महाराष्ट्रातल्या गणपतींची वैभवशाली परंपरा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 5 d ago
पुण्यातील पाच मानाचे गणपती
पुण्यातील पाच मानाचे गणपती

 

त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम्।
गणपती बाप्पा हे आपल्या जीवनाचे आणि मनाचे आधारस्थान आहेत. गणेशोत्सवाच्यानिमित्ताने गावे, शहरे सजली आहेत; विविधरंगी रोषणाईने उजळली आहेत.

आनंद आणि ऐक्याचा संदेश देणारा हा उत्सव राज्याच्या कानाकोपऱ्यात मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. अनेक गावा-शहरांमधल्या सार्वजनिक गणपती मंडळांना वैभवशाली परंपरा आहे. दहा दिवसांच्या उत्सवापलीकडे जात यातील अनेक मंडळे वर्षभर समाजोपयोगी उपक्रम करत असतात. महाराष्ट्र आणि गोव्यातील काही प्रमुख शहरांमधील काही सार्वजनिक गणपती मंडळांचा हा धावता परिचय......

ग्रामदैवत श्री कसबा गणपती
श्री कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत. शहाजीराजे भोसले यांनी १६३६मध्ये पुण्यात लाल महाल बांधला, तेव्हा जिजाबाईंनी या गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली होती. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली, त्यावेळी या गणपतीला प्रथम मान दिला गेला. कसबा गणपतीचा सार्वजनिक गणेशोत्सव १८९३पासून सुरू झाला. कसबा गणपती मंदिर शनिवारवाड्याच्या जवळ असून येथेच मंडळातर्फे दरवर्षी उत्सव साजरा केला जातो. कसबा गणपती मंडळ धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी नावाजलेले आहे. दरवर्षी मंडळातर्फे ७५ विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च केला जातो. तसेच, नगर जिल्ह्यातील खंडोबाची वाडी हे दुष्काळी गाव दत्तक घेऊन त्याचा विकास मंडळातर्फे केला जातो.

 
श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
१८९३पासून या मंडळातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. श्री तांबडी जोगेश्वरी माता ही पुण्याची ग्रामदेवता. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ झाला तेव्हा या मंडळाच्या गणपतीला मानाच्या दुसऱ्या गणपतीचे स्थान देण्यात आले. येथील श्रीगणेशाची उत्सवमूर्ती दरवर्षी शास्त्रशुद्ध पद्धतीने शाडू मातीतून तयार केली जाते. जुन्या काळातील गंजिफाच्या खेळात निरनिराळ्या चित्रांतील हत्तीच्या चित्रणाप्रमाणे, पूर्ण चेहरा असलेले मुख, हे या मूर्तीचे वैशिष्ट्य आहे. मंडळाच्या शताब्दी वर्षापर्यंत श्री गणरायाची विसर्जन मिरवणूक सरदार नातूंकडील पेशवेकालीन वैभव सांगणाऱ्या पालखीतून निघत असे. त्यानंतर चांदीची पालखी तयार करण्यात आली. १८९६पासून उत्सवातील करमणुकीच्या कार्यक्रमांत मेळ्यांचा मोठा सहभाग होता.

 
गुरुजी तालीम गणपती मंडळ
गुरुजी तालीम ही पुण्यातील जुन्या काळातील सर्वात मोठी तालीम. १८८७पासून गुरुजी तालीम गणपती उत्सवाची सुरुवात झाली. भिकू पांडुरंग शिंदे, नानासाहेब खाजगीवाले, शेख हशम वल्लद लालाभाई व रुस्तुमभाई (नालबंद बंधू) या तालमीच्या गुरुवर्यांनी या मंडळाची स्थापना केली. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून हा गणपती ओळखला जातो. सुरुवातीस तालमीतच गणपतीची प्राणप्रतिष्ठापना होत असे, पण कालांतराने लक्ष्मी रोड मोठा झाल्यावर गणपती मंदिरासमोर मांडव टाकून उत्सव साजरा होऊ लागला. पुण्याचा राजा म्हणून या गणपतीची महती आहे. या गणपतीची विसर्जन मिरवणूक फुलांच्या रथातून काढतात.

 
 
श्री तुळशीबाग गणपती मंडळ
लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या पुण्यातील पहिल्या काही मंडळींंपैकी एक होते तुळशीबागवाले. रामचंद्र तुळशीबागवाले यांनी काही सहकाऱ्यांसह तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळाची स्थापना करून उत्सवाला प्रारंभ केला. त्यावेळी मानाच्या गणपतींचा क्रम ठरवताना तुळशीबागवाले यांच्या गणपतीला चौथे स्थान मिळाले. दातार, कर्वे आणि खटावकर यांनी उत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली. वैशिष्ट्यपूर्ण कलात्मक देखावे, हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे. दत्तात्रय खटावकर यांनी मंडळासाठी केलेले अनेक देखावे नावाजले गेले. येथील श्री गणेशाची मूर्ती १३ फूट भव्य उंचीची आहे.
 

 
केसरीवाडा गणपती मंडळ
सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली, तेव्हापासूनच केसरी संस्थेच्या गणेशोत्सवालाही प्रारंभ झाला. त्यावेळी लोकमान्य टिळक पुण्यात विंचूरकरांच्या वाड्यात राहत असत. त्या वाड्यातील पटांगणात मंडप घालून हा उत्सव साजरा होत असे. त्यावेळी टिळक एखादे व्याख्यान देत, आणि इतरत्रही व्याख्यानासाठी जात असत. १९०५पासून हा उत्सव केसरीवाड्यात होतो. या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतून निघते.

 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट
 
 
पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर हे मंदिर आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवासंदर्भात आयोजित केलेल्या पहिल्या बैठकीला दगडूशेठ हलवाई उपस्थित होते. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार १८९३पासून दगडूशेठ यांचा कोतवाल चावडीचा गणेशोत्सव सुरू झाला. श्रीमंत दगडूशेठ गणपती हे नाव त्यानंतर बऱ्याच वर्षांनी रूढ झाले. दगडूशेठ यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने गणपती पेठेतल्या लोकांना दिला. १८९७पासून ही परंपरा चालू झाली. पुढे १९५२मध्ये सुवर्णयुग तरुण मंडळातल्या पंचांनी सार्वजनिक गणेशोत्सवासाठी त्याला आणखी नवे स्वरूप दिले. १९६७मध्ये अमृत महोत्सवी सोहोळ्यानिमित्त श्री गणेशाची मूर्ती बदलण्यात आली. २००३मध्ये या मंदिराचे विस्तारीकरण झाले.
 
 
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती मंडळ
भाऊसाहेब लक्ष्मण जावळे ऊर्फ श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२मध्ये या गणपतीची स्थापना केली. पुण्यातील शनिवारवाड्याच्या मागच्या बाजूला त्यांचा राहता वाडा होता. त्याच वाड्यात त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. येथील श्रीगणेशाची मूर्ती भाऊसाहेब रंगारी यांनीच स्वतः कागदाच्या लगद्यापासून तयार केली होती.

