‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत दरवर्षी गणपती बाप्पाचे विसर्जन केल्यानंतर गणेशभक्त पुढच्या वर्षाची वाट लगेचच पाहू लागतात. दरमहा येणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या या आराध्य दैवताला वर्षभर आळवत राहतात आणि भाद्रपदातील चतुर्थी येताच मोठ्या थाटामाटात, वाजत-गाजत गणपतीची मूर्ती आपल्या घरी आणतात. या गणेशचतुर्थीच्या सणाला हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. दहा दिवस चालणारा हा गणेशोत्सव आजपासून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने ही विशेष स्टोरी...
'विविध भाषिक, प्रांतिक व धार्मिक लोकांना सामावून घेणारे शहर' अशी ओळख असलेली मुंबई गणेशोत्सवानिमित्त सर्वधर्मसमभावाचा संदेश देते. मुंबईतील या दहा दिवसांतील वैशिष्ट्य सांगायचे तर हिंदू व मुस्लिमधर्मीय बांधव अतिशय अगत्याने, आनंदाने एकत्र येत विघ्नहर्त्या गणरायाचे मनोभावे पूजन करतात.
गोवंडीतील स्थानिक रहिवासी अन्वर कुरेशी यासंदर्भात सांगतात, “आमच्या विभागाच्या मंडळात मी व माझे मित्र लहानपणापासून आनंदाने सहभागी होतो. मंडळातर्फे आम्हाला दिली जाणारी सर्व कामे व जबाबदाऱ्या आम्ही पार पाडतो. कोरोनाकाळात दोन वर्षे सर्व काही बंद होते. मात्र, गेल्या वर्षीपासून पुन्हा एकदा आम्ही गणेशोत्सवाचा आनंद साजरा करत आहोत.”
वरळी परिसरात राहणारे हमीद अन्वर म्हणतात, “गेली अनेक वर्षे आमच्या मंडळातील गणपतीची आरास सजवण्यासाठी मी पहाटे दादरच्या फूलबाजारात जाऊन ताजी फुले घेऊन येतो. याशिवाय, रोषणाईच्या कामातही सेवा म्हणून काही मुस्लिम व्यावसायिक आपल्याकडील साहित्य दरवर्षी विनामूल्य देतात.”
मुंबईतील सर्वात मोठे गणेश मंडळ म्हणून 'लालबागचा राजा' ओळखला जातो. वेळेच्या हिशेबाने सर्वांत दीर्घ (सुमारे २१ तास) अशी विसर्जन-मिरवणूक याच गणपतीची निघते.
'मुंबईकरांच्या अभिमानाचा मानबिंदू' अशी ज्याच्याविषयी गणेशभक्तांमध्ये भावना आहे तो लालबागचा राजा ज्या वेळी विसर्जनासाठी नागपाडा येथे पोहोचतो त्या वेळी तेथील मुस्लिम समुदायातर्फे त्याचे जोरदार स्वागत केले जाते व मिरवणुकीत सहभागी असलेल्या भाविकांना शाही सरबतही दिले जाते. लालबागच्या राजाची मिरवणूक दक्षिण मुंबईतील मुस्लिमबहुल भागांमधून म्हणजेच - भायखळा, नागपाडा, आग्रीपाडा, गिरगाव चौपाटी - अशा मार्गानेच दरवर्षी निघत असते.
सलमान खानच्या गणपतीचे आकर्षण
'बॉलिवूडकर'ही दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या दहा दिवसांत अभिनेता सलमान खान याच्या घरी बसणाऱ्या गणपतीची व आकर्षक रोषणाईची हमखास चर्चा असते. वांद्र्यातील कार्टर रोडवरील 'गॅलेक्सी' या इमारतीत सलमान राहतो.
त्याची धाकटी बहीण अर्पिता हिच्या आग्रहावरून तो या इमारतीतील आपल्या घरी गणपती बसवतो. सलमान गेल्या २२ वर्षांपासून असा गणपती बसवत आहे. यानिमित्ताने बाप्पाची आरती करताना सर्व कुटुंबीय व बॉलिवूडमधील अनेक स्टार सलमानच्या घरी आवर्जून उपस्थित असतात.
गणपती मंडळ आणि इफ्तारी
मुंबईत स्थायिक असलेला मुस्लिम समाज जितक्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतो तितक्याच उत्साहाने रमजानच्या महिन्यात इफ्तारी साजरी करण्यात मुंबईची काही गणेश मंडळेही पुढाकार घेतात. फॅशन स्ट्रीट परिसरात असलेल्या गणेश मंडळातर्फे इफ्तारीच्या दरम्यान तेथील मुस्लिमधर्मीय व्यावसायिकांसाठी इफ्तारीचे आयोजन आवर्जून केले जाते.
- छाया काविरे
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध झालेल्या धार्मिक सौहार्दाच्या या बातम्याही जरूर वाचा 👇🏻
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -