महाराष्ट्रभरात ‘अशी’ साजरी झाली बकरी ईद

Story by  Pradnya Shinde | Published by  Pradnya Shinde • 8 d ago
बकरी ईद
बकरी ईद

 

काही दिवसांपूर्वीच देशभरात बकरी ईद अर्थात 'ईद-उल-अजहा' आनंदात, उत्साहात आणि शांततेत पार पडली. महाराष्ट्रातही ईदनिमित्त आनंदाचे वातावरण होते. ईदच्या पूर्वसंध्येला पोलिसांकडून विशेष तयारी करण्यात आली होती; तर प्रशासनाने ईदगाह परिसरात स्वच्छता केल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात कशी साजरी झाली ईद जाणून घेऊया सविस्तर…  
 

नाशिकमध्ये कडोकोट पोलिस बंदोबस्तात बकरी ईद साजरी 

बकरी ईदनिमित्त शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडोकोट पोलिस बंदोबस्त होता. रविवारी (ता. १६) रात्री नऊ वाजेपासून आयुक्तालय हद्दीतील पोलिसठाणेनिहाय सशस्त्र पोलीस गस्त सुरू होती, तर सोमवारी (ता. १७) पहाटेपासून दर्गा, मशिद या धर्मस्थळांभोवती पोलिसांचा खडा पहारा होता. दरम्यान, शहरातील संवेदनशिल ठिकाणी पोलिसांचा खडा पहारा दिवसभर होता.


पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण व परिमंडळ दोनमध्ये उपायुक्त मोनिका राऊत यांच्या नेतृत्वाखाली पोलिस ठाणेनिहाय चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. त्र्यंबक नाका सिग्नलजवळील ईदगाह मैदान येथे सकाळी दहा वाजता मुस्लिम बांधवांनी सामुहिक नमाजपठण केले. त्यावेळी शहर-ए-खतीब हाफिज हिस्सामुद्दीन अशरफी यांसह मुस्लिम धर्मगुरुंचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गुलाबपुष्प देत स्वागत करुन ईदच्या शुभेच्छा दिल्या.

नमाजपठणावेळी वाहतूक मार्गात बदल केल्याने त्र्यंबकरोड, शरणपूररोड, गडकरी चौक रस्त्यावर दुपारी अकरापर्यंत वाहतुकीवर ताण आला मात्र नियुक्तीवर असलेल्या वाहतूक अंमलदारांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. रात्री साडेअकरापर्यंत पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांचा सशस्त्र पहारा कायम होता. दरम्यान, कोणताही अनूचित प्रकार घडल्याची नोंद आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाकडे झालेली नाही. 

असा होता बंदोबस्त
आयुक्तालय हद्दीत दोन पोलिस उपायुक्त, सहा सहायक आयुक्तांसह २७ पोलिस निरीक्षक, ५४ सहायक व उपनिरीक्षक, ७०० पोलिस अंमलदार व ६०० होमगार्ड यासह दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथकांचा अतिरिक्त बंदोबस्त दिवसभर सज्ज होता. गुन्हे शाखेची तीन पथके, विशेष पथक आणि गोपनीय विभागांच्या अंमलदारांनीही दर्गा, मशिदी व धार्मिक स्थळांभोवती गस्त घालून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.

बॅरकेडिंगसह खडा पहारा
भद्रकाली हद्दीत २१ मशीद, मुंबई नाका हद्दीत १३, आडगाव, सरकारवाडा व गंगापूर हद्दीमध्ये प्रत्येकी दोन, म्हसरुळ व सातपूर हद्दीमध्ये एक, अंबड हद्दीत पाच, इंदिरानगर हद्दीत दहा, नाशिकरोड व उपनगर हद्दीमध्ये प्रत्येकी ११, तर देवळाली कॅम्पमध्ये ७ मशीदी आहेत. या मशिदींसह दर्गांजवळ बॅरिकेडिंग करून पोलिसांचा सोमवारी (ता. १७) दिवसभर खडा पहारा होता.
 