राक्षसावर प्रहार करून त्याला यमसदनी पाठवणाऱ्या श्रीगणेशाची ही मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. तीच मूर्ती आणि मिरवणुकीचा तोच सागवानी लाकडी रथ गेली १३२ वर्षे येथील सार्वजनिक गणेशोत्सवात पाहायला मिळतो. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक क्रांतिकारकांची व्याख्याने या गणपतीपुढे होत असत.

अखिल मंडई मंडळ

येथील गणेशोत्सवाला १८९३मध्ये प्रारंभ झाला. १४ सप्टेंबर १८९३ या दिवशी गणेश चर्तुर्थीला लोकमान्य टिळक यांच्या हस्ते या सार्वजनिक गणपतीची स्थापना झाली. १८९४मध्ये पुण्यात अखिल मंडई गणेश मंडळ स्थापन झाले. लक्ष्मणराव डोंगरे काची (पैलवान) यांनी पुत्रप्राप्तीसाठी तुळजापूरच्या भवानी मातेला केलेल्या नवसानुसार शारदा गजाननाच्या शिल्पाची प्रतिकृती तयार केली होती. ही मूर्ती बरीच मोठी असल्यामुळे त्यांनी ती तत्कालीन छत्रपती शिवाजी संघ म्हणजेच आताचे अखिल मंडई मंडळ यांना दिली. त्यानंतर हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होऊ लागला. झोपाळ्यावरचा गणपती म्हणून शारदा गजाननाला ओळखतात.
 

 
जीएसबी महागणपती
किंग्ज सर्कल येथील जीएसबी सेवा मंडळाचा महागणपती मुंबईतील महत्त्वाच्या मानाच्या गणपतींपैकी एक. या गणपतीची मूर्ती भारतातील सर्वात श्रीमंत मूर्ती म्हणून ओळखली जाते. नवसाला पावणारा विश्वाचा राजा अशीही या गणपतीची ओळख आहे. यंदा भगवान महागणपतीच्या आगमनाचे ७०वे वर्ष साजरे करण्यात येत आहे. यंदा ७ सप्टेंबर ते ११ सप्टेंबरदरम्यान येथील गणेशोत्सव साजरा होत आहे. गणेशभक्तांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाचा विराट दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. बाप्पाची सोन्याने मढवलेली गणेशमूर्ती हेदेखील या उत्सवाचे एक वैशिष्ट्य.
 
यंदा गणेशमूर्तीला ६६ किलोहून अधिक सोन्याच्या, तर ३२५ किलोहून अधिक चांदीच्या दागिन्यांनी आणि इतर मौल्यवान वस्तूंनी सजवलेले आहे. गणेशभक्तांनी केलेल्या दानातून ही सुरेख गणेशमूर्ती साकारण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून मंडळाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर दिला आहे. महागणपतीची मूर्ती शाडू मातीने घडवलेली आणि नैसर्गिक वॉटर कलर्सने रंगवलेली असल्यामुळे पर्यावरणपूरक आहे.
 

 
काळाचौकी महागणपती
सन १९५६मध्ये पहिल्यांदा या गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली. यंदा गणेशोत्सवाचे ७८वे वर्ष आहे. मुंबईतील काळाचौकीच्या महागणपतीचा आगमन सोहळा पारंपरिक पद्धतीने संपन्न होतो. यात कोळीबांधव, वाघ्या-मुरळी, मोखाडा-जव्हारचे आदीवासी बांधव सहभागी होतात. भाविक या बाप्पाला मानाचा महागणपती म्हणून संबोधतात. जशी शिमग्याला देवाची पालखी नाचवण्याची पद्धत असते, तशीच काहीशी पद्धत इथेही आहे. बाप्पाची रुपेरी पावले पालखीत ठेऊन कोकणी बांधवाच्या खांद्यावर पालखी नाचवली जाते. यंदा बाप्पाच्या देखाव्यासाठी वृंदावन साकारले आहे. कृष्णरूपी मूर्तीची स्थापना केली आहे.

 
मानाचा गणपती - गणेशगल्ली
लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली मुंबईचा राजा गेल्या ९७ वर्षांपासून तेथे विराजमान होत आहे. १९७७ साली लालबागमध्ये या मंडळाची स्थापना झाली. हे लालबागमधील सर्वात जुने मंडळ आहे, असे सांगितले जाते. गणरायाच्या भव्य मूर्तीची स्थापना करण्याची सुरुवात गणेशगल्लीपासून झाली. आता त्याचे अनुकरण इतर मंडळे करत आहेत. मूर्तीसोबत सुंदर देखावे उभारण्यात या मंडळाचा हातखंडा आहे. २००५ साली मंडळाचे अमृतमहोत्सवी वर्ष होते. त्यावेळी उंच मूर्ती आणि उंच देखाव्याची सांगड मंडळाने घातली. गणेशगल्लीचा राजा हा लालबागचा मानाचा गणपती आहे. यंदा येथे महाकालचा देखावा केला जात आहे.
 

 
चिंचपोकळीचा चिंतामणी
मुंबईच्या गिरणगावातील सर्वात जुने गणपती मंडळ म्हणजे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ. येथील गणपतीला ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ असे संबोधले जाते. या मंडळाची स्थापना १९२० साली लोकमान्य टिळकांचा आदर्श ठेवून करण्यात आली. यावर्षी मंडळ १०५व्या वर्षात पदार्पण करत आहे. गणेशोत्सवाच्या काळात जमणाऱ्या लोकवर्गणीतील ४० टक्के निधी गणेशोत्सवासह, नवरात्रोत्सव आणि शिवजयंती यांसारख्या उत्सवांसाठी खर्च होतो तर, उर्वरित निधी समाजकार्यासाठी वापरला जातो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाजसेवेचा पायंडा याच मंडळाने पाडला, अशी या मंडळाची ख्याती आहे. फक्त गणेशोत्सव, नवरात्रोत्सव या धार्मिक उत्सवांपुरतेच मर्यादित न राहता मंडळाने वाचनालय, ग्रंथालय, संदर्भ ग्रंथालय, दवाखाना तसेच माफक दरात रुग्णसाहित्य केंद्र, इंग्रजी किलबिल नर्सरी असे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम केले. येथे वर्षभर अनेकविध उपक्रम आयोजित केले जातात. मंडळाच्यावतीने दरवर्षी मुंबईतील एका आदिवासी पाड्यावर आरोग्य शिबीराचे आयोजन केले जाते व गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येते.
 

