समाजात एकता, शांतता आणि बंधुता वाढीस लागली.”
सुफी संतांच्या शिकवणींबद्दल बोलताना मोदी म्हणतात, “सखोल अध्यात्मिक ज्ञान आणि विचारांनी समृद्ध असलेल्या, सुफी संतांच्या शिकवणींनी विविध धर्म आणि विचारसरणीच्या लोकांमध्ये समन्वय साधण्याचे काम केले आहे. त्यांच्या शिकवणी आणि त्यांचे कार्य आपल्याला मानवी मूल्ये जोपासण्यासाठी आणि समरसतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देत आहेत.”
पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, “हजरत निजामुद्दीन औलिया यांनी आयुष्यभर सामाजिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडून मानवतेची सेवा केली आहे. त्यांचे हे महान कार्य पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांच्या जीवनातील प्रत्येक पैलू मग ते संगीत असो, साहित्य असो किंवा तत्वज्ञान - आजही तरुण पिढीला मार्गदर्शन देणारे आहे.”
हजरत निजामुद्दीन औलिया यांची शिकवण
सुफी संत हजरत निजामुद्दीन औलिया यांच्या जीवनाचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, “हजरत निजामुद्दीन यांची शिकवण आजच्या काळात आणि पुढच्या पिढीसाठी आदर्श आहे. त्यांचे संपूर्ण जीवन हे समर्पण आणि सेवेचे प्रतीक आहे. त्यांनी जातीधर्माच्या सीमा ओलांडून समाजाला मानवता, प्रेम, एकता आणि शांतीचा धडा शिकवला.”
पुढे ते म्हणाले, “हजरत निजामुद्दीन औलिया यांनी जगलेले जीवन आणि त्यांनी मांडलेली मूल्ये भावी पिढ्यांना सर्वसमावेशक आणि एकसंध समाज निर्माण करण्यासाठी प्रेरणा देत राहतील.” हजरत निजामुद्दीन औलिया यांच्या जीवनाचे आणि संदेशाचे महत्त्व अधोरेखित करून पंतप्रधान म्हणाले की, "त्यांची शिकवण केवळ त्यांच्या अनुयायांसाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणास्त्रोत आहे."
हजरत निजामुद्दीन औलिया यांच्या प्रेरणादायी कार्याविषयी विषयी बोलताना मोदी म्हणतात, "हजरत निजामुद्दीन औलिया यांनी त्यांच्या काळात धार्मिक सलोखा, प्रेम आणि करुणा या तत्त्वांचे पालन केले आणि म्हणूनच त्यांच्या शिकवणी आजही आपल्या समाजात रुजलेल्या आहेत. त्यांच्या जीवनातील ही मूल्ये आपल्याला सर्वसमावेशक समाज आणि राष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रेरणा देत राहतील.”
निजामुद्दीन औलिया यांची सामाजिक शिकवण
हजरत निजामुद्दीन औलिया यांचे जीवन आणि त्यांची शिकवण आजही समाजासाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यांच्या शिकवणुकीमुळे त्यांच्या काळात धार्मिक आणि सामाजिक विषमता दूर होण्यास मदत झालीच परंतु, आजही त्यांचे विचार आणि तत्त्वे समाजात शांतता, सौहार्द आणि प्रेमाचा संदेश देतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेषतः त्यांच्या जीवनातील हा पैलू प्रकाशझोतात आणत सांगितले की, हजरत निजामुद्दीन यांच्या शिकवणी भविष्यातही समाजाला चांगली दिशा देत राहतील. अशा प्रकारे हजरत निजामुद्दीन औलिया यांचा ७२१ वा उरूस हा केवळ त्यांच्या अनुयायांसाठीच नाही तर समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांच्या जीवनावर आणि शिकावाणींवर विचार करण्याचा एक महत्त्वाचा दिवस आहे.