हलकर्णीत ईदगाह मैदानावर मुस्‍लिम बांधवांनी बकरी ईदनिमित्त नमाज पठण केले


 कोल्हापूरमधील हलकर्णी शहर परिसरासह तालुक्यात मुस्‍लिम बांधवानी ‘ईद ऊल अजहा’(बकरी ईद) पारंपरिक उत्साहात साजरी केली. सकाळी ईदगाह मैदानावर नमाज पठण झाले. यावेळी विश्वशांतीसह पावसाच्या आगमनासाठी प्रार्थना केली. नमाज पठाणानंतर शुभेच्छा दिल्या.

पहाटेपासूनच मुस्लिम बांधवांच्या घरोघरी ईदची लगबग सुरू झाली. सकाळी आठ वाजल्यापासून ईदच्या पवित्र नमाजसाठी सर्वांचे पाय येथील जुम्मा मस्जिदकडे वळत होते. पावसाची शक्यता लक्षात घेऊन यंदा नमाज पठण ईदगाह मैदानाऐवजी जुम्मा मस्जिदमध्ये दोन टप्प्यांत केले. कमी जागेमुळे सकाळी साडेआठ आणि नऊ वाजता अशी दोनदा नमाज झाली. संकेश्र्वर मार्गावरील मस्जिदमध्ये नमाज पठणासाठी गर्दी झाली होती. मौलाना मेहमूद रजा व नदीम शेख यांनी नमाज आणि खुतबा पठण केले. मानवी मूल्यांचे जतन, मानव जातीचे कल्याण याचे प्रवचन झाले. विश्वशांती आणि पावसासाठी प्रार्थना केली. नमाजनंतर उपस्थितांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांनीही उपस्थित मुस्‍लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. रफिक पटेल यांनी आभार मानले. शहरासह ऐनापूर, महागाव, नेसरी, कडगाव, भडगावसह तालुक्यात ईद उत्साहात साजरी केली.

शिरोळ शहर व परिसरात उत्साहात साजरी झाली  ईद


यानिमित्त सर्वधर्मीय बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. हाफीज अमिर शेख, हाफीज इलियास बागसर यांनी नमाज पठण करून विश्‍वशांतीसाठी प्रार्थना केली. ईदगाह मैदान परिसर सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केलेले भाजपचे शिरोळ तालुकाध्यक्ष मुकुंद ऊर्फ बाळासाहेब गावडे व काशीम ऊर्फ पिंटू शेख यांचे व निधी दिल्याबद्दल खासदार धैर्यशील माने यांचे अभिनंदन केले. 

यावेळी शिरोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, पृथ्वीराजसिंह यादव, आदींनी शुभेच्छा दिल्या. मुस्लिम समाजाचे अध्यक्ष सिकंदर बागसार, कचेरी येथील मुस्लिम मस्‍जिदचे अध्यक्ष अस्लम शेख आदी उपस्थित होते.

आजरा शहरासह तालुक्यातील विविध गावांत मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या


पावसाची उघडीप राहिल्याने सकाळी नऊ वाजता मैदानावर नमाज पठण केले. मौलाना अब्दुल रहेमान काकतीकर यांनी खुतबा पठण तर हाफीज अब्दुल रहेमान कांडगांवकर यांनी नमाज पठण केले. त्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या. साळगाव, उत्तूर, बहिरेवाडी, हरपवडे येथेही ईद उत्साहात साजरी केली. ईदगाह स्थळी गडहिंग्लजचे उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले यांनी भेट दिली. सहायक पोलिस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला होता.

कुंभोज परिसरात  ईद-उल-अजहा उत्‍साहात साजरी 


कुंभोज परिसरात मुस्लिमांनी सकाळी ईदगाह मैदानावर सामूहिक ईदची नमाज पठण केली. मौला‍ना मोहिसीन सुतार यांनी खुतबा पठण केले. मौला‍ना महेबूब मुजावर यांनी नमाज पठण केली. विश्‍वशांतीसाठी दुवा केली. दीपक चौकातील कब्रस्‍तानात फातेहा पठण केले.

