तब्बल चौदाशे वर्षांपासून एकत्र राहूनही मुस्लिम समाजातील धार्मिक परंपरा, महापुरुष, त्यांचा धार्मिक आणि सामाजिक इतिहास यांच्याविषयी सर्वसामान्यांना फार कमी माहिती असते. हिंदू-मुस्लिम यांच्यातील अविश्वासाचे आणि संघर्षाचे हे ही एक मह्त्त्वाचे कारण आहे. चांगली आणि वाईट माणसे सर्व समाजात नेहमीच अस्तित्वात असतात आणि यापुढेही राहतील. मुस्लिमांमध्येही परोपकारी व्यक्ती, महान योद्धे, सत्प्रवृत्त आत्मा आणि न्यायप्रेमी सम्राट झाले आहेत. एखाद्या समाजातील महापुरुषांच्या चरित्रांचा अभ्यास त्या समाजाविषयी आत्मीयतेला जन्म देतो यात शंका नाही. हिजरी या इस्लामी कालगणनेनुसार नुकतेच मुस्लीमांचे नवे वर्ष सुरु झाले आहे. मोहरम हा त्यातील पहिला महिना. जगभरातील मुस्लिमांच्या दृष्टीने या महिन्याला विशेष महत्त्व आहे. विशेषतः त्यातले पहिले दहा दिवस करबलाच्या ऐतिहासिक घटनेमुळे विशेष महत्त्वाचे मानले जातात. याच पार्श्वभूमीवर 'आवाज मराठीवर' १० मोहर्रम म्हणजे २८ जुलैपर्यंत या विषयाशी संबंधित विशेष लेख प्रसिद्ध होणार आहेत. त्यापैकी, ताजिया मिरवणुकांवरील भारतीय संस्कृतीच्या प्रभावाविषयी मांडणी करणारा हा लेख...
भारत आपल्या सांस्कृतिक वैविध्यासाठी जगप्रसिद्ध आहे. धर्म, पंथ, उपासनापद्धती यांबाबत विविधता असणारी मंडळी येथे गुण्यागोविंदाने राहतात. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या या विशाल भूभागात आढळणारी नैसर्गिक आणि सांस्कृतिक विविधता जगातील अन्यत्र कुठेही आढळत नाही.
धर्म आणि श्रद्धेबाबत विविधता असूनही सांस्कृतिक अंगाने मात्र भारतीयांमध्ये काहीएक समानता दिसून येते. आता मोहरमच्या मिरवणूकांचेच उदाहरण पहा. भारतात वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने निघणाऱ्या शोभायात्रांचीच झलक त्यात स्पष्टपणे पाहायला मिळते.
मुहम्मद पैगंबरांचे लहान नातू हजरत इमाम हुसैन यांना त्यांच्या कुटुंबियांसह याच दिवशी इराकमधील करबला या शहरात झालेल्या लढाईत शहीद करण्यात आले. त्यांच्या हौतात्म्याला स्मरून मुस्लीम या महिन्यात विशेषतः पहिले दहा दिवस दुखवटा पाळतात. बहुसंख्य मुसलमान या महिन्यात शुभकार्ये, लग्नसमारंभ इत्यादी टाळतात.
मोहरमच्या १० तारखेला हुसैन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हौतात्म्य प्राप्त झाल्याच्या स्मरणार्थ ताजिया काढला जातो. इमाम हुसैन यांच्या कबरीचे प्रतिक म्हणजे ताजिया. लाकूड आणि रंगीत कागद यांपासून हे बनवले जाते. बहुतेक ताजीयांमध्ये घुमट बनवला जातो.
भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून मृतांचे स्मरण करण्याची परंपरा आहे. श्राद्ध या विधीद्वारे पितरांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. ज्यांच्यामुळे आपण अस्तित्वात आहोत त्या पूर्वजांचे आपण ऋणी आहोत असे मानले जाते. म्हणूनच श्राद्धाच्या दिवशी लोक आपल्या पितरांच्या आत्म्याच्या समाधानासाठी दानधर्म करतात. या काळात कोणतेही शुभकार्य केले जात नाही.
इमाम हुसैन यांच्यावर अपार प्रेम असणारे मुस्लिमही मोहरमच्या एक तारखेपासून चेहलमपर्यंत (चाळीसाव्यापर्यंत) कोणत्याही शुभकार्याचे आयोजन करत नाहीत. मोहरमचे दहा दिवस दैनंदिन वस्तू वगळता इतर खरेदीही करत नाहीत.
भारतात देवी-देवतांच्या मिरवणुका काढण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. ओडिशाच्या जगन्नाथ पुरीची यात्रा तर जगप्रसिद्ध आहे. तसेच विजयादशमीला दुर्गा देवीची मिरवणूक काढण्यात येते. राम, लक्ष्मण आणि सीता यांचीही मिरवणूक काढली जाते. जन्माष्टमीला कृष्णाची, शिवरात्रीला शिवाची शोभायात्रा काढली जाते. तर गणेश चतुर्थीला गणपतीची मिरवणूक काढण्यात येते. याशिवाय देशातील विविध भागात वेगवेगळ्या देवतांच्या मिरवणुका काढल्या जातात.
दोन्ही धर्मांतील या मिरवणुकांमध्ये फरक इतकाच की मोहरमची मिरवणूक दु:खात काढली जाते आणि शोभा यात्रा आनंदाने काढल्या जातात. मोहरमच्या दिवशी शेवटी ताबूत मातीत गाडले जातात, तर दुर्गा आणि गणेशाच्या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्या जातात. काही ठिकाणी तर ताबूतांचेही पाण्यात विसर्जन केले जाते.
देशभरात मोहरमच्या मिरवणुका निघतात. त्यात हिंदूही मोठ्या संख्येने आणि तितक्याच भक्तिभावाने सहभागी होतात. मोहरममध्ये वाटल्या जाणार्या प्रसादाची ते मोठ्या श्रद्धेने स्वीकारतात. अनेकदा तर हिंदू महिला स्वत:प्रसादासाठी पुढाकार घेतात. अनेक हिंदू महिला भाताचा हा प्रसाद घरी घेऊन जातात. ते सुकवतात आणि मूल आजारी पडले की त्याला प्रसादाचे काही दाणे खायला घालतात.यामुळे मूल बरे होते, यावर त्यांची श्रद्धा असते.
खरंच, धार्मिक सद्भाव आणि सौहार्द यांच्याबाबतीत भारत एकमेवाद्वितीय आहे. एकमेकांच्या धर्माचा आणि चालीरीतींचा आदर करणे हे या मातीचे वैशिष्ट्य आहे. गंगा-जमुनी संस्कृती म्हणतात ती हीच!
- फ़िरदौस ख़ान