 
फोर्टचा राजा
दक्षिण मुंबईतील फोर्टचा राजा हा मानाचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे.१९६२मध्ये मंडळाची स्थापना झाली. हा बाप्पा सीएसएमटी रेल्वे स्थानकासमोरील बाझार गेट स्ट्रीटपाशी विराजमान होतो. राजेशाही रूपातील गणेशमूर्ती हे येथील खास आकर्षण असते. अनंत चतुर्दशीपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात पर्यावरणीय समस्यांविषयी जागृती, स्त्रीभ्रूणहत्या, जंगल वाचवा, प्राणी वाचवा असे संदेश देणारे देखावे उभारले जातात. मंडळाचे कार्यकर्ते सामाजिक संदेश देणारे टी-शर्ट घालून जनजागृती करतात. याशिवाय हे मंडळ हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीकही आहे.

लालबागचा राजा
मुंबईतील लालबागचा राजा अशा नावाने प्रसिद्ध असणारा गणपती नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली. कोळी व इतर व्यापारी बंधूनी केलेला नवस पूर्ण झाल्याने ‘नवसाला पावणारा लालबागचा राजा’ म्हणून प्रसिद्धी मिळाली. मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रम आणि व्याख्याने आयोजित केली जातात. ग्रंथालय उपक्रम राबविला जातो. तसेच नेत्र तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर यांसारखी शिबिरे आयोजित केली आहेत. या मंडळाने कारगिल युद्धाच्या वेळी सीमेवर लढणाऱ्या भारतीय सैनिकांच्या मदतीसाठी ‘आर्मी सेंट्रल वेल्फेअर फंडा’करिता भरघोस मदत केली होती. लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बॅण्ड, लेझिम व ढोलताशांच्या जल्लोषात लालबाग मार्केट येथून निघते. मिरवणूक बघण्यासाठी आणि साश्रू नयनांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी मोठा जनसागर जमतो. लालबागचा राजा विसर्जनासाठी निघाल्यानंतर परिसरातील इतर गणपती बाहेर पडतात.

अंबाबाई मंदिरातील मानाचा गणपती
करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिरात भाविकांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे यंदा १३४वे वर्ष आहे. कोल्हापूरचा मानाचा गणपती अशी या गणपतीची ओळख आहे. उत्सवकाळात दहा दिवस येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम होतात. विसर्जन सोहळ्यात या गणपतीच्या मिरवणुकीला मानाचे स्थान आहे. १८९०मध्ये विश्‍वनाथ बावडेकर (मामा), शंकरराव मेवेकरी, शंकरमामा काळे आणि सहकाऱ्यांनी या गणेश मंडळाची स्थापना केली.
 
१९७७च्या सुमारास अनंतराव मेवेकरी, मामा बावडेकर या काही प्रमुख कार्यकर्त्यांनी मंडळाची धुरा महालक्ष्मी भक्त मंडळाकडे सोपवली. सुरुवातीला मंदिरातील खजिन्याच्या पेटीवर, त्यानंतर सरस्वती मंदिराजवळ आणि त्यानंतर गरुड मंडपात मूर्तीची प्रतिष्ठापना होऊ लागली. अलीकडच्या काळात मंडळाने गणेशोत्सवात प्रबोधन करण्याचे कामही हाती घेतले आहे. पर्यावरण, पाणी वाचवा, गडकोट-किल्ले संवर्धन अशा विषयांवर प्रबोधन केले जाते. गेली दोन वर्षे गरुड मंडपाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे मंदिर परिसरातच गरुड मंडपाची प्रतिकृती उभारली जाते आणि तेथे मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. मंडळाने सुरुवातीपासूनच शाडूच्या मूर्तीची परंपरा जपली आहे. मूर्तीच्या रंगकामासाठी नैसर्गिक रंग वापरले जातात.

बेळगावच्या चेन्नम्मा सर्कलचा लोणी गणपती
बेळगावच्या चेन्नम्मा सर्कलमध्ये स्थित असलेल्या गणेश मंदिराला सुमारे अडीचशे वर्षांचा इतिहास लाभला आहे. नवसाला पावणारा आणि लोणी गणपती म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहे. चेन्नम्मा सर्कलला रस्त्याच्या अगदी मध्यभागी असलेल्या या मंदिरात दर्शनासाठी नेहमी भक्तांची रांग लागलेली असते. एक प्राचीन श्रद्धास्थान म्हणूनही या गणेशमंदिराची ओळख आहे. या गणेशाचे दर्शन घेऊनच परिसरातील नागरिक, व्यापारी, व्यावसायिक दैनंदिन कामकाजाला प्रारंभ करतात. गणेशमूर्तीचे प्राचीनत्व भावणारे आहे. सध्या असलेल्या ठिकाणी पूर्वी अगदी लहान मूर्ती व राऊळ होते. भाविकांच्या मागणीनुसार १९६८च्या सुरुवातीला जीर्णोद्धार केला व सध्याही काम सुरू आहे. येथे रोज मूर्तीची पूजा लोण्यामध्ये बांधली जाते, त्यामुळे याला लोणी गणपती असेही म्हणतात. हे मंदिर ब्रिटिशांच्या काळापासून उभे असल्याचा उल्लेख असल्याची माहिती सेवेकरी देतात. यापूर्वी नकटा गणपती म्हणून हे देवस्थान प्रसिद्ध होते.

देवगडच्या तारामुंबरीमधील खवळे महागणपती
देवगडमधील तारामुंबरी येथील खवळे महागणपती उत्सवाचे यंदाचे ३२४वे वर्ष आहे. १७०१मध्ये या गणपतीची स्थापना झाली. येथील गणपतीची मूर्ती घरातील मंडळीच साकारतात. नारळी पौर्णिमेला मूर्ती करायला प्रारंभ होतो. एकूण चार टप्प्यात गणेशमूर्ती घडवली जाते. नारळी पौर्णिमेला मूर्तीचे धड, श्रावणातल्या संकष्टीला चेहरा, दहिहंडीच्या दुसऱ्या दिवशी हात, तर अमावस्येला मुकुट केला जातो.
 
गणेश चतुर्थीला सफेद रंगातील मूर्ती पूजेसाठी ठेवली जाते. दुसऱ्या‍ दिवशी सायंकाळी चेहऱ्याला रंग दिला जातो. पाचव्या दिवशी संपूर्ण मूर्ती रंगवून पूर्ण केली जाते. त्यानंतर दर दोन दिवसांनी रंगकाम सुरूच असते. विसाव्या दिवशी संपूर्ण मूर्तीला पुन्हा रंग दिला जातो. विसर्जनाच्या २१व्या दिवशी दुपारी चेहऱ्यावर पिवळे ठिपके दिले जातात. गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी उंदीर पूजेला ठेवला जात नाही, तो दुसऱ्या दिवशी ठेवला जातो. उत्सवापासून विसर्जनापर्यंत तीन विविध रूपांत गणेशमूर्ती दिसत असल्याने २००९मध्ये या मूर्तीची लिम्का बुक ऑफ इंडियामध्ये नोंद झाली आहे. सुमारे दीड टन वजनाची ही मूर्ती उचलण्यासाठी २० ते २५ जण लागतात. एकवीस दिवस चालणाऱ्या‍ उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

सांगलीचा लोकोत्सव पंचायतन संस्थान गणेशोत्सव
गणेश चतुर्थीच्या आधी चार दिवस भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला पहाटे येणारा गणपती हे पंचायतन संस्थानाच्या गणेशोत्सवाचे प्रमुख वैशिष्‍ट्य. येथे दोनशे वर्षांपूर्वी कागदाच्या लगद्यापासून साडेतीन फुटांच्या दोन पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्यात आल्या होत्या. सुमारे दोन शतकांची ऐतिहासिक परंपरा असणारा हा उत्सव सांगलीचा लोकोत्सव झाला आहे. येथे आराध्य दैवत गणपतीचे मंदिर उभारणीचा संकल्प चिंतामणराव पटवर्धन यांनी १८११मध्ये केला.
 
१८१४मध्ये पायाभरणी झालेले हे मंदिर पूर्णत्वास येण्यासाठी १८४४ हे वर्ष उजाडले. सुमारे अडीच एकर परिसरातील या मंदिराचे शिखर जवळपास ५० फूट उंच असून राजस्थानच्या लाल दगडांनी कमान उभारली आहे. चिंतामणेश्वर, चिंतामणेश्वरी, सूर्यनारायण, लक्ष्मीनारायण व मधे गणपती अशा पंचायतनच्या पाच मूर्ती सांगलीकरांचे श्रद्धास्थान आहे. गणपती मंदिरासह राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये मानाच्या गणपतीची प्रतिष्ठापना होते. पाचव्या दिवशी दरबार हॉल ते कृष्णा नदीवरील सरकारी घाट यादरम्यान निघणारी गणरायाची विसर्जन मिरवणूक डोळ्यांचे पारणे फेडणारी असते.

गणपतीपुळ्याचा स्वयंभू गणपती
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळ्याचे गणेशस्थान अतिप्राचीन आहे. आठ दिशांना आठ द्वार देवता असल्याचे मानले आहे. गणपतीपुळ्यातील देवता ही त्यातील पश्चिमद्वार देवता मानली जाते. आज डोंगराच्या पायथ्याशी जेथे स्वयंभू गणेश मंदिर आहे, तेथे इ. स. १६००च्या पूर्वी केवड्याचे बन होते. तेथे बाळंभटजी भिडे राहात होते. ते गावचे खोत होते. मोगलाईच्या काळात भिडेंवर संकट कोसळले. ‘आलेले संकट निवारण झाले, तरच अन्नग्रहण करीन’, असा निश्चय करून भिडे यांनी आराध्य दैवत मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी केवड्याच्या बनात तपश्‍चर्या सुरू केली. अन्नपाणी वर्ज्य करणाऱ्या भिडेंना एके दिवशी दृष्टांत झाला, ‘मी भक्तांच्या कामना परिपूर्ण करण्यासाठी आगरगुळे (गणेशगुळे) येथून दोन गंडस्थळे व दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झालो आहे. डोंगर हे माझे निराकार रूप आहे. माझी सेवा, अनुष्ठान, पूजाअर्चा कर, तुझे संकट दूर होईल.’ त्याच काळात खोत भिडे यांची गाय काही दिवस दूध देत नव्हती.

गुराख्याने बारीक लक्ष ठेवले. तेव्हा त्याला दिसले, की सध्याच्या मूर्तीच्या जागी डोंगरावरील एका शिळेवर गायीच्या आचळांतून सतत दुधाचा अभिषेक होत होता. हा प्रकार त्याने खोतांना सांगितला, त्यांनी तत्काळ सर्व परिसराची सफाई केली व त्यांना दृष्टांतातील गणेशाची मूर्ती आढळली, अशी कथा सांगितली जाते. तेथे गवताचे छप्पर घालून छोटेसे मंदिर उभारले व पूजाअर्चा सुरू केली. गणपतीपुळे येथील पाच गावांत घरोघरी गणपती आणला जात नाही, हे गणपतीपुळ्याचे एक वैशिष्ट्य आहे.

रत्नागिरीतील टिळक आळीचा गणपती
लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान, रत्नागिरीची मधली आळी, म्हणजेच टिळक आळी. येथे १९२५पासून गणेशोत्सव साजरा केला जातो. अत्यंत शिस्तबद्ध, वेळेबाबत काटेकोरपणा, परंपरेचे पालन, आणि प्रबोधन हे या ८२ वर्षांच्या उत्सवाचं वैशिष्ट्य. रत्नागिरी जिल्ह्यातील हाच पहिला सार्वजनिक उत्सव. टिळक आळीतल्या पिंपळपार देवस्थान ट्रस्टच्यावतीने या उत्सवाचे आयोजन केले जाते. रंगमंचाच्या उभारणीपासून विसर्जनापर्यंत सारे काही शिस्तबद्ध आणि आखीव-रेखीव पद्धतीने पार पडते. पूर्वी स्टेज उभारणीसाठी बैलगाडीतून सामान आणले जायचे. दिवसभरात ओझी आणून बैल थकले असतील हे लक्षात घेऊन रात्री त्यांना कामाला जुंपले जायचे नाही. त्याऐवजी माणसेच बैलगाडी ओढत आणि साहित्याची जुळवाजुळव करीत. येथे पहिल्या दिवशी कीर्तन, उत्सवकाळात शनिवारी चक्री भजन, अखेरच्या दिवशीची सहस्रावर्तने, आगमन आणि विसर्जन मिरवणुकीतील पुरुष आणि महिलांची लेझीम पथके हे वैशिष्ट्य मंडळाने ८२ वर्षं जपले आहे. येथील वेळेत निघणारी शिस्तबद्ध विसर्जन मिरवणूक पाहायला गर्दी होते. लेझीम आणि ताशांची मिरवणुकीला साथ असते; मात्र ढोलांचा वापर केला जात नाही.

आठवड्याभरात एका विशिष्ट दिवशी रंगमंचावर कोणालाही सेवा सादर करण्याची मुभा असते. सेवा सादर करणाऱ्या प्रत्येकाला मानधन म्हणून पेढ्यांची पुडी दिली जाते. प्रबोधनपर व्याख्यानाची प्रथाही उत्सव सुरू झाल्यापासून कायम आहे. येथे गणेशोत्सवात विविध स्पर्धांचे आणि सामाजिक उपक्रमांचेही आयोजन केले जाते.

श्री शंकर पार्वती गणेश
साताऱ्यातील शंकर-पार्वती गणेशाचे कोणतेही मंडळ, देवस्थान किंवा ट्रस्ट नाही. यासाठी कोणतीही देणगी गोळा केली जात नाही. शनिवार पेठेतील परदेशी कुटुंबीय या मूर्तीची दहा दिवस त्यांच्याच खासगी जागेत प्रतिष्ठापना करतात. शंकराच्या उजव्या बाजूला गणपती, तर डाव्या बाजूला पार्वती असणारी ही मूर्ती राहुल यशवंत परदेशी शाडूच्या मातीतून साकारतात. ही मूर्ती दरवर्षी विसर्जित केली जाते. विसर्जन मिरवणुकीत ‘गणपती बाप्पा मोरया’ ऐवजी ‘शिव सांब, हर-हर’ असा जयघोष केला जातो. संपूर्ण मिरवणूक मार्गात घरा-घरांतून या मूर्तीची पूजा-आरती केली जाते. जोपर्यंत ही शंकर-पार्वती-गणपती मूर्ती विसर्जित होत नाही, तोपर्यंत साताऱ्याची विसर्जन मिरवणूक अधिकृतरित्या संपत नाही. याच्या विसर्जनानंतरच साताऱ्याची विसर्जन मिरवणूक संपते.

जयहिंद व्यायाम मंडळ
साताऱ्याच्या शनिवार पेठेतील जयहिंद व्यायाम मंडळाची स्थापना सन १९२२मध्ये झाली. १०३ वर्षांची परंपरा मंडळाने अखंडित जपली आहे. पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास मंडळ प्राधान्य देते. गणेशोत्सवात गौरीपूजनादिवशी मंडळातील प्रत्येक सदस्य घरून नैवेद्य तयार करून आणतो. सुमारे ३००हून अधिक प्रकाराचे पदार्थ गौरी-गणपतीपुढे मांडले जातात. सिंहासनावर विराजमान झालेली गणेशमूर्तीची बैठक वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही गणेशमूर्ती दागिन्यांनी मढवली जाते. विसर्जन मिरवणुकीत मंडळाच्यावतीने मर्दानी खेळ सादर केले जात असत. स्वतःची ध्वनिक्षेपण यंत्रणा खरेदी करणारे जिल्ह्यातील पहिले आणि भाविकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता ध्वनियंत्रणेवर बंदीच्या निर्णयाची अंमलबजवाणी करणारे मंडळ म्हणूनही जयहिंदचे नाव घेतले जाते. स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदनाची परंपरा आजही मंडळाने जोपासली आहे.

आझाद हिंद गणेशोत्सव मंडळ
सन १९०७पासून साताऱ्यातील आझाद हिंद गणेशोत्सव मंडळ गणेशमूर्तीची स्थापना करून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देत आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रेरणेने मंडळाला ‘आझाद हिंद’ असे नाव देण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रज्योत पेटविण्याचे कार्य करणारे मंडळ आजही सामाजिक कार्यात अग्रेसर असते. उत्सव काळात मंडळातर्फे शेवटचे पाच दिवस महाप्रसादाचे आयोजन केले जाते. ही परंपरा आजही जोपासली जात आहे. मंडळाच्या सर्व कार्यांत सोमवार पेठेतील ज्येष्ठ नागरिकांसह मंडळाचे सदस्य हिरिरीने सहभागी होतात.

गुरुवार तालीम गणेशोत्सव मंडळ
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या साताऱ्यातील गुरुवार पेठेतील गुरुवार तालीम गणेशोत्सव मंडळाची स्थापना सन १९२८मध्ये झाली. मुस्लिम धर्मीयांचा ताबूत उत्सव आणि हिंदू बांधवांचा गणेशोत्सव साताऱ्यातील गुरुवार तालीम येथे एकत्र साजरा केला जातो. गणेशमूर्ती सिंहासनावर विराजमान झालेली असते. आशीर्वादासाठी एक हात उंचावलेला असतो. एका हातात शस्त्र व एका हातात फूल असते. डावा हात मांडीवर ठेवलेल्या स्थितीत असतो. विविध पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेश विसर्जन मिरवणूक होते. त्याशिवाय या मिरवणुकीत मर्दानी खेळांचे चित्तथरारक प्रदर्शन केले जाते. हे गुरुवार तालीम मंडळाचे वैशिष्ट्य आहे. हे मंडळ रक्तदान शिबिर, अन्नदान, गरजू विद्यार्थ्यांना मदत, आरोग्य शिबिर असे सामाजिक उपक्रम वर्षभर आयोजित करते.

अजिंक्य गणेशोत्सव मंडळ, बुधवार तालीम
अजिंक्य गणेशोत्सव मंडळास सातारकर बुधवार तालमीचा गणपती असेही संबोधतात. या मंडळाची स्थापना सन १९३२मध्ये झाली. उत्सवात सर्व धर्मीयांचा सहभाग असतो. सामाजिक दायित्व म्हणून मंडळ रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबिर असे उपक्रम आयोजित करते. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेस मंडळ प्राधान्य देते. उत्सवादरम्यान धार्मिक व सामाजिक उपक्रम करण्यावर मंडळाचा भर असतो. मंडळाच्या कार्यात युवा वर्गाचा व महिलांचा मोठा सहभाग असतो. ढोल-ताशा पथकासह विविध पारंपरिक वाद्यांच्या गजरात शिस्तबद्ध मिरवणूक, हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे.

जयजवान गणेशोत्सव मंडळ
साताऱ्याच्या शनिवार पेठेतील जयजवान गणेशोत्सव मंडळाची स्थापना सन १९५८मध्ये झाली. दहीहंडी, गणेशोत्सव यासह विविध सण-उत्सव साजरे करण्यात मंडळाची आघाडी असते. या मंडळाची गणेशमूर्ती वैविध्यपूर्ण असते. उत्सवादरम्यान या मंडळातर्फे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजिले जातात. पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास मंडळ प्राधान्य देते. गणेश जयंतीदेखील मंडळ उत्साहात साजरी करते. गणेश जयंतीदिवशी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

नागपूरचा राजा
भक्तांच्या नवसाला पावणाऱ्या नागपूरच्या राजाची ख्याती केवळ नागपूरपुरती मर्यादित नसून, जवळपासच्या ग्रामीण भागांसह लगतच्या जिल्ह्यातील भाविक राजाच्या दर्शनाला येतात. एखाद्या राजाला शोभेल असाच नागपूरच्या राजाचा थाट असतो. दणक्यात आगमन आणि तेवढ्याच उत्साहात बाप्पांना निरोप दिला जातो. मानाचा गणपती म्हणून स्थान असलेल्या बाप्पांच्या उत्सवाचे यंदा २८वे वर्ष आहे.

व्यापारी दीपक जयस्वाल बालपणापासून गणेशभक्तीत रमायचे. गणरायाच्या नितांत भक्तीपोटी त्यांनी आपण नागपुरात दहा दिवस मोठा गणेशोत्सव साजरा करू, असे मनाशी ठरवले. १९९६मध्ये पहिल्यांदा अतिशय वाजत-गाजत उत्साहात गणपती बाप्पांचे आगमन झाले. दरवर्षी एकाच पद्धतीची सिंहासनारूढ असलेली बाप्पांची मूर्ती मूर्तिकलेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या चितारओळीत साकारली जाते. मंडपस्थळी श्री गणेशाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत सारेच विधी मुहूर्तांवर आणि मंत्रोच्चारात होतात. दहाही दिवस यज्ञ-याग, पूजा, होमहवन चालते. बाप्पांची मूर्ती मंडपस्थळी दाखल झाल्यानंतर सोन्याच्या अलंकारांनी ती मढवली जाते. त्यानंतर विधिवत प्राणप्रतिष्ठा होते. प्राणप्रतिष्ठेसाठी तसेच दहा दिवस पूजाअर्चेसाठी खास पुरोहित बोलावले जातात. दररोज सकाळ-सायंकाळी आरतीनंतर महाप्रसादाचे वितरण केले जाते. याकाळात तुळशीबाग परिसर अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघतो.

महालात बसणारा ‘महालचा राजा’
नागपुरातील अतिशय जुना भाग म्हणून ओळख असलेल्या महाल परिसरात सणवार, उत्सवांच्या काळात चैतन्य संचारते. याच परिसरात पाताळेश्वर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने १९५६ साली गणरायाची स्थापना करण्यात आली. ‘महालाचा थाट’ ही या गणरायाची खासियत असून, यंदाही मोठा राजदरबार परिसरात साकारण्यात येत आहे. महालातील अरुंद, गल्लीबोळांमध्ये विशालकाय सभामंडप साकारणे साधी बाब नाही. परंतु बाप्पांच्या कृपाशीर्वादाने ही किमया साधली जाते, अशी मंडळाच्या कार्यकर्त्यांची भावना आहे.

चांदीचा मुकुट, सोन्याचा मुलामा दिलेला रत्नजडित हार, बाजूबंद, वाळे, चांदीच्या दूर्वा, जानवे, पादुका अशी आभूषणे भक्तांनी लाडक्या बाप्पाला अर्पण केली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित वास्तूचा देखावा ही मंडळाची खासियत असून भाविकांना आपल्या जाज्वल्य इतिहासाचे स्मरण व्हावे, हाच उद्देश यामागे असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दहा दिवस सामूहिक अथर्वशीर्ष पठण, गणेशयाग, महाआरती, महाप्रदासासह अनेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असते. बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत ध्वज पथक, अश्व पथक, ढोलताशा पथके, बॅण्ड, वारकरी अशा अनेकांचा सहभाग असतो.  

श्री संती गणेशोत्सव व सांस्कृतिक मंडळ
सदुसष्ट वर्षांची परंपरा जपणारा नागपुरातील मानाचा गणपती म्हणून श्री संती गणेशोत्सव व सांस्कृतिक मंडळाचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. १९५८मध्ये बबनराव सावरकर, कृष्णराव दिगंबर चावरे, प्रभाकर साहूरकर, बाळासाहेब कोलते, अरविंद बुधोलिया या समविचारी लोकांनी एकत्र येत लोकमान्य टिळकांचा विचार पुढे नेण्यासाठी श्री संती गणेशोत्सव व सांस्कृतिक मंडळ स्थापन करून गणेशोत्‍सवास सुरुवात केली.

गल्लीतील गणपती आज मोठ्या मैदानात विराजमान झाला आहे. गणेशोत्सवात दरवर्षी चार ते पाच लाख भाविक मंडळाला भेट देतात. रुग्णवाहिका, मेडिसिन बँक, गरीब मुलींच्या शिक्षणाचा खर्च, असे विविध उपक्रम मंडळाद्वारे राबविले जातात. कोविड उद्रेकाच्या काळाच मंडळाने दोन हजार किट्सचे वाटप केले होते. दरवर्षी एखाद्या प्रसिद्ध मंदिराचा देखावा साकारणे मंडळाचे वैशिष्ट्य आहे. माहूरगड दर्शन देखावा हे यंदाच्या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण आहे.

यवतमाळ का राजा
शहरातील मारवाडी चौकात नवयुवक गणेश उत्सव मंडळाने स्थापना केलेल्या ‘यवतमाळचा राजा’ यवतमाळचा मानाचा गणपती आहे. यंदा मंडळाला ६१ वर्षे पूर्ण झाली. बाप्पासाठी सोन्याचा मुकुट, ४१ किलो चांदीचे सिंहासन, ११ किलो चांदीचा मूषक असून मूर्तीला हिऱ्याचा टिळा लावण्यात येतो. दरवर्षी भव्य सजावट करण्यात येते. भाविक आपल्या मनातील सुप्त इच्छा बाप्पासमोरील चांदीच्या मूषकाच्या कानात सांगतात. शुद्ध अंतःकरणाने देवाला शरण जाऊन मूषकाच्या कानात एखादी इच्छा बोलून दाखवल्यास ती नक्की पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंडळाच्यावतीने दहा दिवस अन्नदान, आरोग्य, रक्तदान शिबिर तसेच विविध सामाजिक उपक्रम केले जातात. केवळ शहरच नव्हे तर इतरही जिल्ह्यातून दरवर्षी हजारो भाविक ‘यवतमाळ का राजा’च्या दर्शनाकरिता येतात.

चंद्रपूरचा राजा
अख्ख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या चंद्रपूरच्या राजाची नवसाला पावणारा अशी ख्याती आहे. १९७४ साली स्थापन करण्यात आलेल्या या मंडळाला यंदा पन्नास वर्षे पूर्ण झाली. देशातील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिर यांचे विविध देखावे दरवर्षी मंडळाच्यावतीने साकारले जातात. मंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त यंदा बाप्पाला २१ किलो चांदी अर्पण करण्यात येणार आहे. शुद्ध चांदीतून बाप्पाचे हात, पाय व वाहन मूषक साकारण्यात येणार आहे.

चंद्रपूर राजा गणेश मंडळ एक ते दीड महिन्यांपासून तयारीला सुरुवात करते. योग्य मुहूर्तावर सात प्रकारचे पाणी व सात प्रकारच्या मातीचे पूजन झाल्यानंतर मूर्ती साकारण्यास सुरुवात होते. मूर्ती पूर्ण झाल्यानंतर विधीवत पूजा केली जाते व त्यानंतर भाविकांना मूर्तीचे दर्शन घेता येते. मूर्ती करताना दक्षिणेकडून क्षीचक्रम यंत्र, गणेश लक्ष्मी यंत्र, श्री गणेश यंत्र बसविण्यात येते. बाप्पाला मनोभावे शरण जाणाऱ्या भाविकांची इच्छापूर्ती होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे.

श्री रुद्र गणेश मंडळ
बुलढाण्यातील सर्वात पहिले रुद्र ढोलपथक नावाजलेले आहे. यातूनच रुद्र गणेश मंडळाची निर्मिती झाली. शहरातील संगम चौक परिसरात गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. आज तो बुलढाणा शहराचा मानाचा गणपती आहे. दरवर्षी मंडळाकडून केली जाणारी सजावट आकर्षक असते. कधी डोळ्यांसमोर प्रत्यक्षपणे इतिहास दाखवणारे देखावे, तर कधी डोळ्यांचे पारणे फेडणारी रोषणाई सादर केली जाते. देखावे व रोषणाई पाहाण्यासाठी आसपासच्या ग्रामीण भागांतूनही हजारो भाविक आवर्जून येतात.

गतवर्षी मंडळाने केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारली होती. सामाजिक कार्यात मंडळ अग्रेसर असते. आपद्ग्रस्त ठिकाणी स्वयंसेवक पाठवणे तसेच आर्थिक स्वरूपातही मदत देणे, अनाथ मुलांना शैक्षणिक कार्यासाठी दत्तक घेणे, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण यांसह विविध उपक्रम मंडळाकडून होत असतात.

राष्ट्रीय गणेश उत्सव मंडळ
भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक वाशीम येथे आले असता त्यांनी राष्ट्रीय एकतेसाठी गणेश उत्सवाची गरज असल्याचे सांगितले होते. त्याच प्रेरणेतून वाशीम येथे राष्ट्रीय गणेश उत्सवाची स्थापना १९१८मध्ये झाली. तेव्हापासून आतापर्यंत राष्ट्रीय गणेश उत्सव वाशीम शहराची सांस्कृतिक ओळख ठरला आहे. राजे उदाराम यांच्या राजवाड्याच्या पटांगणात लोकमान्यांची सभा झाली होती. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन सुरुवातीला भाऊसाहेब साने यांच्या माडीवर राष्ट्रीय गणेश उत्सव सुरू झाला. कालांतराने त्याला व्यापक स्वरूप आले. राष्ट्रीय गणेश उत्सव मंडळाने व्याख्यानमालांसाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वक्त्यांना वाशीम येथे आणून वाशीमच्या सांस्कृतिक इतिहासात मोलाची भर घातली आहे. आजही हा उत्सव जोमाने सुरू आहे.

रविवार कारंजा गणेश मित्रमंडळ
नाशिकमधील रविवार कारंजा गणेशोत्‍सव ट्रस्‍टला १०६ वर्षांची परंपरा आहे. महापालिका स्‍थापन होण्यापूर्वी मंडळाचा मानाचा पहिला गणपती असायचा. आता महापालिकेच्‍या मंडळानंतर दुसऱ्या क्रमांकावर रविवार कारंजा गणेश मित्रमंडळाचा चित्ररथ असतो. शहराच्‍या मध्यवर्ती भागातील हे मंडळ यावर्षी नेपाळच्‍या प्रसिद्ध मुक्‍तिनाथ मंदिराचा देखावा साकारत आहे. मंदिराबरोबरच देखाव्‍यात १०८ गोमुखांसह सरस्‍वती कुंड, लक्ष्मी कुंड उभारण्याचे काम दोन महिन्‍यांपासून सुरू आहे. त्‍यासाठी मुंबईतून सेट डिझायनर आलेले आहेत.

ट्रस्‍टच्‍या धर्मादाय दवाखान्‍यातून वर्षभर रुग्‍णांवर अल्‍पदरात उपचार केले जातात. मंडळाने पतसंस्‍थादेखील स्‍थापन केली असून, याद्वारे भाजीविक्रेते, फळविक्रेते अशा छोट्या व्‍यावसायिकांना कर्जपुरवठा सुविधा उपलब्‍ध केली आहे.

सरदार चौक मित्र मंडळाची यंदा शताब्दी
पंचवटीतील सरदार चौक मित्र मंडळ ट्रस्ट मंडळाची स्थापना १९२५मध्ये स्वातंत्र्य लढ्याच्या प्रेरणेतून पंचवटीतील तरुणांनी एकत्र येऊन केली. यंदा गणेशोत्सव मंडळाची शताब्दी आहे. लोकमान्य टिळक नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी पंचवटीतील मुठे यांच्या वाड्यात सार्वजनिक गणेशोत्सवासंदर्भात बैठक घेतली होती. तेव्हापासून नाशिकमधील गणेशोत्सवाला प्रारंभ होऊन, सरदार चौक मित्र मंडळाच्या कामाला सुरुवात झाली.

उत्सवात वीस फूट मूर्तीची परंपरा मंडळाने अस्तित्वात आणली. चलचित्र देखावे दाखवण्याची सुरुवातदेखील मंडळाने केली. विसर्जन मिरवणुकीत तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी असे मर्दानी खेळ मंडळाचे विशेष आकर्षण होते. पर्यावरण रक्षणाचे भान राखत मंडळाने २०१०मध्ये गणरायांची कायमस्वरूपी मूर्ती स्थापन केली. भक्तांनी श्रीगणेशाला सुमारे १८ किलो वजनाची चांदीची आभूषणे दानरूपात दिली आहेत. मंडळातर्फे गणेशोत्सव, शिवजयंती, नवरात्रोत्सव, होळी, रहाड उत्सव, गणेश जयंती, साईबाबांचा भंडारा आदी धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. दिवाळीनिमित्त आदिवासी पाड्यांवर कपडे, फराळ वाटप, आरोग्य तपासणी शिबिर आदी सामाजिक उपक्रम राबविले जातात.

गुलालवाडी व्‍यायामशाळा मंडळ
नाशिकच्या गुलालवाडी व्‍यायामशाळेने शंभराव्‍या वर्षात पदार्पण केले असून, स्‍थापनेपासून अखंडितपणे गणेशोत्‍सव साजरा करण्याची परंपरा आहे. मानाचा तिसरा गणपती म्‍हणून विसर्जन मिरवणुकीत मंडळाचा चित्ररथ सहभागी होतो. शिस्‍तबद्ध पद्धतीने सादर केलेले लेझीम, ढोल-ताशा वादन भाविकांमध्ये आकर्षणाचे केंद्र ठरते. मर्दानी खेळांचे प्रशिक्षण व्‍यायामशाळेत दिले जाते. कबड्डीचे अनेक खेळाडू गुलालवाडी व्‍यायामशाळेतून घडले आहेत. सामाजिक उपक्रमांचेही आयोजन केले जाते. कोरोना उद्रेकादरम्यान परीसरातील नागरिकांना मोफत लसीकरण सुविधा उपलब्‍ध केली होती.

साक्षी गणेश मित्र मंडळ
नाशिकच्या भद्रकाली परिसरातील साक्षी गणेश मंदिराची स्‍थापना १९९६ साली करण्यात आली. पुण्यातील दगडूशेठ हलवाई ट्रस्‍टच्या परवानगीने सोनपितळ धातूपासून गणपती मूर्ती साकारण्यात आली. मंदिर उभारणी १९९७पासून सुरू करून २०१३मध्ये लोकवर्गणीतून मंदिराचे काम पूर्ण केले. संगमरवरात साकारलेले हे मंदिर भाविकांना नेहमीच आकर्षित करते. विसर्जन मिरवणुकीत मंडळाचा मानाचा चौथा गणपती असतो. ट्रस्‍टतर्फे शहरात सर्वप्रथम माघी गणेश जयंती साजरी करण्यास सुरुवात केली होती. वर्षभर इतरही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सामाजिक बांधिलकी जपत मंडळाने लोकमान्‍य विद्यालयातील काही विद्यार्थ्यांना दत्तक घेतले असून, त्यांना शैक्षणिक साहित्‍य दिले जाते.

शिवसेवा मित्रमंडळ
नाशिकच्या शिवसेवा मित्रमंडळाची स्‍थापना ६०वर्षांपूर्वी झाली. संगीताच्या तालावरील विद्युत रोषणाई या मंडळाचे वेगळेपण दर्शविते. मंडळातर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्‍सव साजरा करण्यावर भर आहे. पाच फूट उंचीची व सुमारे अडीच हजार किलो वजनाची संगमरवरी दगडातून साकारलेल्या श्रींच्‍या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविक आवर्जून हजेरी लावतात. मंडळातर्फे वर्षभर विविध सामाजिक, धार्मिक उपक्रम राबविले जातात. गरजूंना उपयोगी साहित्‍य वाटप, आधाराश्रमातील बालकांना खाऊचे व इतर साहित्‍याचे वाटप केले जाते.

गोव्‍यातील आद्य सार्वजनिक गणपती -मडगाव पिंपळकट्टा गणपती
गोव्‍याची आर्थिक राजधानी म्‍हणून ओळखल्‍या जाणाऱ्या मडगाव शहराने कित्‍येक उत्‍सवांची सुरुवात केली. सार्वजनिक गणेशोत्‍सव साजरा करण्‍याचा पहिला मानही गोव्‍यात याच शहराला मिळाला. येथील पिंपळकट्ट्यावरील सार्वजनिक गणपती उत्‍सव हा गोव्‍यातील पहिला सार्वजनिक उत्‍सव. हा उत्‍सव १९५७पासून सुरू झाला. यंदा या सार्वजनिक गणेशोत्‍सवाचे ६७वे वर्ष आहे.

गोवा मुक्‍तीच्‍या चार वर्षआधी या सार्वजनिक गणेशोत्‍सवाला प्रारंभ झाला. त्‍यावेळी गोवा मुक्‍तीची चळवळ धगधगत असताना सर्व मडगावकरांना एकत्र आणून त्‍यांच्‍यामध्‍ये राष्ट्रभावना निर्माण करण्‍याच्‍या उद्देशानेच या उत्‍सवाची सुरुवात झाली. या मंडळाने सामाजिक कार्यही हाती घेतले असून त्‍यात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, गरीब लोकांसाठी मोफत अंत्‍यसंस्‍काराची सोय, शहरातील लोकांसाठी वैद्यकीय शिबिरे तसेच गरिबांना मदत अशी वेगवेगळी कामे या मंडळाद्वारे केली जातात.

नवसाला पावणारा म्हापसा नगरीचा राजा
पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीतून गोवा मुक्त झाल्यानंतर, स्वातंत्र्यलढ्यातील कार्य व आठवणींच्या स्मृती जागत्या ठेवून समाज प्रबोधन करण्याच्या हेतूने १९६२ साली बार्देश तालुक्यातील म्हापसा शहरातील म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली.

आज गणेशोत्सव ६२व्या वर्षात प्रवेश करीत आहे. पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हापसा शहराच्या मध्यभागी असलेल्या राम मनोहर लोहिया उद्यानात साजरा करण्यात आला. मुंबई, पुणे, बेळगावच्या धर्तीवर गणेशोत्सव अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा करण्याचा निर्णय त्याकाळात झाला होता. दुसऱ्या वर्षी गणेशोत्सव फुलाच्या बाजारात साजरा झाला. त्यानंतर, १९६४ सालापासून आजतागायत पालिका बाजाराच्या प्रवेशद्वारावर उत्सव साजरा होतो. या उत्सवात गोवा, महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांना आमंत्रित केले जाते. नाट्यप्रयोग, भजन, कीर्तन, भावगीत अशा कार्यक्रमांची रेलचेल असते. पूर्ण गोवा तसेच सिंधुदुर्ग भागांतील गणेशभक्त दर्शनाला येतात. हिंदू, ख्रिश्चन व इतर धर्मीय भाविकही गणरायाला नवस करतात व त्यांच्या इच्छा पूर्ण होतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे.

भक्तांकडून उत्सव यशस्वी करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळते. शिल्लक राहिलेल्या रकमेतून समाजोपयोगी कामे केली जातात.

केपेचा सार्वजनिक गणपती
गोव्‍यातील इतर शहरांच्‍या तुलनेने काहीसे खेडेगाव असलेले केपे हे गाव सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळामुळे प्रसिद्ध आहे. याचे कारण म्‍हणजे, या मंडळातर्फे प्रत्‍येक वर्षी केला जाणारा देखावा आणि दरवर्षी कुपन लॉटरीतून देण्यात येणारी लाखो रुपयांची बक्षिसे. या कुपनांच्या खरेदी‍साठी राज्‍यातील विविध भागातील लोक केपेत येतात.

या सार्वजनिक गणेशोत्‍सवाची सुरुवात १९८७ साली झाली. गावातील हिंदू, ख्रिश्चन, मुस्‍लीम व्‍यापारी आणि नागरिकांनी एकत्र येऊन या मंडळाची स्‍थापना केली. आजही आयोजन समितीत ख्रिश्चन आणि मुस्‍लीम बांधवांना सामावून घेतले जाते. या मंडळाचा देखावा तेवढाच आकर्षक असतो. यावेळी श्रीकृष्‍ण रासलिलेचा देखावा करण्‍यात येणार आहे.

मंडळ अनेक सामाजिक उपक्रम हाती घेते. त्‍यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, दिव्‍यांग विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या लोकविश्वास प्रतिष्‍ठानाच्‍या शाळेला आर्थिक मदत, मंडळातील गरजू सभासदांना वैद्यकीय मदत देण्‍याबरोबरच गावातील लोकांनाही वैद्यकीय मदत दिली जाते. केपे गावात सुसज्‍ज मंगल कार्यालय नसल्‍याने या मंडळाने आता जागा घेऊन वातानुकूलित सभागृह उभे करण्‍याचा संकल्‍प सोडला आहे.