पोलिस बंदोबस्तासह कुरुंदवाड शहर व परिसरातील बकरी ईदची नमाज पठण 


कुरुंदवाड शहर व परिसरातील इदगाह मैदानावर गावकऱ्यांनी ईदची नमाज अदा केली. येथे मौलवी-मुफ्ती फिरोज गोदड यांनी नमाज व खुदबा पठण करत प्रार्थना केली. ईदगाह मैदान येथे बहुजन समाजबांधवांनी गळाभेट घेऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष इकबाल पटवेगार यांनी मनोगत व्यक्त केले. 

ईदगाह मैदानाबाहेर माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, दादासाहेब पाटील, अक्षय आलासे, दीपक गायकवाड, आदींनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. कुर्बानी असणाऱ्‍या भागांमध्ये पालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून घंटागाड्या लावल्या होत्या. नागरिकांना पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी पाणी पुरवठा विभागाने पाण्याच्या टँकरची यंत्रणा सज्ज ठेवली होती. कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांनी कुरुंदवाडसह औरवाड, गौरवाड, दत्तवाड, बस्तवाड, गणेशवाडी, आलास, आदी ठिकाणी गृहरक्षक दलासह पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

पारंपरिक पद्धतीने कागल शहर आणि परिसरात ईद साजरी 


कागल शहर आणि परिसरात बकरी ईद पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ईदनिमित्त शहरातील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आले. नमाज पठण करण्यासाठी कागल शहरासह पंचक्रोशीतील मुस्लिम बांधव सकाळी शहरातील ईदगाह मैदानावर उपस्थित होते. यावेळी सामूहिक नमाज पठण करण्यात आले. 

यावेळी पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पुष्पगुच्छ देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि नगरपरिषदेच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ, निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ यांना पुष्पगुच्छ देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच नमाज पठणासाठी आलेल्या सर्वच मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.

पुण्यात उत्साहात अन् शांततेत बकरी ईद साजरी 


पुणे शहरात बकरी ईद (ईद-उल-अज्हा) सोमवारी उत्साहात अन् शांततेत साजरी करण्यात आली. गोळीबार मैदान येथील ईदगाह येथे सकाळी ९ वाजता सामूदायिक नमाज पठण करण्यात आले. मौलाना निजामु‌द्दीन यांनी नमाज पठण करून घेतले. त्यानंतर समाजबांधवांनी एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी साधारण ५० हजार मुस्लीम बांधवांनी ईदच्या नमाजाचे पठण केले. त्यानंतर हजच्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच देशाच्या सुख-शांती व समृद्धीसाठी उपस्थितांनी प्रार्थना केली. राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना, ईदगाह ट्रस्ट, पुणे महापालिका व पोलिस आयुक्त कार्यालयाच्या वतीने ईद मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस उपयुक्त स्मार्तना पाटील होत्या. या वेळी सादिक लुकडे, ताहेर आसी, जैनुल काझी, रफिक शेख आदी उपस्थित होते.

नमाजस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरात विविध संस्था व संघटनांतर्फे बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. भाजप प्रवक्ते आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सल्लागार अली दारूवाला यांच्या हस्ते गुलाबपुष्प वाटप करण्यात आले. इदगाह ट्रस्टच्या गोळीबार मैदानावर आयोजित कार्यक्रमात गुलाबपुष्प वाटप करून उपस्थित मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या.अत्तराचा सुगंध, पारंपारिक वेशभूषा आणि अल्लाहचे नामस्मरण अशा वातावरणात ईदगाह मैदान आणि मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण करत मुस्लिम बांधवांनी बकरी ईद उत्साहात साजरी केली. अल्लाहप्रती निष्ठा, त्याग, समर्पण, सामाजिक सलोखा व मानवतेचा संदेश मौलवींनी दिला. सर्वत्र बंधुभाव व शांतता नांदावी यासाठी विशेष दुवा करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहरात बकरी ईद साजरी 


पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी सकाळी ७ ते ९ च्यावेळेत विविध मशिदीत, ईदगाह मैदानात बकरी ईदची नमाज झाली. विशेषतः ईदगाह मैदानाचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा देण्यात आल्या. निगडी, चिंचवड, आकुर्डी, चिखली, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, पिंपरी, भोसरी, घरकुल, काळेवाडी, नेहरूनगर, कासारवाडी, दापोडी, जुनी सांगवी, पिंपळे गुरव, वाकड, रावेत आदी परिसरातही ईद उत्साहात साजरी झाली. 

धर्मगुरू मुफ्ती, मौलाना, हाफीज साहब यांनी मुस्लिम बांधवांना त्याग व बलिदानाची माहिती विशद केली. नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी ‘कुर्बानी’ दिली. नातेवाईक व मित्रमंडळींना स्नेहभोजनाचे निमंत्रण दिलेले होते. मुस्लिम बांधवांनी गोरगरीब तसेच नातेवाईक, मित्रांच्या घरी जाऊन ‘कुर्बानी’चा प्रसाद दिला.चिंचवडगावातील आलमगीर शाही मशिदीत मौल्लाना मिनहाज असरफी, मौल्लाना इनामुल हक यांनी तर चिंचवड स्टेशन येथील मजीद- ए अम्मारमध्ये हाफीज मौन्नुद्दीन, मोहननगरमध्ये मजीद- ए - हिदायतुल मुस्लमीन येथे हाफीज वसीम साहब, विद्यानगरमध्ये मजीद- ए - अक्सा येथे मौल्लाना इम्रान मोन्नुद्दीन, आकुर्डीमधील मजीद- ए - मदिनामध्ये मुफ्ती अबिद साहब यांनी नमाज पढविला. यावेळी धर्मगुरू मुफ्ती, मौल्लाना, हाफीज साहब यांनी कोणाचाही द्वेष करू नका, एकात्मता व बंधुत्वाची कास अंगीकारून एकत्रित आपली दिनचर्या पार पाडण्याचा संदेश दिला. त्यानंतर, ईदगाह मैदानात असलेल्या कबरीवर मुस्लिम बांधवांनी कुटुंबातील मृत पूर्वजांच्या कबरीजवळ पुष्प ठेवून त्यांचे स्मरण केले.

भोसरीतही बकरी ईद उत्साहात


भोसरीतील गव्हाणे वस्ती येथील अंजुमन सैफुल इस्लाम जामा मशिदीद्वारे ईदगाह मैदानावर नमाज पठणाची सोय करण्यात आली होती. मौलाना अब्दुल लहेत यांनी नमाज पठण केले. या नमाज पठणात दीड हजार मुस्लिम बांधव सहभागी झाले. गवळीनगरमधील जामा मशिदीमध्ये मौलाना अब्दुल सत्तार यांनी नमाज पठण केले. नमाज पठणात दीड हजार मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी करीम सय्यद, राजू मुलाणी, सरदार शेख, शब्बीर शेख, रमजान अब्दुल, बबलू शेख, मोहसीन मुल्ला, महमुद मुंढे, सलीम शेख, इम्रान मुजावर आदी उपस्थित होते. सर्व धर्मियांसाठी मशिदीत शांततेची प्रार्थना करण्यात आली. त्याचप्रमाणे यावर्षी मुबलक पाऊस पडावा, यासाठीही प्रार्थना करण्यात आली. वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाद्वारे सर्व नागरिकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

आळेफाटा परिसरात सामूहिक नमाज पठन करून, बकरी ईद उत्साहात


आळेफाटा  परिसरातील राजुरी, आळे, वडगाव आनंद,कांदळी आदी गावांत सामूहिक नमाज पठन करून, बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी राजुरी येथील मदिना मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी सभापती दीपक औटी, सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक कुंडलिक हाडवळे, एम.डी.घंगाळे, वल्लभ शेळके, एकनाथ शिंदे, चंद्रकांत जाधव, दिलीप घंगाळे, मुस्लिम जमातीचे सदर जाकीर पटेल, ग्रामपंचायत सदस्य शाकिर चौगुले, अकबर पठाण, अबू पठाण, मुबारक तांबोळी, इनुस चौगुले, जीलानी पटेल आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

एकूणच संपूर्ण महाराष्ट्रभर बकरी ईद एकता, सलोखा, शांतात आणि माणुसकीचा संदेश देत उत्साहात साजरी झाली. 
~प्रज्ञा शिंदे 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter